‘ॐ’ काराला फक्त ‘शब्द’ म्हणणे म्हणजे हिमालयाला टेकडी म्हणण्यासारखे आहे. खरंतर अवकाश-आकाश-पृथ्वी-पाताळ व्यापूनही उरलेला असा ॐ हा ध्वनी आहे.
आपल्या हिन्दु धर्मातील प्रत्येक शुभकार्य ‘ॐ’ शिवाय सुरू होत नाही..ॐ काराचे अनेकांना अनेक अर्थ जाणवत असतील, मला जाणवला आणि पटला तो तुम्हां समोर ठेवतो..
‘अ’ कार, ‘उ’ कार आणि ‘म’ करापासून तयार झालेला ॐ हा ध्वनी जगातील सर्व भाषांचा आत्मा आहे असं म्हणता येईल.
अ, उ, व म ही तीन अक्षरे भाषेतील स्वर, व्यंजने व अनुस्वार यांचे प्रतिनिधित्व करतात आणि स्वर, व्यंजने व अनुस्वराशिवाय कोणतीही ग्रंथ निर्मिती-म्हणजेच ज्ञान निर्मिती-अशक्य आहे हाच त्याचा अर्थ.
हिंदू तत्वज्ञानानुसार ॐ कराचे अस्तित्व आपले अवघे जीवन व्यापून राहिले आहे. तान्ह्या बाळाच्या तोंडून आपल्या आई-वडिलांना बघून निघणारा अस्फुट हुंकार हा ॐ चाच सहज सुंदर अविष्कार आहे त्याचप्रमाणे वेदनेनं विव्हळत असता तोंडून निघणारा ‘अं..अं’ उद्गार देखील ॐ चेच करुण रूप..
आनंदाच्या भरात आपल्या तोंडून निघणारा ‘ओहो..!’ आणि दु:खात येणारा ‘ओह..!’ हे ॐचेच अविष्कार असे माझे मानणे आहे..इतकेच काय मराठी बायको आपल्या नव-याला ‘अहो’ अशी जी (प्रेमाने वा रागावे) हाक मारते हे ॐचेच r’OM’Antic रुप असे मला मनापासून वाटते!
ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेचा समारोप ‘आमेन’ ने होतो तर इस्लाम धर्मीय त्यांची प्रार्थना ‘आमीन’ने संपवतात..ग्रीक वर्णमालेतील शेवटचे अक्षर ‘ओमेगा’ हे आहे..ही सर्व ॐ चीच रूपे असे मी समजतो…!
उडिया भाषेतील शब्द ‘औ’ चा अर्थ ‘आत्मा’ असा असून या शब्द पासून ॐ शब्द निर्माण झाला असे अनेक भाषा शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
जाता जाता –
ज्यू धर्मियांचा अत्यंत पवित्र असा ‘योम किप्पुर’ हा सण आणि पारसी धर्मियांतील ‘अहोम’ हा सर्वात पवित्र देव. यात पण ‘ॐ’ आहे अशी माझी श्रद्धा आहे. ‘योम’ आणि ‘अहोम’ हे दोन्ही शब्दांचा उच्चार ॐ सारखाच आहे हे आपल्याला देखील पटेल.
‘अहोम’ हा पारसी शब्द आपल्या ‘सोम’चा अविष्कार आहे. ‘स’ या अक्षराचा उच्चार हिंदुस्थान बाहेरील लोक ‘ह’ असा करतात. म्हणून तर ‘सिंधू’ चे ‘हिंदू’ झाले आणि ‘सर्पीस’’, ज्या आजाराला आपण ‘नागीण’ म्हणतो त्याचे ‘हर्पिस’ झाले. अशाच प्रकारे ‘सोम’चे ‘अहोम’ झाले आणि ‘सोम’ म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकर ज्यांचा ‘ॐ’ चा संबंध आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे..!
— गणेश साळुंखे
93218 11091
नमस्कार.
उत्तम, माहितीपूर्न लेख. अध्यात्माच्या बहेरील ॐकाराची छान माहिती.
Incidently, यापैकी बरीच माहिती, मी व माझी दिवंगत पत्नी डॉ. स्नेहलता ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’वरील जो प्रोग्राम करीत असूं, त्यात मी देत असे.
– मी स्वत: इंजीनियर असल्यामुळे ॐ ला ‘Rasonating Sound’ म्हणतो. आपल्या लेखात आपण असे विविध ध्वनी दिलेले आहेत. भारतीय संस्कृतीमधील बरेच मंत्र असे आहेत; कारण त्यांत ॐमधील ‘म’कार येतो. उदा. बौद्धांचें ‘बुद्दम् सरणम् गच्छामि’ इत्यादी , जैनांचें ‘णमो अरिहंताणम्’ इत्यादी. हिंदू मंत्र तर अनेक आहेत.
– आपणही ‘अं’ वगैरे ध्वनी दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त, आणखी एक ( माझें मत म्हणा वा माझी कल्पना म्हणा ) :
मृत्यूपूर्वी’(कांहीं व्यक्तींच्या) मुखातून ‘हं हं ’ असा जो ध्वनी येतो, तें कण्हणें नसून , तो ‘सोऽहम्’ चा ध्वनी आहे, कारण त्या व्यक्तीला त्यावेळी, ‘सोऽहम्’ ही जाणीव होते. ( हें मी, ‘मृत्यू’वरील माझ्या एका रुबाईत म्हटलेलें आहे, जी माझ्या आगामी पुस्तकात अाहे. पण त्याविषयी पुन्हां कधीतरी ).
स्नेहादरपूर्वक,
सुभाष स. नाईक