काळ बदलला. तश्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलत गेल्या. नियमाला अपवाद असलेल्यांची संख्या पण वाढू लागली.
जंगली कुत्रे फक्त मांसाहारी होते, पण कुत्र्यांना माणसाने पाळण्यास सुरवात केली आणि कुत्रा भाकरी पोळी दूध भात खाऊ लागला. मांजर पण तसेच. लहानपणापासून आयते अन्न खायची सवय लावल्याने ते हा आहार निमूटपणे घेतात, एवढेच ! याऊलट पाळलेली शेळी किंवा गाय कितीही ऊपाशी ठेवली तरी मांसाहारी पदार्थांकडे ढुंकूनही पाहत नाही. आणि सर्कशीतल्या पाळलेल्या वाघ सिंहाला कितीही उपाशी ठेवा, ते गवताला तोंडही लावणार नाहीत.
जे फक्त शाकाहारी होते ते पाणघोडेदेखील मांसाहार करू लागले आहेत म्हणे. कदाचित त्यांचे नैसर्गिक अधिवासातील अन्न संपल्यामुळे काही माकडेसुद्धा मांसाहारी बनू लागली आहेत.
पण शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीमधेच निसर्गदत्त मूलभूत फरक असतो असे लक्षात येते.
शाकाहारी प्राणी स्वभावतः शांत असतात. त्यांच्या जवळ जावे, अंगावरून हात फिरवावा, असे वाटते. अगदीच माजावर आलेला बैल किंवा हत्ती सोडला तर इतर प्राण्यांची भीती वाटत नाही.
जन्म घेतल्यावर लगेचच या शाकाहारी मंडळीचे डोळे उघडलेले असतात. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे अकरा दिवसांची वाट पहावी लागत नाही. गाईचे पाडस असो, किंवा हरणाचे, जन्मल्यानंतर लगेच अकरा सेकंदात डोळे ऊघडून या नव्या जगाकडे बघू लागतात.
कुतुहल असते, नव्या दुनियेचे आणि भीती देखील पुनः मृत्युची. आधीचा मृत्यु आठवत असतो. जन्म आणि मृत्यु च्या या फेऱ्यातून मुक्त होण्याची धडपड अव्याहतपणे चालू असते. आधीच्या जन्मातला, जगण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक संस्कार, इथे लक्षात ठेवला जातो. आचरणात आणला जातो. मग तो शाकाहारी असो वा मांसाहारी !
मातेच्या स्तनात पय निर्माण “तो” करतो. आणि त्या पयापर्यंत कसे पोचायचे हे सुद्धा तोच शिकवतो. नुसते पोचणेच नाही तर स्तनापर्यत पोचल्यावर दूध कसे आचूषण करायचे आणि कसे गिळायचे, हे आई शिकवत नाही. ते जन्माआधीपासूनच शिकलेले असते. दूध कसे आणि कुठुन मिळवायचे, हा आधीच्या जन्मी झालेला संस्कार या जन्मातदेखील लक्षात राहील्यामुळे पोट कसे आणि कुठुन भरायचे याची आठवण ठेवलेली असते.
जगण्यासाठी, भूक भागवण्यासाठी खायचे प्यायचे असते, ही आठवण जर त्याने ठेवलीच नसती तर काय झाले असते ?
जगणेच संपले असते.
जगणे आहे म्हणजे निदान गिळले तर पाहिजे ही भावना जन्मापासूनच जागृत असते, ती अगदी मृत्युपर्यंत…..
पुढच्या जन्मात लक्षात ठेवण्यासाठी !
अनंताच्या प्रवासातील, अनंत आठवणींचा ठेवा फक्त आपल्यासाठी !!
“HE” is simply great !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
29.09.2016
Leave a Reply