नवीन लेखन...

दातांची काळजी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

दातांचे महत्व –

आहारातून उदरात जाणारा अन्नाचा प्रत्येक कण शरीराला पोषण देणारा असतो. अन्न चावल्याने त्यावर सर्वप्रकारच्या पाचक स्रावांचे सुयोग्य संस्कार होऊन शरीराला पोषण मिळते. ह्या प्रक्रियेत सर्वात पहिली जबाबदारी असते दातांची. अर्थात ह्यासाठी दातांचे आणि त्याचबरोबर हिरड्यांचे स्वास्थ्य उत्तम असणे नितांत गरजेचे आहे. “एक घास बत्तीस वेळा चावावा” हा वाक्प्रचार ह्यातूनच रूढ झाला आहे. अन्न चर्वणाच्या ह्या पहिल्या पायरीवर काही आपत्ती निर्माण झाली तर पुढे सर्वच स्तरांवर पचनाच्या तक्रारी सुरु होतात आणि शरीराची पोषणक्रिया मंदावते. ह्याकरिता दातांची निगा राखणे अत्यंत महत्वाचे आहे.

प्रचलित उत्पादने –

सध्या बाजारात टूथपेस्ट आणि टूथब्रशच्या भरमसाठ जाहिराती आपण बघतो. पूर्वी ब्रशचे दाते वेडेवाकडे झाले की तो वापरण्यास अयोग्य झाला अशी जाहिरात दिसायची. आता झिगझॅग ब्रश कसा फटीतून स्वच्छता करतो ह्याच्या जाहिराती दिसतात. त्याचप्रमाणे पूर्वी कोळसा दातांसाठी कसा हानिकारक आहे हे जाहिरातीत दाखवले जायचे तर आता चारकोलयुक्त टूथपेस्ट कशी अधिक चांगली हे दाखविले जाते. ह्यावरून जाहिराती किती दिशाभूल करणाऱ्या आहेत हे आपल्याला लक्षात येईल. त्याकरिता ह्यातील सत्य काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून दातांच्या रचनेपासून माहिती घेऊया.

दातांची रचना –

दातांच्या रचनेत चार मुख्य भाग असतात. एनॅमल, डेंटिन, सिमेंटम आणि डेंटल पल्प. दातांचा बाहेरून दिसणारा दिसणारा भाग म्हणजे एनॅमल. हा भाग पांढरा असून अत्यंत मजबूत, कणखर असतो. मुख्यतः कॅल्शियमने बनलेला हा भाग संवेदनाक्षम नसतो. ह्यावर थंड किंवा गरम पदार्थांचा विशेष परीणाम होत नाही. मुखात अम्लता (अॅसिडिटी) वाढली तर हे एनॅमल हळूहळू चिलेशन पद्धतीने झिजू लागते. एनॅमल मधील कॅल्शियम अॅसिड माध्यमात विरघळते. म्हणूनच निसर्गाने लाळ उत्तम अल्कलाइन बनवली आहे जेणेकरून ह्या एनॅमलचे रक्षण होते. काही कारणाने एनॅमलला इजा होऊन आतील भाग उघडा पडला तर हे एनॅमल पुन्हा पूर्ववत करता येणे जवळजवळ अशक्य होते. आतील भाग उघडा पडल्यास दातदुखी होते कारण एनॅमलमध्ये मज्जातंतू नसतात.

डेंटिन हा एनॅमलच्या आत असलेला भाग. ह्यात मज्जातंतू असतात. त्यामुळे एनॅमलला इजा होऊन डेंटिन उघडे पडले तर वेदना होतात. डेंटिन हे एनॅमलच्या तुलनेत जरा ठिसूळ असते. त्याच्या रक्षणासाठी एनॅमलचे रक्षण करणे अत्यावश्यक असते.

दात हिरड्यांमध्ये पक्के बसण्यासाठी उपयोगी असलेला हा भाग आहे. ह्याची झीज झाल्याने दातांच्या मुळाशी इजा होण्याची शक्यता असते.

