आज ३० सप्टेंबर. भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांची जयंती
हृषिकेश मुखर्जी… भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांचा जन्म ३० सप्टेंबर १९२२ रोजी झाला.
दिग्गज दिग्दर्शक बिमल रॉय यांचे शिष्य आणि ‘आनंद’, ‘अभिमान’, ‘गोलमाल’, ‘बावर्ची’, ‘खुबसुरत’ अशा उत्तमोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून आणि चंदेरी दुनियेतल्या झगमगाटात प्रदीर्घ काळ राहूनही साधेपणा जपणारे प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हिंसाचार किंवा लैंगिकतेला त्यांनी आपल्या चित्रपटांत कधीही स्थान दिले नाही. किंबहुना या गोष्टींना पूर्ण फाटा देऊन साध्या बाबींतूनही जीवनसूत्र सांगता येते, हेच त्यांनी त्यांच्या कलाकृतींतून दाखवून दिले आहे.
हृषिकेश मुखर्जी यानी १९५९ मध्ये राज कपूरला घेऊन तयार केलेला ‘अनाडी’ आणि त्यातील गाणी खूप गाजल्याचे आपल्याला माहीत आहेच. अनाडीच्या यशाने प्रेरित होऊन हृषिदांनी राज कपूर यालाच केन्द्रस्थानी ठेवून ‘आनंद’ ची जुळवाजुळव सुरू केली होती. इतकेच नव्हे तर अनाडीच्या वेळेसच आनंदसमवेत गाजलेले ‘बाबू मोशाय’ हे सहाय्यक पात्राचे नावही नक्की झाले होते…त्याला कारण म्हणजे राजकपूर हृषिकेश मुखर्जी याना सेटवर नेहमी ‘बाबू मोशाय’ याच नावाने हाक मारीत असे. पण पुढे ‘आराधना’ नंतर राजेश खन्ना युग आल्यावर आणि त्याच्या अभिनयाची धाटणी त्यावेळी सर्वानाच ‘आल्वेज हॅपी काईंड फेलो’ अशी वाटू लागल्यावर हृषिदांनी राजेश खन्ना यांना घेऊन ‘आनंद’ केला.
दिग्दर्शक ही हृषदांची अर्धीच ओळख ठरेल. संकलक, लेखक, पटकथा लेखक, संगीतातले जाणकार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे करडया शिस्तीचा परंतु, अतिशय सहृदय माणूस, हे हृषदांच्या व्यक्तिमत्त्वातले कंगोरे होते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचे हृषदा भागीदार आणि साक्षीदारही आहेत. बिमल रॉय यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक, गुलजार यांच्यासारखा मनस्वी कवी- लेखक, सलील चौधरी, सचिन देव बर्मन व पंचमदा ऊर्फ राहुल देव बर्मन, हेमंत कुमार, असे गायक संगीतकार, अशोककुमार, दिलीपकुमार, राज कपूर, अमिताभ बच्चन, उत्पल दत्त, राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमोल पालेकर, शत्रुघ्न सिन्हा, रेखा, जया बच्चन अशा नव्या-जुन्या अनेक श्रेष्ठ कलावंतांबरोबर त्यांनी काम केले आहे. जया-अमिताभ ही जोडी काय किंवा रेखा, धर्मेंद्र, अमोल पालेकर, असरानी असे कलाकार काय, या कलाकारांच्या यशात हृषदांचा निश्चितच मोलाचा वाटा आहे.
हृषिकेश मुकर्जी यांचे २७ ऑगस्ट २००६ रोजी निधन झाले. हृषिकेश मुकर्जी यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply