गव्हाचा सर्वात जास्त वापर पंजाब हरयाणा मधे होतो. हरियाणाला तर गव्हाचे कोठारच म्हणतात. या राज्यांमधे गव्हाचा अतिवापर व्हायला लागला आणि पंजाबी जाट लोकांचे कोलेस्टेरॉल वाढू लागले असे संशोधन सोलापूरचे सुप्रसिद्ध वैद्य बागेवाडीकर शास्त्रींनी आपल्या एका व्याख्यानात सांगितले होते.
आणि ते खरेही वाटते. धर्मेंद्रचे आहाराचे डायलॉग कसे होते ?
“मक्के की रोटी, सरसोंका साग, बैगन का भरता और गाजर का हलुआ, व्वा, मां तूने कैसे पहचान लिया मुझे ये खाना पसंद है ?
विनोदाचा भाग सोडून देऊया, पण गव्हाचा वापर अति व्हायला लागला आणि त्याच्या चिकटपणामुळे कोलेस्टेरॉल वाढू लागले हे व्यावहारिक सत्य दिसते.
गहू पचण्यासाठी तापमान पण तसेच थंड लागते. समुद्रसपाटीच्या खाऱ्या हवेत तो कसा पचेल ?
सध्या चायनीजचे वारे सुरू आहेत. प्रत्येक खेडेगावात सुद्धा जी चायनीज सेंटर गल्लीबोळातून सुरू झाली आहेत. त्यामधे रोटी कुठे मिळते ? केरळमधे रोटी कुठे मिळते ? जिथे जे पिकते तिथेच ते पचते. हा सिद्धांत विसरून चालणारच नाही.
कोकणातील वाढत्या मधुमेहाचे आणि कमी होत नसलेल्या चरबीचे, एक कारण गहू सुद्धा आहे, हे कटूसत्य पचनी पडणारे नाही. असो.
गहू न धुता, आपण वापरतो हा आणखीन मोठ्ठा दोष. जे धुवुन वापरतात, ते त्यातल्या त्यात समाधानी. पण न धुता वापरतात त्यांना धोक्याचा इशारा….
गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन पंजाबमधे होते.
भारतात सर्वात जास्त रसायने आणि खते गव्हासाठी पंजाबमधे वापरली जातात.
बाजारात आलेला गहू पंजाबचा असू शकतो.
भारतात सर्वात जास्त कॅन्सरचे रूग्ण पंजाबमधे आहेत.
पंजाब मधून राजस्थान मधे आठवड्यातून दोन वेळा जाणारी, एक ट्रेन आहे, तिचे नाव आहे कॅन्सर स्पेशल !!
या पार्श्वभूमीवर गहू न धुता वापरणे किती धोकादायक आहे याचा विचार करून पहावा.
नुसता पाण्यात बुचकळून काढला तर हे विषारी केमिकल जात नाही, कारण या गव्हाला जी खाच आहे, त्या खाचेत या खताचा अंश चिकटून रहातो, जो दररोज आपल्या पोटात जातोय.
भीती निर्माण करण्यासाठी हे सांगतोय, असं नाही तर जागरूकता होण्यासाठी सांगतोय , हे लक्षात घेऊया.
अन्य काही रोगांचे हेतू ( म्हणजे कारण ) असलेले मूळ कारण जोपर्यंत दूर केले जात नाही, तोपर्यंत विषे दूर करणारी सोन्यासारखी कितीही औषधे वापरा…. काऽऽही फरक पडणार नाही.
आयुर्वेद सांगतो, रोगाच्या मूळ कारणाचा शोध घ्या आणि ते कारण दूर करा.
आज रोगांचे प्रमाण ( संतर्पणजन्य व्याधी म्हणजे ) विशेषतः चरबी वाढल्यामुळे होणारे रक्तदाब, ह्रदयरोग, मधुमेह, पोट सुटणे, मासिक पाळीच्या समस्या इ.इ. आजार वाढले आहेत.
केवळ सणासुदीला वापरला जायचा तो पचायला जड असणारा, मधुर रसाचा, स्निग्ध गुणाचा, जगण्यासाठी पाणी जास्त घेणारा, त्यामुळे कफ दोष वाढवणारा, गहू आपल्याकडे दैनंदिन आहारात येऊन बसल्यावर दुसरे काय होणार ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
26.10.2016
Leave a Reply