जीभेला लागताक्षणी डोळे बंद करायला लावणारी, आणि अंगावर रोमांच उभे करणारी, आंबट पदार्थाबरोबरीची ही एक समाजमान्य चव. लवण म्हणजे खारट चव !
नावडतीचे मीठ अळणी, म्हणणारा हा डाव्या हाताचा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे.
मीठाशिवाय आमटी भात, भाजी ही कल्पनाच करवत नाही. चव वाढवायला हा लवणरस फार मदत करतो मीठाशिवाय पेरू, मीठाशिवाय आवळा, चिंच, बोरे. छे ! मजा येणारच नाही. भेळ पाणी पुरीचा धंदा तर या लवणरसाच्या जीवावरच चालतो.
सेंदेलोण, पादेलोण, काळे मीठ, बीड लवण, समुद्र मीठ, सर्व प्रकारचे क्षार, हे सर्व लवणरसाचे प्रतिनिधी आहेत. या प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. सर्वसाधारणपणे लवण म्हणजे खारट चव ही उष्ण गुणाने आपले परिणाम दाखवते. त्यामुळे वात शमन व्हायला मदत करते.
शरीरात जिथे आखडलेपणाची भावना असते, तिथे हा लवणरस शिथीलता निर्माण करू शकतो. म्हणजे व्यवहारात कुठे लचकले, मुरगळले वगैरे तर गरम पाण्यात मीठ टाकून शेक घेतो ना, तो या गुणामुळे.
लवण रस हा आयुर्वेद मतानुसार क्लेद म्हणजे चिकटपणा निर्माण करणारा, गुणाने स्निग्ध असून आणि मलमूत्र वाताला शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करणारा आहे.
याच्या उष्ण गुणामुळे स्नायु शिरा मांसपेशी मधील कडकपणा कमी होतो, आणि स्नायुमधे हलकेपणा निर्माण केला जातो.
गुण स्वभावाने तीक्ष्ण, भेदक, घाम निर्माण करणारा, आणि अंगचे पाणी न वापरता हवेतील पाणी स्वतःकडे खेचून घेण्याच्या (अव)गुणामुळे जखम चिघळवण्याची प्रक्रिया वाढवणारा असतो.
रक्तदाब वाढू नये, यासाठी मीठ जेवणातून बंद करायचा सल्ला आज दिला जातो, तो मीठाच्या याच अवगुणामुळे. (पण हाच अवगुण युक्तीने वापरला तर फायद्याचा देखील होतो. हे रक्तदाब आणि मीठाच्या पाण्याची आंघोळ या आरोग्यटीपेत यापूर्वी लिहिले आहेच.)
खालित्य म्हणजे केस गळवणारा, पलित्य म्हणजे केस पांढरे करणारा, कुष्ठ म्हणजे विविध त्वचारोग निर्माण करणारा, वली म्हणजे त्वचेवर सुरकुत्या आणणारा, सांगितला आहे.
सैंधव मीठाशिवाय बाकी सर्व मीठाचे भाऊबंद डोळ्यांसाठी हितकर नाहीत. म्हणजेच ज्यांना डोळ्यांच्या समस्या असतील, त्यांनी साध्या मीठाऐवजी सैंधव मीठ जेवणात वापरावे.
(आयोडीनयुक्त मीठ हा केवळ बिझनेस आहे, भारतातील एक दोन अतिउंच प्रदेश सोडले तर भारतात कुठेही आयोडीनयुक्त मीठ वापरण्याची आवश्यकताच नाही. हा वेगळा विषय होईल. )
एखाद्या पदार्थातील मीठ कमी झाले असेल तर टीका न करता, तो पदार्थ खावा. जास्ती झाला असेल तर वगळावा. काही जणांना तर वरून मीठ भुरभुरून घ्यायला पण खूप आवडते.पण हे पुढे त्रासदायक ठरू शकते.
जे जे देवासाठी ते ते देहासाठी. या न्यायाने कितीही चविष्ट असले तरी ते ताटात वाढून घ्यायचे नसते. नैवेद्याच्या ताटातून गायब असलेला हे मीठ, एवढे नक्कीच शिकवून जाते, पानात वाढलेले हे मीठ, देवालासुद्धा चालत नाही.
समुद्रातूनच तयार झालेल्या, या लक्ष्मी, चंद्र, धन्वंतरि, विष, अमृत, पारीजात, कामधेनु, यांच्या या सहोदराला, पंधरावे रत्न म्हटले तरी चुक होणार नाही. पण त्याला नैवेद्याच्या पानात स्थान नाही, हे कटु सत्य पचवावेच लागेल.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
05.11.2016
Leave a Reply