हे प्रथमपते, शारदापते, हे शिवगिरिजापुत्रा
हे गुणपते, श्रीगणपते, वंदना प्रभो स्वीकरा ।।
वक्रतुंड, गजवक्र, मोरया, गणेश, सुखकर्ता,
मंगलमूर्ती, हेरंबा, हे लंबोदर, पर्वतीसुता
विघ्नविनायक, गणदेवा, प्रथमेशा ओंकार ।।
हे गुणपते, श्रीगणपते, वंदना प्रभो स्वीकरा ।।
गणाधीश हे, महेश्वराचे तुम्ही गणाधिपती
ऋध्दि-सिद्धि कर जोडुन ठाकत लवुन तुम्हांपुढती
शक्ति-युक्तिचा संगम तुम्ही हे गौरीकुमरा ।।
हे गुणपते, श्रीगणपते, वंदना प्रभो स्वीकरा ।।
धूम्रवर्ण हे, गौरीतनया, बसुन मूषकावरी
रक्तपुष्प पदिं, शंख-चक्र-अंकुश व पाश निजकरीं
गंधलिप्त शुंडेवर धरता तोलुन चराचरा ।।
हे गुणपते, श्रीगणपते, वंदना प्रभो स्वीकरा ।।
जग चाले गणराजकृपेनें, हे गजमुख, हे जगताधार
आदि-अंत विश्वाचा तुम्ही, सृष्टीला देता आकार
नाम गजानन जपतो नर, तो तरतो भवसागरा ।।
हे गुणपते, श्रीगणपते, वंदना प्रभो स्वीकरा ।।
कृपावंत एकदंतचरणीं गर्जे जयजयकार –
गणनायक, गजवदना तुमचा महिमा अपरंपार
विनायका, विनवितो – मनींच्या वांछा पूर्ण करा ।।
हे गुणपते, श्रीगणपते, वंदना प्रभो स्वीकरा ।।
वरदमूर्ति, मिटवा भय-चिंता स्पर्शुनिया माथा
दु:खाग्नी विझवा, हे संकटमोचन गणनाथा
निज-दासांचे षड्.रिपु सत्वर गणराया संहरा ।।
हे गुणपते, श्रीगणपते, वंदना प्रभो स्वीकरा ।।
– – –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply