गंगोत्री,यमनोत्री हरिद्वारचे पाणी वेगळे, नाशिक सातारा पुण्याचे वेगळे, बार्शी सोलापूर यवतमाळचे वेगळे आणि कोकणाले वेगळे!
म्हणजे पचायला कमी जास्त वेळ घेणारे ! केमिकली एचटुओ. पण फिजिकली त्यात एच आणि ओ बरोबर आणखी कितीतरी रसायने पिण्याच्या पाण्यात देखील आढळतात.
कोकणातले पाणी तर सर्वात प्रदूषित. वरून येणारी सर्व केमिकल, शिवाय समुद्रातून भरतीच्या वेळी नदीमधे मागे फिरणारे पाणी जमिनीमध्ये मुरत जाते. सर्वात जास्त क्षार या पाण्यात आढळतात. जे क्षार कोणत्याही कंपनीच्या फिल्टरना दाद न देता आपल्या पिण्याच्या पाण्यात येऊन बसतात. आणि वर्षानुवर्ष असे पाणी पचवून मोकळे पण होतो. कारण आमच्या किडनींना त्यांची एवढी सवय झाली आहे, की काही वेळा वाटते, कदाचित अतिशुद्ध पाणीच पचणार नाही ! गमतीचा भाग सोडला तर पाणी प्रदेशानुसार, प्रदूषणामुळे पचायला हलके किंवा जड होत जाते.
पण असे क्षारयुक्त पाणी पिऊन मूतखडे वाढले नाहीत, तरच नवल !
स्वर्गभूमी गंगोत्री वगैरे ठिकाणी गांगेय जल मिळते. अति शुद्ध स्वरूपात कोणत्याही प्रकारच्या बाह्य प्रदूषणाशिवाय!
पण तिथे हवाच एवढी प्रसन्न आणि थंड असते की तहानच कमी लागते.
नाशकातले पाणी क्लोरीनजल होते. (क्लोरीनयुक्त पाणी, आजच्या वैज्ञानिक भाषेत हार्ड वाॅटर ) वातावरण रूक्ष, कोरडे, या जड पाण्यातील पांढरे क्षार अगदी नळाच्या टोकावर पण जमा होतात. या पाण्यात साबणाचा फेस कमी प्रमाणात होतो.
मुळातच पाण्यासाठी तहानलेली ऊत्तरपश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील दुष्काळी गावे ओलावा धरून ठेवणारी. जरा पाणी पडलं तरी ते वाया जाऊ न देणारी तिथे असणारी काळी माती. या जमिनीचे पाण्याचे गुणधर्म वेगळे.
आणि कोकणात साॅफ्ट वाॅटर असते. साबणाचा भरपूर फेस तयार होतो. वातावरण दमट, ह्युमिडिटी जास्त. घामही दणकून येतो. आणि तहान कमी करण्यासाठी पिले जाणारे पाणी सर्व तऱ्हेच्या क्षारांनी युक्त. विहिरीतले पाणी देखील पन्नास किमीवर समुद्र असल्यामुळे क्षारयुक्तच असते. नदी बारा गावातून फिरत येते.
तेच पाणी पिऊन कोकणातला माणूस म्हणतो, मी बारा गावचं पाणी प्यायलेला माणूस आहे. मग मुतखड्याशिवाय दुसरं काय होणार ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
12.12.2016
Leave a Reply