डेंटल पल्प म्हणजे दातांच्या आतील मऊ भाग. ह्या भागात रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू असतात.

मनुष्याच्या मेंदू जसा हाडांच्या दणकट कवटीमध्ये सुरक्षित ठेवला असतो त्याचप्रमाणे दातांचे एनॅमल समजावे. डेंटिन, सिमेंटम आणि डेंटल पल्प ह्यापैकी कोणत्याही रचनेची दक्षता घेणे आपल्या हाती नसते. फक्त एनॅमलचे संरक्षण केले तर ह्या आतील रचनांचे संरक्षण अपोआप होते. म्हणून दातांच्या एनॅमलचे रक्षण करण्यासाठी नेमके काय करावे हे बघूया.

दातांची काळजी –

दातांचा उपयोग अन्न चर्वणाशिवाय अन्य कितीतरी कामांसाठी मनुष्य करतांना दिसतो. शीतपेयांच्या बाटल्या उघडणे, प्लास्टिकची सीलबंद पाकिटे उघडणे किंवा काहीवेळा वजन उचलणे. त्याचबरोबर अति थंड किंवा अति उष्ण पदार्थांचे सेवन न करणे हे दातांच्या आणि हिरड्यांच्या रोगांसाठी तितकेच महत्वाचे आहे. दातांची निगा राखण्यासाठी खरंतर मनुष्य कितीतरी गोष्टी करतो. त्या तुलनेत इतर प्राणी तर दात घासतही नाहीत. तरी माणसाचे दात का एवढे खराब होतात? भरपूर बर्फ घालून थंड पेय किंवा गरमागरम चहा / कॉफी घेतांना कोणताही प्राणी आपल्याला दिसत नाहीत. अशा गोष्टी सर्वप्रथम दात आणि हिरड्यांच्या संपर्कात येतात. मग त्यांची सहनशीलता संपते आणि रोग निर्मितीला सुरुवात होते. गोड पदार्थ मुळातच जंतूंना आवडतात. गोड पदार्थ सेवनाने तोंडात जंतूंची वसाहत सहज वाढत जाते. मग त्यापैकी काही जंतु हिरड्यांकडे वळतात आणि त्याठिकाणी आपली वसाहत वाढवू लागतात. परिणामी दात मुळापासून खराब व्ह्यायला लागतात. मुखप्रदेशात निसर्गाने लाळ निर्मिती यंत्रणा बसविली आहे. त्यातील अल्कलाइन स्राव मुखातील जंतूंचा नाश करण्यास आणि आम्लता नियंत्रण करण्यात समर्थ असतात. म्हणून पुरेशी लाळ निर्मिती होत नसेल तरीदेखील दातांचे रोग लवकर होऊ शकतात. विशिष्ट वयानंतर हाडे जशी कमजोर होत जातात तशी हिरड्यांची पकडही कमजोर होत जाते. परिणामी खाद्यपदार्थांचे कण दातांच्या मुळाशी जाऊन अडकतात आणि पुढे दंतविकारांची पायाभरणी सुरु होते.

ब्रश पेक्षा मंजन बरे –

“ब्रश पेक्षा मंजन बरे” ह्या वाक्याची थोडी उकल करतो. आहारातील विविध प्रकारच्या पदार्थांमुळे दातांच्या एनॅमलवर आणि हिरड्यांच्या ठिकाणी काही किटण जमते. स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करण्यासाठी फक्त साबण आणि ब्रश उपयोगी पडत नाही. त्यांना सौम्य घर्षण करणारा असा स्क्रब लागतो. केवळ तेल तुपाचे डाग असतील तर साबण पुरतो पण किटण हटवण्यासाठी स्क्रबची गरज भासतेच. त्याचप्रमाणे दातांच्या स्वच्छतेसाठी घर्षण करणारा पदार्थ असणे आवश्यक आहे. घर्षण करणारा हा पदार्थ दातांच्या एनॅमलपेक्षा नरम असावा, शिवाय दातांवरील ओशटपणा नाहीसा करणारा हवा. दंतमंजानात लाळ निर्मिती वाढविणारे औषधी घटक असावेत. शिवाय मुखप्रदेशात जंतूंची वाढ रोखणारे घटक त्यात असावेत. तुरट रसाने हिरड्यांचे आकुंचन होते म्हणून अशा घटकांचा अंतर्भाव ह्यात असावा. किंचित उष्ण जातीच्या वनस्पतींचा अंतर्भाव असावा. हिरड्यांना सौम्य मसाज करतांना अशा द्रव्यांनी हिरड्यांमार्फत होणारा रक्तपुरवठा सुधारतो. ह्या सर्व बाबींचा विविध बाजूंनी विचार करून आयुर्वेदाने दंतमंजन निर्मितीचे काही पाठ ग्रंथात दिले आहेत. त्यांचा उपयोग जगातील कोणत्याही पेस्टच्या तुलनेत अधिक श्रेष्ठ आहे. दातांची आणि हिरड्यांची उत्तम निगा राखायची असेल तर अशा मंजनाचा उपयोग दात व हिरड्या घासण्यासाठी करावा, नंतर मध्यम प्रकारच्या ब्रशने दातांच्या फटीतील बारीक कण काढून टाकावेत आणि आठवड्यातून किमान ३ वेळा रात्री फ्लॉसच्या सहाय्याने स्वच्छता करावी.

दंतप्रभा –

 १० ग्रॅम मधील घटकद्रव्ये (चूर्ण स्वरूपात)

खदिर (Acacia catechu), बब्बूल (Acacia arabica) प्रत्येकी २ ग्रॅम, बकुल (Mimusops elengi), शिरीष (Albizia lebbeck), अर्जुन (Terminalia arjuna) प्रत्येकी १ ग्रॅम, शुद्ध फिटकरी (Alum), कर्पूर (Cinnamomum camphora) प्रत्येकी ४०० मिलीग्रॅम, दालचिनी (Cinnamomum zeylanicum), लवंग तेल (Syzygium aromaticum) प्रत्येकी १०० मिलीग्रॅम, तुंबरू (Zanthoxylum acanthopodium) १ ग्रॅम, शुद्ध गैरिक (Red Ochre) आवश्यकतेनुसार

प्रत्येक औषधी घटकाचे गुणधर्म स्वतंत्रपणे

खदिर (Acacia catechu): मुखातील अॅसिडिक बॅसिलायवर उत्तम नियंत्रण करून हिरड्यांना बळकटी देणारी ही वनस्पती आहे. ह्यातील रक्तस्तंभक गुणामुळे दात किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव त्वरित थांबतो. मुखरोगांत हिचा उपयोग अनेक औषधी पाठांत केला आहे.

बब्बूल (Acacia arabica): दातांवरील किटाण, हिरड्यांची सूज आणि हिरड्यांतून होणारा रक्तस्राव ह्यावर हिच्या सालीचा उत्तम उपयोग होतो. पोर्फिरोमोनास जिंजीव्हेलिस, प्रेव्होटेला इंटरमेडिया, फुसोबॅक्टेरियम न्युक्लियेटम, आयकेनेला कोरोडेन्स आणि कॅम्पायलोबॅक्टर रेक्टस अशा ५ प्रकारच्या जंतूंमुळे मुखात जंतुसंक्रमण होते. बब्बुलाच्या प्रभावाने ह्या पाचही प्रकारच्या जंतूंचा अटकाव होतो व दातांबरोबरच संपूर्ण मुखरोगांचाही बचाव होतो.

बकुल (Mimusops elengi): ग्रंथात ह्या वनस्पतीचा विशेष उल्लेख “दंतदार्ढ्यकर” म्हणून आहे. ‘दार्ढ्य’ म्हणजे दृढता आणि ‘कर’ म्हणजे देणारा. अर्थात दातांना दृढता देणारी ही वनस्पती आहे. आधुनिक संशोधनानुसारही हिरड्यांमधून रक्तस्राव, हिरड्यांमध्ये पूयनिर्मिती होणे (पायोरिया), दात किडणे व दातांची मुळे कमजोर होणे अशा विकारांवर बकुल अतिशय प्रभावी आहे.

शिरीष (Albizia lebbeck): दातदुखीसाठी आणि दात-हिरड्यांच्या मजबुतीसाठी श्रेष्ठ आहे. ह्याच्या काढ्याचा उपयोग गुळण्या करण्यासाठी (गंडूष) मुखरोगांत सांगितला आहे. तोंडात छाले पडणे (मुखपाक), जखमा होणे, तिखट किंचितही सहन न होणे अशा लक्षणांमध्ये ह्याचा चांगला उपयोग होतो.

अर्जुन (Terminalia arjuna): मायक्रोस्पोरम केनिस नामक फंगसमुळे मुखरोग (ओरल थ्रश/ कॅंडिडायसिस) उद्भवतात. ह्या जंतूंपासून मुखरोगांचे संरक्षण करण्यासाठी अर्जुनाचा उपयोग होतो. दात घासतांना मुखाच्या आतील त्वचेशी होणारा संपर्क ह्या फंगसपासून रक्षण करण्यास पुरेसा आहे. ह्यातील उत्तम कषाय रसाने हिरड्यांना बळकटी मिळते व रक्तस्राव थांबवून मुखातील जखमा त्वरित भरून निघतात.

शुद्ध फिटकरी (Alum): रक्तस्तंभनासाठी फिटकरी प्रसिद्ध आहे. ह्यात जंतुनाशक गुणही आहेत.

कर्पूर (Cinnamomum camphora): दातांच्या मुळाशी असलेली हिरड्यांची जागा सुजणे (पेरिडोंटायटिस आणि पल्पायटिस) व त्यामुळे दातांची पकड सैल होणे अशा प्रकारात कर्पुराचा चांगला उपयोग होतो. ह्याने दातांच्या मुळाशी होणाऱ्या वेदना थांबतात.

दालचिनी (Cinnamomum zeylanicum): दालचिनी तेलाने मुखभागातील जंतुसंक्रमण रोखले जाते व दातांच्या मुळाशी रक्ताभिसरण सुधारते. अशाप्रकारे दातांच्या पोषणाला हिने हातभार लागतो.

लवंग तेल (Syzygium aromaticum): दातांच्या मुळाशी असलेल्या वातनाड्यांवर (नर्व्हज) अवसादक कार्य आणि सूक्ष्म जीवाणूंचा प्रतिरोध ह्या तेलाने होतो. त्यामुळे दात किंवा दाढदुखीसाठी लवंग तेल हे श्रेष्ठ औषध म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. श्वासाची दुर्गंधी घालविण्यासाठीही ह्याचा विशेष उपयोग होतो.

तुंबरू (Zanthoxylum acanthopodium): काही तिखट, गरम किंवा जळजळ निर्माण करणाऱ्या पदार्थांमुळे तोंडाच्या आतल्या नाजूक अंतस्त्वचेला फोड येतात किंवा त्वचा भाजल्यासारखी होते. अशा अवस्थेत तुंबरूमुळे त्वरित थंडावा मिळतो व झालेले फोड शांत होतात.

शुद्ध गैरिक (Red Ochre): घर्षणामुळे स्वच्छता होते. दातांच्या बाबतीतही हे तत्व लागू आहे. पण घर्षणासाठी वापरला जाणारा पदार्थ हा दातांच्या एनॅमलपेक्षा नरम असावा अन्यथा एनॅमल नाश पावेल. शुद्ध गैरिक हा खनिज पदार्थ आहे व नरमही आहे. इजिप्तच्या इतिहासात राजेरजवाडेही दातांच्या संरक्षणासाठी ह्याचा वापर करीत असत. शुद्ध गैरीकामुळे एनॅमल सुरक्षित राहून दातांची चकाकी वाढते.

— लेखक : डॉ. संतोष जळूकर (मुंबई)

संचालक, अक्षय फार्मा रेमेडीज

फोन : +917208777773

ईमेल : drjalukar@akshaypharma.com

 

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..