चिंटी चावल ले चली…
चिंटी चावल ले चली,
बीच में मिल गई दाल।
कहै कबीर दो ना मिलै,
इक ले डाल॥
अर्थात :
मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला दाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, ‘क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.’ पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, ‘वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.’
तांदुळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, दाळीने हिरावून घेतला. माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात.
साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, ‘इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं.’
विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषणशासनव्यवस्था विकल्पांची लयलूट करतात. ती बघून, ‘घेशील किती दोन करांनी’ अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषणशासनव्यवस्थांना हाकायला खुप सोपी पडतात.
पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तुही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते (आणि ऐपतही नव्हती.) आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत. भौतिक वस्तुंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे. पायापाशी असणारं सुख मृगजळासारखं पुढच्या चौकात, तर तिथे गेल्यावर ते, आणखी पुढच्या चौकात दिसू लागलं आहे.
बायबलमध्येही म्हटलं आहे, ‘परमेश्वर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उपहार (गिफ्ट्स) ठेवत असतो. त्यापैकी कोणत्या तरी एका बाजूच्याच गिफ्ट्स तुम्हाला घेता येऊ शकतात.’
तर भगवान बुद्धांनीही हेच सांगितले आहे की, ‘विणेच्या तारा झंकृत व्हाव्या म्हणून, इतक्या ताणू नका, की छेडताच तुटतील आणि तूटण्याच्या भीतीने इतक्या सैलही सोडू नका, की छेडल्यावर त्या झंकृतच होणार नाहीत.’ यालाच बुद्धांचा ‘प्रतीत्य (कारण) समुत्पाद’ (कार्य) किंवा ‘मध्यमा प्रतिपद’ म्हणतात.
मुळात माणूस हा उजवाही नसतो अनं डावाही नसतो. त़ो ‘प्रतीत्य समुत्पादी’ म्हणजे मध्यममार्गीच असतो. पण तो तसा असणं हे शोषणशासनसंस्थांच्या हिताचं नसतं. म्हणून त्या त्याला तसं राहू देत नाहीत. त्याच्यासमोर चांगल्या-वाईट विकल्पांचा पसारा माडून, ते त्याला उजव्या-डाव्या छावण्यांमध्ये विभाजित करतात. त्यावर काही चतुर माणसं ‘सेंटर टू लेफ्ट’ वा ‘सेंटर टू राईट’ अशी पळवाट काढतात. पण सगळे काही चतुर नसतात. त्यांना कुठल्या न कुठल्या पारड्यात आपलं वजन टाकावच लागतं.
या अगतिकतेला, आपली दोन्ही हातांनी गोळा करायची आसक्तीच कारणीभूत आहे. देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतं घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो. म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकावू बनतो. कबीरांच्या या दोह्यात असा मोठ्ठा आशय दडला आहे.
Leave a Reply