आईस्क्रीम हा आपल्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. तसं तर बाराही महिने या पदार्थाची भुरळ आम्हाला पडलेली असतेच. मात्र; सध्या पारा खूप जास्त चढत असल्याने आईसक्रीमच्या मागणीतदेखील तुफान वाढ होताना दिसते.
या आईसक्रीममधील प्रमुख घटक कुठला? सोपं आहे…..दूध. असंच उत्तर बहुतेकजण देतील. पण आईसक्रीम हे दुधापासून बनत नसते; ते बनते तेल आणि डालडा यांच्या मिश्रणापासून! (आईसक्रीम कपवरचे घटक नीट पहा)
खोटं वाटतंय नं? पण खोबरेल तेल आणि डालडा यांचा ‘बेस’ वापरून त्यात दुधाची पावडर आणि फ्लेवर्स तसेच अन्य प्रिझर्व्हेटीव्हस घालून आईसक्रीम बनते. तेल वापरल्याने आईसक्रीम टिकण्याचा काळ वाढतो. तसेच ते स्वस्तात तयार होते. त्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्या याच घटकांपासून आईसक्रीम बनवतात.
आईसक्रीम खाताना आपले तोंड तुपकट झाल्यासारखे वाटते हा आपला नेहमीचा अनुभव असेल. त्यातील दुधामुळे तसे होते असे आपल्याला वाटत असते. प्रत्यक्षात मात्र हे त्यातील तेलामुळे होते. शब्दशः सांगायचे झाल्यास आईसक्रीम खाऊन आपले तोंड ‘तेलकट’ होते.
मग याबाबत कोणीच काही कारवाई का बरं करत नाही? इथेच खरी गोम आहे. अन्न औषध प्रशासनाच्या नियमानुसार अपेक्षित असलेले ‘फॅट’चे प्रमाण या आईसक्रीममध्ये पूर्ण केलेले असल्याने त्यात अन्य काय घटक आहेत याच्याशी कोणालाही कर्तव्य नसते. किंबहुना; त्यातील घटक वेष्टनावर नमूद केलेले असूनही आपण वाचतच नाही. प्रत्यक्षात केवळ दुधापासून बनविण्यात आलेले आईसक्रीम हे ‘डेयरी आईसक्रीम’ या नावाने मिळते. त्याचा टिकण्याचा काळदेखील कमी असतो. (संदर्भ: The Daily Mail UK Dec 11, 2014)
त्यामुळे; आईसक्रीम हे ‘दुधाचे’ बनलेले असते या अंधश्रद्धेतून लवकरात लवकर बाहेर या. या पद्धतीने तेल-डालडा या मिश्रणातून तयार झालेल्या आईसक्रीममुळे आरोग्यास अपायदेखील होवू शकतो असे कित्येक तज्ज्ञांचे मत आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे!!
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply