केशर म्हटले की पुर्वीच्या काळातील राजा रजवाडे ह्यांची आठवण आल्या शिवाय रहात नाही.किंबहूना हे नाव ऐकल्यावर मला तरी त्यांची आठवण होते.असा हा राजेशाही आश्रय लाभलेला पदार्थ आता जरी सर्व सामान्यांच्या अवाक्यातला झाला असला तरी त्याच्या भोवताली असणारे ते वलय काही कमी झाले नाहीये बुवा.
सांगण्याचा हेतू हा की केशर हा तसा जपून वापरण्याचा पदार्थ आहे कारण आज देखील ह्याच्या किंमती गगनास भिडलेल्या आढळतात.
साधारण पणे राजभोगा मध्येच अर्थात अगदी खास अशा पक्वान्नांमध्येच ह्याचा वापर केला जातो.मिठाई,बासुंदी,मसालेदुध,केशराचा शिरा इ (आणखी पदार्थांची नावे देणे टाळते कारण आपल्या रसग्रंथी उत्तेजीत करून अत्रूप्त ठेवल्याचे पातक माझ्या माथी नको)
तर हा केशर जसा आपण गोड धोड पदार्थात वापरतो तसेच ह्याचे काही औषधी उपयोग देखील आहेत तेच आपण आज पहाणार आहोत.
केशराचे छोटे क्षुप असते आणी आपण वापरत असलेले केशर हे त्या फुलात मध्यभागी असतात.
चवीला तिखट,कडू आणी उष्ण गुणाचे असतात.केशर शरीरातील वात,पित्त व कफ हे तिन्ही दोष आटोक्यात ठेवतात.
चला आता ह्याचे घरगुती उपचारात उपयोग पाहूयात:
१)आव पडत असल्यास केशर कडू निंबाच्या रसातून द्यावे.
२)पोटात जंत होत असतील तर केशराचा ४ कांड्या थोड्या कापूरासह २ चमचे दूधात मिसळून द्यावे.असे ८ दिवस करावे.
३)लहान मुलांना वारंवार सर्दी होत असेल तर ४ केशर कांड्या २ चमचे दूधातून द्यावे.
४)लहान मुलांना उन्हाळयात गोवर उठते ती पुर्ण पणे शरीराबाहेर न पडल्यास त्यांना त्रास होऊ शकतो ह्यासाठी १० केशर कांड्या ६ चमचे पाण्यात रात्री भिजत घालाव्यात व त्यात साखर घालून हे पाणी गोवर थोडे अंगावर फुटलेले दिसले की मुलांना सकाळी हे पाणी पाजावे.
५)पाळीच्या वेळी ओटीपोटात दुखणे,स्त्राव नीट न होणे अशक्तपणा अशा तक्रारी असल्यास १/४ चमचा केशर + २ चमचे जीरे हे मिश्रण दुपारच्या जेवणापुर्वी ३ महीने घ्यावे.
६)शरीरात अशक्तपणा असल्यास व रक्ताची कमी असल्यास १/४ चमचा केशर+ ३ काळे खजूर+ २ चमचे शिंगाडा पीठ +१ चमचा मध हे मिश्रण रोज सकाळी उपाशी पोटी घ्यावे.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply