सूत्रातील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे “भूक ”
जशी पोट भरल्याची जाणीव आहे, तशी ही जाणीव पण प्रत्येकालाच असते.
आयुर्वेदात याला तेरा वेगांपैकी एक वेग, असं संबोधले आहे.
समजून घेण्याच्या दृष्टीने भूक म्हणजे चुलीतला विस्तव.
हा पुनः वय, देश, काल यानुसार कमी जास्त होतो.
आवडीचा पदार्थ असला तर भूक जास्तच लागते.
आवडीचा पदार्थ नसला तर असलेली भूक पण नाहीशी होते.
“आज कशी मस्त भूक लागलीय,
काय बनवलंय ग जेवायला ? ”
असं सौ ला विचारावं आणि तिनं उत्तर द्यावं,
” शेपूची परतलेली भाजी.”
म्हणजे तोंड कारल्यापेक्षा कडू होतं. आणि भूक कुठल्याकुठे पळून जाते. जणु काही सणसणीत पेटलेल्या विस्तवावर पाण्याने भरलेली बालदीच जणु काही. !
चुलीत जेवढा विस्तव असेल, तेवढं पातेल वर ठेवावं. आणि त्यात तेवढंच शिजायला ठेवावं, नाहीतर त्या बिरबलाच्या खिचडीसारखं ! तळ्याच्या काठावर पेटलेल्या शेकोटीनं तळ्यात असलेल्या माणसाची थंडी कशी कमी होणार ? चुलीतल्या एका लाकडावर पातेल्यातील हाडकं कशी शिजणार ?
भूक कमी असताना जेवलेलं कसं पचणार ? आणि कधी ?
ऋतुनुसार भूक बदलत जाते.
हिवाळ्यात भूक जास्तीच लागते, तशी पावसाळ्यात नाही. म्हणून पावसाळ्यात जीभेवर बराच संयम हवा.
हिवाळ्यातील ही भूक म्हणजे जणु काही पावाची भट्टीच ! आत प्रचंड उष्णता आणि बाहेरून कडेकोट बंदोबस्त. या दाबाखाली कोंडलेली उष्णता ही जास्त तीव्र असते. म्हणून हिवाळ्यातील आहार पचायला जड घेतला तरी नैसर्गिक भूक वाढलेली असते.
कोकणापेक्षा घाटमाथ्यावर हवा एरव्ही सुद्धा थंडच असते. भूकही जास्तच असते. आहारही जास्त असतो. त्याचा परिणाम शरीरयष्टी पण तशीच बनते.
हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या पंजाब हरियाणा या राज्यात भूक जास्तच असते. तसा आहारही ! कसे दिसतात बघा ना, पंजाबी हरियाणवी लोक. मजबूत आडवा बांधा. त्यांचे लस्सीचे ग्लास देखील किती मोठ्ठे असतात ! भूकच तशी असते.
जशी भूक आहे, तसे पातेले. म्हणजे जेव्हा, जेवढी भूक लागते, तेव्हा, तेवढे खाऊन घ्यावे.
भूक लागलेली आहे आणि जेवला नाहीत तर ? चुलीवरील पातेलं करपून जाईल, जळून जाईल ना !
आणि भूक लागलीच नाहीये तर झिरो फ्लेम गॅसवर चुल्लुभर पानी भी गर्म नही होगा !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
14.08.2016
Leave a Reply