संदर्भ – वाग्भट तृष्णा चिकित्सा अध्याय
तहान हा जेव्हा रोग होतो, तेव्हा हा रोग कमी होण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. ही तहान पण तीन प्रकारची लागते. वाताची, पित्ताची, आणि कफाची. त्यातील सूक्ष्म फरक वैद्यांच्या लक्षात येतो. यासाठी वैद्यांच्या अनुभवाचा आणि ग्रंथोक्त ज्ञानाचा फायदा घ्यावा. पण सर्वसाधारणपणे पाणी पिऊनदेखील जर तहान शमली नाही तर काय करावे, ते उपाय पाहूया.
जांभळाची किंवा आंब्याची कोवळी पाने चघळून खाल्ली असता, अति तहान कमी होते.
सर्व प्रकारची तहान कमी होण्यासाठी पावसाचे वरच्यावर धरलेले पाणी मध घालून प्यावे अथवा मातीचे ढेकूळ किंवा कौल किंवा वाळू तापवून पाण्यात विझवून ते पाणी गाळून साखर घालून प्यावे किंवा दर्भ नावाचे गवत पाण्यात टाकून ते पाणी प्यावे.
लाह्यांचे पीठ करून साखर आणि मध घालून खीर करून प्यावी.
साळीच्या लाहयांची कण्हेरी करून प्यावी.
थंड पाण्याने स्नान करून, थंड गुणाच्या औषधांनी शिजवलेल्या दुधाबरोबर मध साखर घालून जेवावे.
किंचीत आंबट आणि मीठ घालून मुगडाळीचे तुपाची फोडणी देऊन केलेले कढण जेवणात ठेवावे.
दुधापासून दही ताक लोणी बनवून काढलेल्या तुपाचे सहा थेंब नित्य नियमाने दोन्ही नाकपुड्यात घालावे.
याबरोबरच मनाची प्रसन्नता राखावी. नदी, तलाव, डोह अशा शांत थंड जागी जावे. किंवा त्याचे कल्पनाचित्र तयार करून त्यात रमावे.
जेणेकरून तहान शमली जाईल. असे काही शारीरिक आणि मानसिक उपाय करावे. पण उगाचच पाणी पिऊ नये.
काही ठिकाणी युक्ती वापरून लेपन चिकित्सा करता येते. जायफळ, वेखंड, हळद अशा उष्ण औषधींचा लेप थंड पाण्यातून केला असता, दोषांचे पाचन होऊन तृषा कमी होते. किंवा काही वेळा उसाचा रस मध वेखंड अशा औषधी पिऊन उलटी करून टाकल्याने देखील तहान कमी होते.
पाणी सुद्धा पचावे लागते, ते पचण्यासाठी त्यात औषधी घालून पाणी प्यावे. कोणत्याही संस्काराशिवाय पाणी पिणे हे मधुमेह, रक्तदाबवृद्धी सारख्या आजाराचे कारण ठरू शकते.
आयुर्वेदाचे माहेरघर केरळमधे हाॅटेलमधले पाणी देखील मुस्ता, चंदन, सुंठ घालून उकळवून दिले जाते. केरळमधे आयुर्वेद दैनंदिन जीवनात पाण्यातदेखील कसा मुरवलाय, हे हाॅटेलच्या या उदाहरणावरून लक्षात घ्यावे.
नैसर्गिकरित्या लागलेली तहान साध्या पाण्याने कमी होते. पण साध्या पाण्याने तहान कमी झाली नाही तर असे औषधी पाणी प्यावे. सर्वसाधारणपणे मधुमेहात अशी तहान लागते. ही तहान कमी होण्यासाठी साध्या पाण्याऐवजी औषधी पाणी प्यावे. म्हणजे पाण्यापासून वाढणारा क्लेद, म्हणजे चिकटपणा कमी होऊन तहान कमी होते आणि साखरदेखील नियंत्रणात रहाते.
म्हणजेच लागलेली तहान, काही वेळा औषधांनी पण कमी करावी लागते, प्रत्येक वेळी ही तहान फक्त पाण्यानेच भागते, असा गैरसमज नसावा.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
15.12.2016
Leave a Reply