तूं गेलिस, मी उरलो मागे सखा तुझा अनुरागी
जोवर मी, तोंवर राहीलच तुझी आठवण जागी ।।
रात्र पसरतां, भवतालीं निद्रिस्त सर्व दुनिया
मीच फक्त असतो जागा अन् तुझी आठवण जागी ।।
चुकुनी आली झोप कधी मज, तरि मी निजूं कसा ?
ठेवायची असे दिनरातीं तुझी आठवण जागी।।
भाग्य झोपलें माझें, कायमचीच झोपलिस तूं
मी कायम झोपेतों, कायम तुझी आठवण जागी ।।
आज असे मी, परंतु सखये, उद्या नसेन इथें
चिंता ही, नंतर राहिल कां तुझी आठवण जागी ?
– – –
११.०८.२०१६
(दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या स्मृतीत)
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply