नवीन लेखन...

स्मृतिकाव्य : तूं अजुन-जगीं-असण्याचा दिनरात भास होतो

संभ्रम तुझ्या हंसण्याचा नित काळजास होतो
तूं अजुन-जगीं-असण्याचा दिनरात भास होतो ।। १

हलकीशी झुळूक गंधित अंगावरून जाई
कुठुनी हा सोनचाफा उधळत सुगंध राही ?
स्मृतिचा, मनात माझ्या अविरत सुवास होतो ।। २

मज कोण बोलवी हें , कां नेत्र ओलवी हे ?
कंठात हुंदका कां दाटुन उगीच राहे ?
संसर्ग विकलतेचा, आहत-मनास होतो ।। ३

भावना उचंबळलेल्या, जुलमी तल्वार होती
माझ्या मनास जखमी, भावनाच भार होती
स्वत्वास या अरेरे ! त्यांचाच फास होतो ।। ४

नच उरला देह जर तव, मज कुठुन स्पर्श झाला ?
अवचित कसा शहारा अंगावरून आला ?
त्या स्पर्श-आठवानें हा जडवत् श्वास होतो ।। ५

‘आहेस’ वाटतें, तरि, ‘नाहींस’ हें कळेंही
नाहींस ; पण, मनाला अजुनीही मान्य नाहीं
या ‘असणे’ अन् ‘नसणें’चा भलताच त्रास होतो ।। ६

‘गेलीस’, हेंच भंवती जग सर्व मानताहे
अस्तित्व तव प्रफुल्लित पण मजसमीप राहे
आभास माझियाविण हा नच कुणांस होतो ।। ७

कधि वाटे, वारंवारच भेटशील तूं अजुनीही
कधि वाटे, वियोग माझा कधि संपणार नाहीं
क्षणिं आस वाढते, क्षणिं पुरताच हताश होतो ।। ८

जरि दूर तुझा परलोकीं आतां निवास असतो
तुजजवळ सदोदित माझ्या हृदयाचा वास असतो
निमिषात कल्पनेचा अगणित प्रवास होतो ।। ९

नयनांस ध्यास, तरिही, अदृश्य राहसी कां ?
हृदयास ध्यास उत्कट, तरि दुरुन पाहसी कां ?
अस्तित्व तूंच, अन् मी अंतर्बाह्य ध्यास होतो ।। १०

‘आभास’ हें म्हणा, वा, मजला ‘भ्रमिष्ट’ कोणी
‘आभास हा’, मला हें सांगूं नका चुकोनी
ऐकून, ऊर फुटतां, सगळाच नास होतो ।। ११

मज एकला नि व्याकुळ पाहून धावली जी
अजुनी समोर माझ्या असतेच सावली जी
‘नाहींच’ ती कशी ?, तो प्रश्नच खलास होतो ।। १२

निद्रिस्त रात नेहमी, आळशी प्रभात जरी
रोजच प्रघात माझा, ‘जप’ अखंड आठप्रहरीं
आरंभ जीवनान्तीं खडतर तपा-स होतो ।। १३

‘हरतेस क्लेश अजुनी’, स्वप्नांत हेंच वाटे
करतेस दूर अजुनी स्वप्नांत, तीक्ष्ण काटे
पण हाय ! , जाग येतां कां भ्रमनिरास होतो ? १४

तूं अजोड होतिस सखये, तुजजैसें जगतीं नाहीं
पण तुजसाठी अखेरिस मी करूं न शकलो कांही
शक्तिवान दुर्भाग्याचा मी हतबल दास होतो ! १५

अति-आर्त आठवांनी झाली अशी अवस्था –
अति-तप्त आसवांनी जळली जीवन-व्यवस्था
प्रियतमे, उपद्रव तुजविण माझाच सुखास होतो ।। १६

घनघोर खिन्नपण वाटे, दाटत अवसाद आहे
मी व्यर्थ सारखा तुज घालीत साद आहे
पण प्रचार वेदनांचा कां दशदिशांस होतो ? १७

तुजवीण वाट चालूं अजुनी पुढे किती मी ?
तुजवीण जीवनीं या थकलो, सखे, अती मी
अंताचा विचार येतां, आनंद खास होतो ।। १८

तूं गेलिस ; सरेल माझी कधि हरलेली कहाणी ?
संपेल कां अतिलौकर ही उरलेली कहाणी ?
हा हन्त ! यमाच्या लेखीं मी ‘अगोड-घास’ होतो !! १९

आतुर होऊन करतो परलोकाची प्रतीक्षा
तूं भेटशीलच फिरुनी, नच मोक्षाची अपेक्षा
हर्षही पुनर्भेटीचा हा तुजविण उदास होतो ।। २०

– – –
( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या स्मृतीत )

— सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..