मुंबई शहराबद्दल बरंच काही लिहिलं-बोललं गेलेलं आहे. त्यात आता ही नवी भर कशाला असं वाटणं सहाजिकच आहे. मात्र या लेखमालेत मुंबईच्या इतिहासाच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांकडे नजर टाकण्याचा एक वेगळा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुंबईतली दळणवळण साधने, रस्तावाहतूक, ट्राम, रेल्वे, टॅक्सी-रिक्शा यापासून थेट आत्ताच्या मेट्रोच्या होऊ घातलेल्या जाळ्याकडे एक नजर टाकलेय. मुंबईतली घरबांधणी आणि त्यातील स्थित्यंतरे, म्हाडा, मुंबईतली “चाळ”संस्कृती, सहकारी गृहनिर्माण संस्था, एसआरए, क्लस्टर कॉक्रिट टॉवर्स आणि इतर बरंच काही….. याबद्दल वाचा या लेखमालेत…
मुंबईच्या इतिहासातील रंजक गोष्टींची माहिती घेण्यापूर्वी अगदी थोडक्यात मुंबईचा इतिहास बघायलाच हवा.
शिलाहार राजवटीतील बिंब नावाच्या राजाने महिकावती (माहीम) शहर वसवले आणि तेथे किल्ला बांधून आपली राजधानी वसवली. त्याची कुटुंब देवता ‘प्रभादेवी’ ही होती असे म्हणतात. या राजाच्या राजवटीत लोक सुखी होते. जमीन, महसूल, न्याय वगैरेच्या बाबतीत बिंब राजा न्यायी व आदर्श होता.
नंतर अनेक राजसत्तांनी मुंबईवर राज्य केले. १७३९ साली ब्रिटीशानी मराठी राजेशाही कमकुवत झाल्याचा फायदा घेऊन साष्टी बेटावर आपला कब्जा केला. तोपर्यंत पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याच्या अतिमहत्त्वाकांक्षेने आणि अतिउत्साहाने इथल्या लोकांचा अनेक प्रकारे छळ केला. त्यांनी हिंदूंची अनेक देवळेही भ्रष्ट केली. वान्द्रयापासून वसई पर्यंत अनेक ठिकाणांचे ख्रिस्तीकरण झाले होते.
पोर्तुगीजांकडून साष्टी बेटे इंग्रजांकडे गेल्यामुळे मुंबईचे गोवा झाले नाही हे आपले नशीब. ब्रिटीशांचा ख्रिस्तीकारणापेक्षा राजकारण करण्याकडे विशेष मुत्सद्दी दृष्टीकोन होता. त्यांना केवळ व्यापार करायचा नव्हता तर येथे राज्य करायचे होते. त्यामुळे त्यांनी त्याचदृष्टीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती.
माझगाव, परळ, वरळी हा भाग म्हणजे त्यावेळची मुख्य मुंबई. येथे कोळी, भंडारी समाज राहत होता. परळ व शिव येथे कुणबी राहत. माहीम भागात बरेचसे मुसलमान, थोडे प्रभू आणि साष्टीमधून आलेले काही ब्राह्मण अशी वस्ती होती. १६७० मध्ये सुरतेहून व्यापाराच्या निमित्ताने गुजराती बनियावर्ग येथे आला. तेंव्हापासून गुजराती वस्ती वाढू लागली.
इंग्रजांच्या ताब्यात मुंबई आली त्यावेळची मुंबईची लोकसंख्या जेमतेम दहा हजारांच्या आसपास होती. १८७५ मध्ये ती ६० हजारांवर गेली. यामध्ये ब्राह्मण, पाठारे प्रभू, पाचकळशी, माळी, ठाकूर, भोई, आगरी इत्यादि जमातीची मंडळी होती.
मुंबईत कापडाच्या गिरण्या मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आणि मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. १९२० ते १९३० च्या दरम्यान मुंबईची लोकसंख्या १० लाखांच्या वर गेली.
किल्ल्याबाहेरच्या आधुनिक मुंबईचा जन्म :
१८२० ते १८३० च्या दरम्यान टुमदार मुंबई शहर ४५०० चौरस मैल परिघाच्या किल्ल्याच्या आतल्या बाजूला वसलेले होते. निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या मुंबईची लोकसंख्या केवळ अडीच लाखाच्या आसपास होती. किल्ल्याच्या तटबंदीबाहेर १००० यार्डापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास कुणाला परवानगी नव्हती.
१८२९ साली गव्हर्नरने आपले राहण्याचे ठिकाण किल्ल्याबाहेर हलवण्याचे ठरवले. त्याआधी जवळजवळ ७० वर्षे मुंबईचा गव्हर्नर अपोलो स्ट्रीटवर वास्तव्याला असे आणि तेथूनच मुंबईचा कारभार बघत असे. गव्हर्नर किल्ल्याबाहेर रहायला गेला म्हटल्यावर अनेक श्रीमंत लोकांनीही परळ, माझगाव, भायखळा, मलबार हिल वगैरे भागात वस्ती करायला सुरुवात केली.
एक गमतीशीर गोष्ट म्हणजे आज आकंठपणे बिअरबार संस्कृतीमध्ये बुडालेल्या मुंबईत पहिल्यांदा प्यायचा सोडा मिळू लागला तो १८३५ मध्ये. बर्फ मिळायला मुंबईकरांना आणखी २ वर्ष वाट बघायला लागली.
१८३८ साली मुंबई आणि लंडन यामधील नियमित टपाल सेवा सुरु झाली. ही आणि अशीच रंजक माहितीही बघूया कालांतराने येणार्या काही लेखांमध्ये…..
— निनाद अरविंद प्रधान
व्यवस्थापकीय संपादक, मराठीसृष्टी
www.marathisrushti.com
मुंबईच्या रंजक इतिहासातील टप्पे – भाग १
(क्रमशः)
अतिशय सुंदर व अभ्यासपुर्ण माहिती तरुण पिढीला इतिहासाची योग्य व अचूक माहिती करून देण्याचे मोठे कार्य ह्या अशा डिजिटल माध्यमातुन होतं आहे त्याबद्दल खास अभिनंदन.