शास्त्रीय संगीतात आपल्या अनोख्या आणि स्वयंभू गायकीने उच्चस्थान निर्माण करणारे पं. कुमार गंधर्व हे पं.सत्यशील देशपांडे यांचे गुरू!
त्यांचा जन्म ९ जानेवारी १९५१ रोजी झाला. लहान मुले खेळताना भिंतीआडून डोकावणाऱ्या एखाद्या भिडूला ज्या सहजतेने आपल्या खेळात समाविष्ट करून घेतात, तेवढय़ाच सहजतेने एखाद्या रागातील एखाद्या वज्र्य स्वराला हळूवार कुरवाळणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आणि उदात्त होती. हाच उदात्त दृष्टिकोन आपल्या जीवनाचे साध्य बनवून संगीताची आराधना करणाऱ्या पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकीचे अक्षरश: झाड फुलवले. विशेष म्हणजे, मा.कुमारजींप्रमाणेच मा.पं.सत्यशील देशपांडेही संगीताच्या बाबतीत कोणत्याही बंधनात अडकून पडले नाहीत. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा प्रकार लोकप्रिय असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे. मा.पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकी साधनेने आत्मसात केली. त्यांनी ज्या सहजतेने आणि तन्मयतेने ख्याल गायकी गायली, त्याच तन्मयतेने त्यांनी ‘लेकीन’ किंवा ‘विजेता’ अशा चित्रपटांमधील गाणीही गायली. ख्याल गायकी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशनसाठी ‘पाच मिनिटांचे शास्त्रीय संगीत’ असा एक पाच मिनिटांचा तुकडा तयार केला होता. संगीताकडे वेगळ्याच दृष्टीने पाहणारा हा सुरांचा गुरू शास्त्रीय संगीत हा फक्त ऐकण्याचा किंवा गाण्याचा विषय नसुन अनुभवण्याचा देखील विषय आहे हे मा.पं.सत्यशील देशपांडे जेव्हा सांगतात ते रसिकांना नक्की पटत असेल. हा अनुभव स्वत: घेण्यासाठी व लुटण्यासाठी सत्यशीलजींनी आयुष्यभर अक्षरशः जीवाचं रान केलं. मुख्य म्हणजे त्यांचे गुरु कुमारजी नेहमीच आधी कुठलीही गोष्ट करुन दाखवायचे व मग त्यावर भाष्य करायचे. कुमारजींच्या ह्या आगळ्यावेगळ्या शिष्याचीही तीच पद्धत आहे. नुसत्या समीक्षेपेक्षा हे वेगळं व अवघड काम आहे. एखादी नवीन बंदिश बसवणं म्हणजे काय असतं ते गवयांना चांगलेच माहितेय. मग प्रत्येक रागातील पाचपन्नास बंदिशी नुसत्या बसवुनच नाही तर त्यातील सौष्ठव व सौंदर्यासहित स्वत: गाऊन अनुभवण्याचा वसा त्यांनी घेतला व अजुनही तो चालुच ठेवलाय. तसेच त्या बंदिशीचे पोषण कुठल्या गायकिने चांगले होते ही सौंदर्य दृष्टी सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी विविध गायकींचा अभ्यास करुन त्या आत्मसात केल्यायत. त्यामुळे वेगवेगळ्या गायकींचा तुलनात्मक आभास करणं त्यांना शक्य झालंय. टोकाचा व्यासंग, तल्लख बुद्धी व उत्तम प्रतिभा हा त्रिवेणी संगम सत्यशीलजींपाशी आहे.
तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य.
कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य. तरीही त्यांच्या गाण्यात कुमारजींची नक्कल नाही. कुमारजींनीपण त्यांना सांगितलं होतं की तुमचे खड्डे तुम्ही खणा! थोडक्यात काय तर अगदी गुरूचीसुद्धा नक्कल न करता स्वतःचं वेगळेपण स्वतः सिद्ध करा. त्यामुळे मी विचार करताना कधीही सत्यशील देशपांडे यांच्यासारखा करत नाही. मी माझ्या सारखा विचार करतो. मला वाटतं की आपल्यासमोर वाट असतेच, ती आपण शोधत जातो. गुरु आपल्याला जाणीव करून देतो की तुमची वाट तुम्ही शोधा. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी गुरु पुरवतात. मी गाण्याचा विचार माझ्यासारखा करतो कारण मी त्यांचा शिष्य आहे. एखादी चाल फसली तर ते सांगतात की त्यात काय करता येईल. त्यातलं एक सूत्र सांगतात ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात. मी संगीत द्यायला लागल्यापासून माझ्या चालींवर त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे. ते स्वतः उत्तम संगीतकार आहेत. त्यांना संगीतातले बारकावे अचूक कळतात. त्यांनी दाखवलेलं प्रतिबिंब इतकं स्वच्छ असतं की ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ अशी काहीशी स्थिती होते! त्यामुळे असं म्हणायला हवं की गुरु म्हणजे वाटाडय़ा नाही. तो सतत तुमच्याबरोबर राहत नाही. वेगवेगळे मार्ग ते तुम्हाला सांगतात. तिथे जाताना तुम्हाला प्रश्न पडतात. माझ्या गुरुचं वेगळेपण हेच की त्यांनी आम्हाला असे प्रश्न पाडले. आज जवळजवळ १६ वर्ष मी त्यांच्याकडे शिकतोय पण जाऊन त्यांच्याकडे शिकायला बसलोय असं कधीच झालं नाही. मी कधीही त्यांना भेटायला जातो आणि शिक्षण सुरु होतं. त्यांनी मला अगदी मुलासारखं वाढवलं आहे. सध्या ‘अजिंठा’ या चित्रपटासाठी ते माझ्याकडे गातायत. मला वाटतंय ‘हे गीत जीवनाचे’ नंतर पहिल्यांदाच ते चित्रपटासाठी गातायत. त्यांनी माझ्याकडून चाल समजून घेतली, त्यावर मी जेवढा विचार केला नसेल तेवढा त्यांनी केलाय, त्याच्या शंभरेक तालमीसुद्धा केल्यात! ते नुसते गायक किंवा संगीतकार नाहीत तर एक विचारवंत, लेखकसुद्धा आहेत. त्यांचा भाषेचा सेन्स अतिशय उत्तम आहे. होतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply