आंबट आणि तिखट या मिश्र चवीचा एक पदार्थ म्हणजे लोणचे.
पानातील डाव्या बाजूला वाढलेल्या लोणच्याला डाव्या बाजूचा राजा म्हटलं तरी चालेल, एवढा मान या लोणच्याला भारतीय जेवणाच्या दुनियेत आहे. आणि पानामधे स्थान पण अगदी वर. राजाचेच.
भारतीय म्हणण्याचे कारण, हा अस्सल भारतीय प्रकार आहे. कारण त्यात वापरले जाणारे मसाले, हे मूलतः भारतातीलच आहेत.
एकेकाळी भारत हाच सर्व जगाला मसाले पुरवित होता. भारताचा इतर देशात असलेला व्यापार हा मसाल्याच्या पदार्थामुळे दरवळत होता. काही परदेशी नागरीकांना तर भारतातील मसाले देणारी झाडं ही जादूची झाडं वाटंत.
काय कमाल आहे ना ईश्वराची, एकाच जमिनीमधे आंबट चिंचेचे झाड, तुरट सुपारीचे झाड, या हलणाऱ्या डुलणाऱ्या सुपारीच्या झाडाला, जणुकाही ते वाऱ्याने पडू नये म्हणून, घट्ट बिलगून राहिलेली तिखी मिरीची वेल. या पोफळीच्या सावलीत, मातीला अगदी कुशीत वाढणारी मंद वासाची वेलची, कळीरूपातच वापरली जाणारी लवंगाची मध्यम आकाराची झाडे, तर काहीसे मोठे होणारे आणि एकाच झाडाच्या सालीतून मिळणारी दालचिनी आणि पानातून मिळणारे तमालपत्रे, असे दोन वेगळे फ्लेवर देणारे दालचिनीचे झाड. फळ फोडून आतला सुवास देणारे जायफळ, आणि भूगर्भातच तयार होणारी काहीशी कडवट चवीची पिवळी धम्मक हळद,
हे सर्व वेगवेगळ्या वासाचे, वेगवेगळ्या रंगाचे, चवीचे पदार्थ, एकाच पाण्यावर पोसले जातात. पण, कडु तिखट आणि तुरट ( कटु तिक्त कषाय ) या वेगवेगळ्या औषधी गुणांनी भरलेले
(असतात. (एकही मसाला, मधुर अम्ल लवण रसाचा नाही.)
माती, पाणी, सूर्यप्रकाश हवा एकच असते, पण विविधता किती दिसते. खरंच गाॅड इज ग्रेट !
या लोणच्यात हिंगासारखे काही पाश्चात्य मसालेपण येऊन बसलेत. पण या विविधतेला एका बरणीत सामावून घेणारे हे भारतीय लोणचे.
हळद, मेथी, हिंग, मीठ, मिरची, मोहोरी, तेल हा मुख्य मसाला, काही फोडींना लावला की झाले लोणचे तयार. पण ते टिकाऊ होण्यासाठी, बाहेरचा जंतुसंसर्ग टाळला जावा, यासाठी सर्व फोडी बुडतील एवढे तेल आणि त्यांना सर्व बाजूनी दाबून टाकणारा एक गोल दगड, आणि चिनी मातीच्या, फिरकीच्या झाकणाच्या बरणीत दादरा बांधून, आमच्या देवघरात वर ठेवलेली लोणच्याची बरणी, माझ्या अजूनही लक्षात आहे.
हे लोणचे त्यातील या वेगवेगळ्या मसाल्यामुळे एवढे औषधी बनले आहे, की ते औषध म्हणूनच पानात वाढून घ्यावे, एवढेच त्याचे प्रमाण. डाव्या बाजुचा पदार्थ तिथेच रहावा, तो उजव्या बाजूला आला की साईडइफेक्ट सुरू.
मग ते लोणचे कैरीचे असूदेत नाहीतर लिंबू मिरचीचे. नाहीतर गाजरा कारल्याचे ! औषधी गुण जवळपास तेच. फोडींनुसार बदलणारे. पण मसाला तोच.
काही लक्षात येतंय का ?
हा सर्व मसाला म्हणजे मधुमेहावरील औषधांचे मिश्रणच आहे. आणि फोडी जर आवळ्याच्या किंवा ओल्या हळदीच्या असतील तर ???
जैसे घी मे शक्कर.
इन दोनोंका आजके जमाने मे दिखनेवाला साईड इफेक्ट, याने कोलेस्टेरॉल और डायबेटीस.
दोनों के उपर काम करनेवाली एकही दवा !
पिकल, लोणचे, अचार माझ्या पानात हवा.!!
पण….
हे अचार बाजारी नको. आणि आचारी सुद्धा !
बाजारी लोणच्यात चार दोष दिसतात.
एक कृत्रिम रंग, दोन हानीकारक प्रिझर्वेटीव, तीन सरकीचे तेल, आणि चार, व्हिनीगर मधे बुडवून ठेवलेल्या फोडी. हे दोष टाळण्यासाठी आणि औषधी फायदे मिळवण्यासाठी उपाय एकच,
हे लोणचे घरीच घातलेले हवे. आईच्या किंवा आज्जीच्या हातचे.
पण घरात वेळ मोडून करणार कोण ?
इथेच तर लोणच्याचा लोच्या आहे ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
03.11.2016
Leave a Reply