सत्ता आणि संपत्तीपेक्षा मनापासून केलेल्या कोणत्याही कार्यातील समाधान व आनंद सर्वश्रेष्ठ असतो. कारण लक्ष्मी ही चंचल असते असे म्हणतात. सत्तेच्या सहकार्याने मिळविलेली संपत्तीही अशीच असते.
चीनचा तत्त्वज्ञ कन्फ्युशिअस हा असाच सत्तासंपत्तीपेक्षा सामान्य माणसाच्या समाधानात आनंद मानत असे. चीनच्या तत्कालीन सम्राटाने या ककशिअसला एका राज्याचा मुख्य अधिकारी म्हणून नियुक्त केले. परंतु कन्फ्युशिअसला सत्ता आणि संपत्तीमध्ये कसलाही रस नव्हता. मात्र मिळालेल्या अधिकारपदाचा त्याने सामान्य माणसाच्या हितासाठी उपयोग करून घ्यायचे ठरविले. राज्याच्या कारभारातील भ्रष्टाचार, लांगुलचालन आदी गोष्टी त्याने कठोरपणे मोडून काढल्या.
अर्थातच त्याच्या या गोष्टी काही भ्रष्ट व सत्तालोलुप अधिकाऱ्यांना आवडल्या नाहीत. त्यांनी सम्राटाकडे कागाळ्या केल्या. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. सम्राटाने त्याचे सर्व अधिकार काढून घेतले. जी थोडीफार सक्ती होती तीही त्याने जप्त केली.
कन्फ्युशिअस कफल्लक झाला. मात्र तरीही तो आनंदी होता. गावोगावी जाऊन तो लोकांसमोर व्याख्याने देई. त्यामुळे लवकरच त्याचा मोठा शिष्यवर्ग तयार झाला.
एकदा एका शिष्याने त्याला विचारले, की ‘तुमचे पद गेले, सत्ता गेली, संपलीही गेली तरीही तुम्ही आनंदी कसे?’ त्यावर कन्फ्युशिअस त्याला म्हणाला, सत्ता काय किवा संपत्ती काय, आज आहे तर उद्या नाहीत. त्या नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. सत्ता वा संपत्ती आपल्या बुद्धीला केव्हाही भ्रष्ट करू शकतात. मग त्या हव्यातच कक्षाला? उलट सामान्य माणसाच्या हितासाठी केलेल्या कार्यात जे समाधान व आनंद आहे, तो चिरकाल टिकणारा आहे. तो माझ्यापासून कधीही कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.
त्याच्या या उत्तराने तो शिष्य भारावला अन त्याने कन्फ्युशिअसच्याच मार्गाने जाण्याचा निश्चय केला…..
Leave a Reply