कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर खाकरा, बेडका, कफ पडत नाही असा खोकला.
कारणे
श्वासनलिकांच्या अनेक साधारण आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे घशाचा व श्वासनलिकांचा दाह होतो. यामुळे कोरडा खोकला येतो.
लहान मुलांमध्ये टॉन्सिलच्या ग्रंथींवर सूज असल्यास कोरडा खोकला येतो. चाळिशीनंतर घशात कर्करोगाची वाढ असू शकते. यामुळेही कोरडा खोकला येऊ शकतो.
कर्करोगासाठी घशाची ‘आतून’ आरशाने तपासणी करायला लांब दांडीचा आरसा लागतो. उपचाराने कोरडा खोकला 10-15 दिवसांत बरा झाला नाही तर तज्ज्ञांकडे पाठवावे.
उपचार
कोडीनयुक्त खोकल्याचे औषध किंवा गोळी मिळते. हे औषध वयाप्रमाणे अर्धा किंवा एक चमचा दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्याने कोरडा खोकला तात्पुरता थांबतो.
आयुर्वेद
अडुळसा पानांचा काढा कोरडया खोकल्यासाठी फार उपयुक्त आहे. काढा तयार करून दिवसातून 3-4 वेळा द्यावा. आयुर्वेदिक औषधांच्या यादीमध्ये इतरही औषधे आहेत त्यांचा वापर करता येईल. अडुळसायुक्त औषधेही (सिरप किंवा अवलेह म्हणजे चाटण) मिळतात.
आयुर्वेदिक घरघुती उपचार
फुफ्फुसाशी निगडीत दमा, खोकला, अॅलर्जी, सायनस, आदींना दूर ठेवण्यासाठी काही दैनंदिन वापरात येणाऱ्या आयुर्वेदिक घरगुती उपचार उपलब्ध आहेत. काही पदार्थ आपल्या घरातच असतात.पण आपल्याला त्यांचा वापर कसा करावा, हे माहित नसते.
• आले – आले – सुंठ हे फुफ्फुसांसाठी अतिशय चांगले असते. सुंठ उगाळून खडीसाखर घालून आणि शिजवून तयार केलेले चाटणाचे पाक खोकला असलेल्या व्यक्तींनी थोड्या थोड्या वेळाने घेतल्यास बरे वाटते. वारंवार सर्दी होणाऱ्यांना आणि दमा असणाऱ्यांनी सुंठीचा तुकडा टाकून उकळलेले पाणी पिणे उपयुक्त ठरते.स्वयंपाकात मिरचीऐवजी आल्याचा अधिक वापर केल्यास फुफ्फुसासाठी चांगले असते.
• ज्येष्ठमध – ज्येष्ठमध फुफ्फुसासाठी उत्कृष्ट औषध आहे. ज्येष्ठमधाचा काढा घेतल्याने खोकला बरा होतो.
• तुळस – तुळशीचा रस खडीसाखर टाकून थोडा थोडा घेतल्यास छातीती भरलेला कफ सुटण्यास मदत होते.तुळशीची पाने चावून खाल्ल्यास श्वसनाचे आरोग्य सुधारते.
• लवंग – लवंग चघळण्याने दम लागत नाही. लवंग दम्यासाठी औषधाप्रमाणे उपयोगी असते.
• गवती चहा – गवती चहा, ज्येष्ठमध,दालचिनी, तुळस, पुदीना यांचा काढा थोडीशी साखर घालून पिण्याने ताप, खोकला,सर्दी कमी होतो.श्वासाशी संबंधित असलेले त्रास होत नाहीत.
• रुईची पाने – रुईच्या पानांनी छातीवर शेक करणे, श्वसनसंस्थेसाठी उत्तम असते. दम लागत असल्यास, छातीत कफ भरला असल्यास अगोदर ताल लावून वरून रुईच्या पानांनी शेक केल्यास वात आणि कफ दोष संतुलित होतो.
• ओवा – ओवा, ज्येष्ठमध, तीळ एकत्र करून तयार केलेली सुपारी एकत्र करून जेवणानंतर खाण्याने फुफ्फुसाची ताकद वाढते आणि खोकला होण्यास प्रतिबंध होतो.
अशाप्रकारे आयुर्वेदिक घरघुती उपचार केल्यास आजर किंवा व्याधीदूर होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.
— विनीत मासावकर यांनी लिहिलेली ही पोस्ट आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन घेतली आहे.
Leave a Reply