आपण आहार का घेतो ?
…..शरीराचं नीट योग्य पोषण होण्यासाठी.
कशासाठी व्हायला हवे पुष्टीपोषण ?
…..शरीरातील धातूंची क्षमता वाढण्यासाठी.
कशाला हवी धारणक्षमता ?
……निरोगी रहाण्यासाठी
निरोगी जगायचे कशासाठी ?
…..पुरूषार्थ पार पाडण्यासाठी
पुरूषार्थ म्हणजे काय ?
…..धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ आहेत. ते मिळवण्यासाठी जगायचे.
त्यासाठी काय करायला हवे ?
…..चांगले आरोग्य मिळवायला हवे.
*धर्मार्थ काम मोक्षाणाम्
आरोग्यं मूल उत्तमम् ।।
यासाठी आरोग्य चांगले हवे
शरीर मन बुदधी इंद्रीये शुद्ध हवीत.
म्हणून यांचे धारण चांगले हवे.
म्हणून पोषण उत्तम हवे.
म्हणून आहार चांगला हवा.
हे सर्व चांगले, चांगल्या आहारातूनच मिळते.
आहार हेच सर्वश्रेष्ठ औषध आहे.
आहारचे एक शास्त्र आहे.
शास्त्र ते, ज्याला विधी आणि निषेध असतात. म्हणजे आजच्या भाषेत do and don’ts असतात.
हे असे करावे. हे खावे, हे खाऊ नये, हे खाल्ले तर असा परीणाम दिसतो. हे कोणी लिहिले आहे ?
भारतातील ऋषीपरंपरेनी, अनुभव, अभ्यास आणि साधना यांद्वारे हे सिद्ध करून वापरण्यास योग्य असा शिक्का मारून दिलेले आहे.
इदं आगम सिद्धत्वात…..
शंका न घेता, थेट वापरायला सुरवात करा. आणखी प्रयोग करण्यात तुमचे आयुष्य खर्च करू नका. असे वचनच जणु काही हे ऋषी आम्हाला देत आहेत.
दुध वापरावे ते गाईचेच.
म्हणजे म्हैशीच्या, बकरीच्या, गाढवीण, उंटीणीच्या दुधाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच निष्कर्ष काढला गेला. तो असा आहे, की यासर्वांपेक्षा गाईचे दूध चांगले आहे.
या ऋषींनी केलेला अभ्यास किती सूक्ष्म दृष्टीने केलाय, त्याची एक झलक सांगतो.
दूध गाईचेच वापरावे.
एवढ्यावरच प्रकरण थांबवलेले नाही.
ते दूध पिवळ्या रंगाच्या गाईचेच असावे. म्हणजे या एका निष्कर्षातून त्यांनी असे सूचीत केले की, आम्ही करड्या, लाल, पांढर्या, काळ्या रंगांच्या गाईंच्या दुधाचा, पिवळ्या रंगाच्या गाईच्या दुधाशी तौलनिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, हा निष्कर्ष काढला आहे की, दूध पिवळसर रंगाच्या गाईचेच असावे.
दुधाचेच दही करतात. पण हे दही तांबू रंगाच्या गाईचे नको.
ते उत्तम प्रतीचे असण्यासाठी ती नीलगायच हवी.
उत्तम तूप मिळण्यासाठी गाय काळ्या वर्णाचीच हवी.
गोमूत्र तांबू गायीचे श्रेष्ठ तर शेण पांढर्या रंगाच्या गाईचे उत्तम असते.
उत्तम शेण कोणते ? हा निष्कर्ष काढताना, अन्य रंगांच्या गाईचे शेण वापरून आलेले निष्कर्ष हे तुलनात्मक पांढर्या रंगाच्या गाईचेच श्रेष्ठत्व दर्शवते.
प्रायश्चित म्हणून पंचगव्य वापरायचे असेल तरीही रंग बदलतात, मंत्रही बदलतात.
आणि रोगानुसार वापरायचे असेल तर गाईंचे रंग पुनः बदलतात.
जर ह्दयरोगासाठी वापरायचे असेल तर पंचगव्य लाल रंगाच्या गाईचेच वापरावे असेही ऋषींनी सांगितलेले आहे.
किती दृष्टिकोन वापरून केलेला अभ्यास आहे हा !
हेच खरे त्रिकालबाधीत संशोधन आहे. काळ बदलला तरी ऋषींनी केलेली संशोधने ही त्रिकाल अबाधीतच आहेत.
ऋषींनी केलेला हा तुलनात्मक अभ्यास जर आम्ही पुराणकालीन म्हणून सोडून दिला तर आमच्यासारखे करंटे आम्हीच !
ही संशोधने नुसती तपासून पहायची म्हटली तरी शंभर वर्षाचे संपूर्ण निरोगी आयुष्य पुरे पडणार नाही.
जर आम्हाला भविष्याचा वेध खरच घ्यायचा असेल तर आमचे पुराणग्रंथ हा पाया आहे.
आजच्या काळातील, दरवर्षी बदलत जाणारी, केवळ एक कागदी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेली, तकलादू संशोधने काय कामाची ? ज्यांना काही पायाच नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
30.08.2016
Leave a Reply