केवढं मोठं ज्ञान तो साधा टॅक्सीवाला मला देऊन गेला होता. हॉर्न माणसांसाठी नसून जनावरांसाठी असतो, हे हॉर्नच गाडीला असण्यामागचं कारण असेल याचा विचारच मी कधी केला नव्हता. बऱ्याच वेळेला आपण एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यावरून किंवा पेशावरून जोखण्याची चूक करतो.
मन की बात..
‘टॅक्सीवाल्याची शिकवण’ ही माझा लेख ‘दैनिक सकाळ’, पुणे व नगर आवृत्तीत ‘मुक्तपिठ’या सदरात नुकताच प्रसिद्ध झाला आणि माझ्या पुणे, नगर येथील परिचितांच्या प्रतिक्रीयांचा ऐन थेडीत सकाळापासून भरभरून पाऊस पडला..
छापून आलेलं असं काही हे माझं पहिलंच नाही. गेली दोन वर्ष माझ लिखाण महाराष्ट्रात कुठं न कुठं छापून येतंच आहे. परंतू काहीतरी माझ्या नांवाने छापून येतंय आणि ज्ञात-अज्ञात वाचक माझे शब्द वाचतायत याचा मला होणारा आमंद माझा पहिला लेख छापून आला होता तेंव्हा झाला होता तेवढाच आजही आहे.
जग कितीही रंगीत झालेलं असलं तरी काळ्या-पांढऱ्याची (ब्लॅक अॅन्ड व्हाईट) जादू आजही कायम आहे. लिहित्या हाताला तर ही जादू आणखी मोहवते. आपलं काही पांढऱ्या कागदावर काळ्या शाईत छापून येणं ही आजही जगभरच्या नामवंत लेखकांच्या दुनियेत अभिमानाची बाब असते तिथे माझ्यासारख्या नवख्या लेखकाचा आनंद काय वर्णावा..! मग भले त्या लिखाणाचं आयुष्य काही तासाचं का असेना..कोणीतरी दूरचं ते वाचतंय आणि त्या मनाला ‘ह्या हृदयीचं त्या हृदयी’ भिडतंय ह्यापेक्षा मोठी आमंदाची गोष्ट कोणती असूच शकत नाही..
कि-बोर्ड आणि स्क्रिन पाहात मोठ्या झालेल्या नविन पिढीला कदाचीत कागद आणि लेखणीचं नातं चटकन कळणार नाही. पण ज्या दिवशी त्यांना हे नातं उमजेल त्या दिवशी ती पिढी ‘मॅच्युअर्ड’ झाली असं मानायला हरकत माही..दुनिया कितीही पेपरलेस झाली तरी पेपरची जादू या जगाच्या अंतापर्यंत ओसरणार नाही..
एशियाटीक लायब्ररी ते चर्चगेट स्टेशन हा टॅक्सीने जेमतेम १५-२० मिनिटांचा प्रवास. पण हा प्रवास इतका समृद्ध आणि इतक्या दूरचा होईल याचा मला कल्पनाच नव्हती..पुणे, नगरच्या या अदृष्य प्रवासात टॅक्सीवाला टॅक्सी चालवत होता पण त्यावा रस्ता दाखवला माझे आजपर्यंत कधीही न पाह्यलेले असेच कलंदर मित्र श्री. आशिष पेडणेकर यांनी.
श्री. पेडणेकरांचा परिचय पूर्वीचा असला तरी तो ‘व्हर्च्युअल’ होता. सोशल मिडियावर आपण मारे एकमेकांचे ‘मित्र’ वैगेरे असतो पण तो मित्र कुठे राहातो, काय करतो हेच माहित नसतं..माझं आणि पेडणेकरांचं तसंच झालं. आता इतक्या महिन्यांनंतर कळलं की ते माझ्या शेजारीच दहिसरला राहातात म्हणून..! किती जवळ? तर, अगदी माझ्या घरातून जोरात शिटी मारली की त्यांना ऐकायला जाईल, इतक्या जवळ..! सोशल मिडिया, टेक्नाॅलांजी यांनं जग छोटं झालं असं म्हणतात पण ते तितकंच झूठही आहे असं मला वाटतं..जग अंतरा-वेळेने छोटं झालंही असेल पण माणसा-माणसातलं अंतर मात्र वाढलंय हे खरं..
माझ्या प्रवासाची ती १५-२० मिनिटं समृद्ध करणाऱ्या त्या अनाम टॅक्सीवाल्याचे आभार मानतो आणि थांबतो..
मुळ लेख वाचला नसल्यास जरुर वाचा…
— नितीन साळुंखे
9321811091
salunkesnitin@gmail.com
Leave a Reply