आयुर्वेद….नावातच वेद आहे. आयुर्वेद हा ऋग्वेद वा अथर्ववेदाचा उपवेद आहे इथपासून ते पाचवा वेद आहे इथपर्यंत विविध मतांतरे आढळतात. अथर्ववेदाचा उपवेद हे मत बहुतांशी मान्य करण्याजोगे आहे. वेद हा शब्द आला म्हटल्यावर पर्यायाने व्याकरणादि वेदांगे, सांख्यादि दर्शनशास्त्रेदेखील आली.
आयुर्वेदाचा अभ्यास करायचा असल्यास या साऱ्यांचा अभ्यासदेखील क्रमप्राप्त असतो. ‘मी आयुर्वेदातले ग्रन्थ वाचले तर मला आयुर्वेद समजणार नाही का?’ असा काहीजणांचा प्रश्न असतो. याचे निःसंदिग्ध उत्तर ‘नाही’ असे आहे. का? अहो बाराखडीच न शिकता कोणी पुस्तक वाचू शकतो का? नाही. तसेच इथेही आहे. इथे आयुर्वेदात तुम्हाला सांख्यांच्या सृष्टीउत्पत्तीक्रमापासून वेदान्ताच्या मोक्ष संकल्पनेपर्यंत सगळ्या गोष्टी सापडतात. कित्येक ठिकाणी यातील संकल्पना विद्यार्थ्यांना पूर्वीच माहिती आहेत हे अध्यहृत धरून आचार्य भाष्य करत असतात. (कारण पूर्वी गुरुकुलात याच पायऱ्यांनी शिक्षण होत असे.) आजच्या आयुर्वेदाच्या शिक्षणपद्धतीतदेखील या गोष्टी शिकणे अनिवार्य असते. मुख्य म्हणजे या संकल्पना समजून घेतल्यावर त्यांचा आधार घेत आयुर्वेदाने स्वतःचे असे ‘मौलिक दर्शन’ निर्माण केले आहे. त्याचे काही सिद्धांत, परिभाषा आणि विधी- निषेधदेखील आहेत.
आपल्याकडे एक सुभाषित आहे…
‘यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मिश्रितम्।
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति।।’
कोणत्याही झाडाचे मूळ, कशात तरी खलून; कोणाला तरी दिले की काहीतरी होईल. असा त्याचा अर्थ. आज आयुर्वेदाला काहीजणांनी हेच स्वरूप प्राप्त करून दिले आहे. मात्र खरा आयुर्वेद असा नाही. किंबहुना आयुर्वेद म्हणजे केवळ रोग आणि औषधी नव्हेत. आयुर्वेद ही जीवनपद्धती आहे. आयुर्वेद म्हणजे ‘आजीबाईचा बटवा’ वा ‘घरगुती औषधी’ नव्हेत. आयुर्वेदाचे सिद्धांत बाजूला सारून ‘पोट दुखलं; घे ओवा’ असं सांगणे म्हणजे आयुर्वेद नाही. आज जरी याच गोष्टी आयुर्वेद म्हणून भरभराटीला येत असल्या तरी वेळीच सावधान व्हा आणि सत्य समजावून घ्या. आणि त्यातूनही ज्यांना आयुर्वेद शिकायचा आहे त्यांनी आयुर्वेदाच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा किंवा रीतसर शिक्षण घेतलेल्या वैद्यांकडून या संकल्पना समजावून घ्याव्या. कित्येकांकडे ‘परंपरागत ज्ञान’ असल्याचे दावे केले जातात. अशा व्यक्तींसाठी सर्वप्रथम वयाची अट घालावी. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्षे झाली आहेत. गेली सत्तर वर्षे आयुर्वेदाची महाविद्यालये आहेतच की. मग कुठलं परंपरागत ज्ञान? आणि त्यातही काही व्यक्तींकडे तसं ज्ञान असेलच तर आयुर्वेदीय महाविद्यालयांतून त्यांच्यासाठी सर्वप्रथम ‘पात्रता परीक्षा’ घेण्यात याव्यात. कारण कित्येकदा हे घरोघरी फिरून प्रॅक्टिस करणारे परंपरागत वैदूच एकीकडे वाट्टेल त्या गोष्टी प्रसारमाध्यमांना वेठीला धरून आयुर्वेदाच्या नावावर खापवत तर दुसरीकडे आपल्या औषधांत स्टिरॉइड्स वगैरे मिसळून (हे दोन प्रमुख प्रकार आहेत) आयुर्वेदाचा बट्ट्याबोळ करत असतात.
कोणताही पूर्वाभ्यास नसलेल्या ज्याला त्याला वाटत सुटायला आयुर्वेद ही काही खिरापत नव्हे. तो भगवंताचा प्रसाद जरूर आहे. मात्र तो मिळवण्यासाठी सध्याच्या काळात महाविद्यालयीन शिक्षणाच्या रांगेत उभे राहणे आवश्यक आहे!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Aug 24, 2016
Leave a Reply