अथर्वशीर्षात गजाननाबद्दल, रक्तिम-वस्त्रे-परिधान-केलेला, रक्तगंधानें-लिप्त-अंग असलेला, रक्तपुष्प-पूजित असे उल्लेख आहेत. गजाननाला रक्तवर्ण (लाल रंग) प्रिय आहे, असे अन्यत्रही उल्लेख आहेत. असें कां बरें ? याचें उत्तर पुरातन वाङ्मयानेंच दिलेले आहे. त्यात उल्लेख केलेला आहे की, गजानन हा आरंभीच्या काळात ‘विघ्नेश’, ‘विघ्नकर्ता’ होता; आणि नंतर त्याचें ‘विघ्नहर्ता’ हें रूप प्रचलित झाले. अरेच्चा !! पण इतका उलटा बदल कसा बरें झाला असावा?
सध्या जगात एक चर्चा जोरात चालू आहे, व ती अशी की, जर अवकाशातून एखादा परग्रहवासी (alien) पृथ्वीवर उतरला, तर तो मानवाचा मित्र असेल की शत्रू, तो शांतताप्रिय असेल की युद्धप्रिय, तो मानवांचा संहार करेल की त्याना मदत करेल ? या विषयावर कादंबर्या लिहिल्या गेल्या आहेत, सिनेमे काढले गेले आहेत, आणि विचारवंतांनीही आपली मतें मांडलेली आहेत. आपणही, तशाच दृष्टिकोनातून, ‘गजानन’ या अवकाशप्रवाशाबद्दल विचार केला तर काय उत्तर मिळेल ?
अशी शक्यता नाकारता येत नाहीं, की या परग्रहवासीयांच्या समूहाला सुरुवातीला स्वसंरक्षणार्थ शस्त्रांचा वापर करावा लागला असेल ; त्यामुळे हताहत प्राण्यांचे व मानवांचे रक्त वाहिले असेल, गजाननाच्या अंगावरही उडाले असेल. (कदाचित, त्याला संघर्ष नकोही असेल, पण त्याचा नाइलाज झाला असेल). भूतलवासीयांशी संघर्ष करणारा, त्यांना त्रासणारा, पीडा देणारा, त्यांच्या जीवनात विघ्न आणणारा, असा आरंभीचा गणेश ; आणि म्हणून गजाननाचा सुरुवातीचा उल्लेख ‘विघ्नकर्ता’ असा केला गेला असावा, व त्याला रक्त अथवा रक्तवर्ण प्रिय आहे, असे म्हटले गेलें असावें.
आपण एक हल्लीचें उदाहरण घेऊन हा मुद्दा अधिक स्पष्ट करू. एकोणिसाव्या शतकात, आफ्रिकेतील अप्रगत रहिवाशांसमोर बंदुका व मशीनगन घेऊन उभ्या ठाकलेल्या युरोपियनांबद्दल त्या आदिवासींना कशी भीती वाटत असे, व तत्कालीन युरोपियनांनी आफ्रिकेत किती नरसंहार केला, किती रक्त वहावले, हें आपण वाचलेलें आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला विमानातून उतरलेल्या युरोपियनांसमोर अप्रगत आफ्रिकन जंगलवासीयांनी लोटांगण घातले असेल, तर त्यात नवल काय ? एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील ही परिस्थिती, तर मग अनेक सहस्त्रकांपूर्वी तसें घडणें अशक्य नव्हेच !
सुरुवातीच्या काळात हा परग्रहवासी-गण ‘विघ्नकर्ता’ वाटला असला, तरी त्याच्यापुढे जग वाकल्यावर, नतमस्तक झाल्यावर, (किंवा, परग्रहवासियांची टोळी येथें स्थिरस्थावर झाल्यामुळे), शांतता प्रस्थापित झाली असावी, व मानव त्याचें पूजनही करू लागले असावेत. त्यामुळे, त्यानंतर त्या अवकाशप्रवाशासी-गणाला स्वसंरक्षणार्थ संहाराची गरज भासली नसणार ; एवढेंच नव्हे तर, त्यानें मानवाला सहाय्यही केलें असणार. म्हणूनच, या नंतरच्या काळात, हा गणपति ‘विघ्नहर्ता’ व ‘सुखकर्ता’ म्हणून ओळखला जाऊं लागला असणार.
आपण गजाननाच्या हातात गव्हाची लोंबी पहातो. गहू हें धान्यच मुळी मूळ भारतीय नव्हे, तर तें मध्य-पूर्वेकडील देशांमधून आलेलें आहे. तिथे इ.स.पू. ८०००-१००० या काळी गहू या रानटी ‘झुडुपाची’ शेती सुरू झाली. (पहा : संजीव सान्याल लिखित ‘लँड ऑफ दि सेव्हन रिव्हर्स’, Yuval Noah Harari याचे ‘Sapiens’, ही पुस्तकें ). म्हणजेच, गणपतीच्या मूर्तीच्या हातातील वस्तूंमधे गव्हाच्या लोंबीचा समावेश ही एक नंतरच्या काळातील घटना आहे.
मात्र एक गोष्ट खरी, की गहू हें शेतीचें प्रतीक आहे. त्यामुळे, असा अर्थ काढतां येतो की, हा अवकाशवासी ‘गजानन’ मानवांचा सहाय्यकर्ता झाल्यानंतर, त्याच्याच मार्गदर्शनाखाली मानवानें शेतीची सुरुवात केलेली असणार, व ह्या घटनेचें प्रतीक म्हणून गजाननाच्या हातात लोंबी दिसते.
— सुभाष स. नाईक.
मुंबई.
M – 9869002126.
Leave a Reply