पानाची जवळपास अर्धी बाजू या तिखट पदार्थांनी व्यापलेली असते.
सुरवात गोड पदार्थांने करावी, नंतर आंबट तिखट.
चवी चवीनं जेवावं. पूर्ण आस्वाद घेत जेवावं. एका पदार्थाचा ओघळ दुसऱ्या पदार्थात जावून, दोन्ही पदार्थांचा स्वाद बिघडू नये, यासाठी पानात द्रोण किंवा वाट्या असतात. केळीच्या पानापासून हे द्रोण बनवले जायचे. त्याचा तळ हा डुगडुगणारा असे, किंवा आमटी, भाजी वाढेपर्यंत हाताने धरून ठेवावा लागे, नाहीतर वाऱ्याने उडून जाई. नंतर आत सोलकढी ओतली की द्रोण खालून फुटुन सोलकढी वाहूनही जाई. किंवा दोन्ही हातांनी त्या द्रोणाच्या दोन्ही कानाना धरून हळुवार उचलून ओठाला लावून पिऊन टाकल्यावर, दिग्विजय केल्यासारखे बाजुच्या माणसाकडे बघीतले जायचे, आठवतंय ते सारं ! चवीनं जेवणं ही सुद्धा एक कला होती.
उजव्या बाजूची उसळ खाताना उसळीचे तिखट हाताला लागे, तोच हात डाव्या बाजूच्या कोशिंबीरीत गेला तर कोशिंबीरीची अस्सल चव बिघडू नये, यासाठी मधे बोटे धुवावीत. तिखट भाजी खाल्ली आणि चटणी चाटायची असेल तर बोटं धुण्यासाठी एक पाण्याचा वाडगा मधे ठेवलेला असे. आणि या पाण्यातही केशराच्या कांड्या घातलेल्या असत म्हणे ! ”
जेवण झाल्यानंतर देखील हात धुवायला चंदनाचे पाणी वापरले जाई. जेवताना जे तिखट हाताबोटांना लागले आहे, त्याचा उष्ण गुण बोटांना त्रास देऊ नये, किंवा जेवलेल्या मसाल्याचा वास बोटांना राहू नये म्हणूनही असेल कदाचित! पण देवाच्या षोडशोपचार पूजेमध्ये देखील नैवेद्य झाल्यानंतर, हस्त प्रक्षालन, मुख प्रक्षालन झाल्यावर करोदवर्तनार्थे चंदनं समर्पयामी असे म्हणून देवाच्या हाताबोटाना चंदन लावण्याचा उपचार आहे. जे जे देवासाठी ते ते देहासाठी, या न्यायानुसार आमच्या पूर्वजांनी या परंपरा पाळण्याचा प्रघात काही काळपर्यत सुरू ठेवलेला होता.
हे अतिच होतय हो !” असं वाटणं चुक नाही. कारण ही गोष्ट आहे, आमच्या पणजोबांच्या काळातील ! पण सांगितलीच नाही तर आमच्या पुढच्या पिढीला कसं कळणार, कधी कळणार, चवीनं कसं जेवायचं ते !
समृद्ध संस्कारांचा वारसा “व्वाह व्वा” चे रूपांतर “वाॅव” मधे करणाऱ्या पिढीला समजला तर पाहिजे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
16.11.2016
Leave a Reply