शेंगा, फळं वगैरेतून, त्या त्या झाडांच्या बिया आपण काढतो. धान्यं, कडधान्यं, शेंगदाणे, मोहरी, जिरे, तीळ याही बियाच आहेत. या बियां आपण खाण्यासाठी वापरतो. यापैकी काहींचं तेल काढून तेही आपल्या आहारात वापरतो. दैनंदिन जीवनात वापरता येतील असे अनेक अुपयोगी पदार्थ आणि वस्तू या तेलांपासून बनविल्या जात आहेत. सततच्या वापरामुळे बियांचं खरं स्वरूप आणि त्यांचं दिव्यत्व आपणास जाणवत नाही. कोणत्याही झाडाच्या बी मध्ये, त्या त्या झाडाचे सर्वच्या सर्व आनुवंशिक गुणधर्म, सुप्तावस्थेत सामावलेले असतात.
अितकेच नव्हे तर बियांपासून झाडे निर्माण होणे आणि ती झाडे वयात आली म्हणजे त्यांना फळे येअून त्यात पुन्हा, त्या झाडाचे सर्व आनुवंशिक गुणधर्म बंदिस्त असणार्या बिया निर्माण करण्याच्या जनुकीय आज्ञावल्या असणे ….. हीच ती दिव्यत्वाची बाब आहे. वंशवृध्दी व्हावी आणि प्रत्येक प्रजाती या पृथ्वीवर टिकून रहावी याची पुरेपूर तजवीज निसर्गाने केली आहे. म्हणूनच प्रत्येक झाडाला अनेक फळं येतात, प्रत्येक फळात अेकतरी किंवा अनेक बिया असतात आणि वर्षानुवर्षे त्या झाडाला, प्रजननक्षमता असेपर्यंत, फळं येतच रहातात. पृथ्वीवर त्या प्रजातीची सृजनसाखळी, खात्रीपूर्व अव्याहत चालू रहावी हीच निसर्गाची योजना आहे
हे लक्षात घ्या की या सर्व बाबी दिसतात तितक्या साध्यासोप्या नाहीत. लहानपणापासून आपण त्या पाहत आलो आहोत त्यामुळे त्यातील दिव्यत्व आपल्याला जाणवत नाही. दैनंदिन जीवनातल्या समस्यांनी आपण अितके गुरफटलेले असतो की अितर काही भव्यदिव्य विषयांचा विचार करायला वेळच होत नाही, अितकेच नव्हे तर तशी अिच्छाही होत नाही.
वनस्पतींच्या प्रत्येक प्रजातीचं अेक वैशिष्ठ्य असतं. प्रत्येक वनस्पतीची वंशवृध्दी व्हावी यासाठी निसर्गानं अनेक क्लुप्त्या योजिल्या आहेत. वनस्पतीच्या प्रजातीची बी, जमिनीत पेरली की तिला अंकुर फुटतो आणि त्या त्या प्रजातीचं झाड वाढू लागतं. ही वाढ कशी व्हावी या साठी आनुवंशिक आज्ञावल्या असतात. 3-D प्रिंटर प्रमाणे, मुळं, बुंधा, फांद्या, पानगळ, नवीन फांद्या आणि पालवी फुटणं, फुलंफळं येणं या साठी लागणारा कच्चा माल जमिनीतून घेतला जातो. ठराविक काळानंतर ते झाड वयात येतं. तो पर्यंत, आनुवंशिक संकेत अुलगडण्याची क्रिया सुरू असते. नंतर प्रजननाची प्रक्रिया सुरू होते. झाडाला फळं येतात आणि त्यात बिया तयार होतात. त्या प्रजातीच्या झाडाचे आनुवंशिक संकेत, बियांत बंदिस्त होतात.
आनुवंशिक संकेत आणि आज्ञावल्या यांचे अुलगडीकरण (झाडांच्या स्वरूपात) नंतर आनुवंशिक संकेत आणि आज्ञावल्या यांचं बंदिस्तीकरण (बियांच्या स्वरूपात) ही निसर्गाच्या सृजनसाखळीची योजना आहे आणि ती कोट्यवधी पृथ्वीवर्षापासून सुरळीतपणे चालू राहिली आहे आणि जोपर्यंत पृथ्वीवर वनस्पती जगण्याची, वाढण्याची परिस्थिती आहे तोपर्यंत ती चालू राहणार आहे.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply