अंतराळ-यायित्राकासारखा धारुन गणवेश
व्योमातुन अवतरला गजमुख, देव-गणाधीश ।। १
सोंडेसम भासतो मुखवटा, ‘प्राणवायु’ पुरवी
संरक्षक अवकाश-कवच त्या तुंदिलतनु बनवी
ध्वनिसंवर्धक मुखाजवळ, जणुं हस्तिदंत एक
शूर्पकर्णसम बशीमधे केंद्रित ध्वनि प्रत्येक
अश्वहीन रथ मूषक भासे, पुच्छ धूम्ररेष ।।
व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। २
प्रकाशगतिनें कुठून आला लक्ष-लोक लांघुनी
भूवर कधि, कितिदा अवतरला, नच जाणे कोणी
कोटिकोटि मानव-जन्मांच्या पल्याड कर्तृत्व
मर्त्य जगाला कालातीतच वाटे अस्तित्व
निरर्थ भूत-भविष्या करतो, अवकाशा दास ।।
व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। ३
– सुभाष स. नाईक.
Subhash S. Naik
Leave a Reply