त्यांचा जन्म १३ एप्रिल १८९० रोजी झाला. दादासाहेब तोरणे यांनी ‘श्री पुंडलिक’ची निर्मिती केली तेव्हा त्यांचे वय होते अवघे बावीस वर्षाचे. तोरणे कुटुंबिय मूळचे मालवणनजिकच्या कट्टा गावचे. त्या शेजारच्याच सुकळवाड या छोट्याशा गावात दादासाहेवांचा जन्म झाला. ते तीन वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. कट्टा गावात त्यांच्या कुटुंबियांची थोडीफार जमीन आणि राहते घर होते. घरच्या गरिबीमुळे त्यांच्या शाळेची फी भरणे घरच्यांना शक्य नव्हते. म्हणून लहान वयातच दादासाहेबांनी नशीब काढायला मुंबईचा रस्ता धरला. तेथून ते अच्युत कामत यांच्यासोबत कराचीला गेले आणि त्यांनी एका इलेक्ट्रिशनच्या दुकानात नोकरी पत्करली. तेथे सहा महिने उमेदवारी करून ते मुंबईला आले आणि त्यांना ग्रीव्हज कॉटन या प्रसिध्द कंपनीत नोकरी मिळाली. तेथे बढती मिळाल्यानंतर कंपनीने त्यांची बदली कराचीला केली. काही दिवसातच दादासाहेबांनी बाबूराव पै यांना सोबत घेऊन ‘फेमस फिक्चर्स’ ही पहिली चित्रपटवितरण संस्था स्थापन केली. ‘पाठारे प्रभू ऍमेच्युअर ड्रॅमॅटिक क्लब’ या मुंबईतील काही नाट्यरसिक हौशी मंडळींच्या संस्थेने १९०४ साली ऍडव्होकेट कीर्तिकर यांचे ‘श्री पुंडलिक’ हे नाटक बसविले. पहिल्याच प्रयोगाला १४ वर्षाचे दादासाहेब तोरणे प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. हा प्रयोग पाहून किशोर वयातील दादासाहेब भारून गेले. त्यांनी नाटक मंडळींकडे आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कीर्तिकरांनी स्वतःची ‘श्रीपाद नाटक मंडळी’ ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या जडणघडणीत तरुण वयातील तोरण्यांनी सक्रीय भाग घेतला आणि आपल्यातील कलागुणांद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘श्री पुंडलिक’चे काही प्रयोग झाल्यानंतर ‘श्रीपाद नाटक मंडळी’ने दुसरे नाटक करण्याचे ठरवले. भारतातील कलारसिकांना १८९६ पासूनच जगाच्या इतर भागातील चलचित्रणाची चाहूल लागली होती. दादासाहेब तोरणे यांच्या डोक्यातही तो विषय दिवसरात्र घोळत होता. ‘श्री पुंडलिक’ हे आपल्या नाट्यसंस्थेचे हुकमी नाटक चलचित्रित करावे असा ध्यास दादासाहेवांनी घेतला. त्यासाठी ते १९०९ पासून हॉलिवूडशी संपर्कात होते. तेथून त्यांनी चित्रपट तयार करण्याविषयीची तांत्रिक माहिती मिळवली आणि खर्चाचा अंदाजही घेतला. दादासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांच्याच नाटक मंडळीत सहभागी असलेल्या ऍडव्होकेट नानासाहेब चित्रे यांनी ‘बोर्न अँड शेफर्ड’ कंपनीच्या मुंबई कार्यालयातून ‘विल्यमसन कायनेमॅटोग्राफ’ हा मूव्ही कॅमेरा, त्याला लागणारी फिल्म मिळविली. तसेच जॉन्सन नावाचा एक कॅमेरामनही गाठला.
या कॅमेऱ्यात हालचाली टिपता येत असत. परंतु त्यात आवाजाचे रेकॉर्डींग होत नसे. तोपर्यंत आवाजाच्या रेकॉर्डींगचा शोध लागला नव्हता. म्हणून तोरणे, कीर्तिकर आणि कीर्तिकरांचे एक सहकारी नाडकर्णी या तिघांनी मिळून ‘श्री पुंडलिक’चे वेगळे संवादविरहित चित्रणसूत्र (शुटींग स्क्रीप्ट) लिहिले. त्यानंतर त्या स्क्रीप्टनुसार आणि दादासाहेवांच्या दिग्दर्शनाखाली कॅमेरामन जॉन्सन आणि टिपणीस यांनी मुंबईच्या गिरगाव भागातील लॅमिंग्टन रोड, त्रिभुवन रोड आणि गिरगाव बॅक रोड या त्यावेळच्या तुरळक वाहतुक असलेल्या परिसरात शुटींग केले. चित्रपटात स्वतः दादासाहेब, टिपणीस आणि जोशी यांनीही भूमिका केल्या होत्या. शुटींग केलेली फिल्म प्रक्रियेसाठी जहाजाने लंडनला पाठविली गेली आणि तिची डेव्हलप केलेली प्रिंट जहाजानेच परत मुंबईला आणली गेली. असा हा मूळ मराठी नाटकावरून वेगळी चित्रणकथा लिहून केलेला पहिला भारतीय चित्रपट ‘श्री पुंडलिक’, सँडहर्स्ट रोड, गिरगाव येथील ‘कॉरोनेशन सिनेमॅटोग्राफ’ या नानासाहेब चित्रे आणि पुरुषोत्तम राजाराम टिपणीस अशा मराठी माणसाच्या मालकीच्या सिनेमागृहात १८ मे १९१२ ला रुपेरी पडद्यावर झळकला. हा चित्रपट चांगला दोन आठवडे चालला आणि विशेष म्हणजे ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने त्याची चांगली नोंदही घेतली होती. ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे ते जुने अंक पाहून सुप्रसिध्द सिनेलेखक फिरोझ रंगूनवाला यांनी १९६३ साली या साऱ्या इतिहासाची उजळणी केली होती. मात्र भारत सरकारने तिची दखल घेतली नाही. ‘श्री पुंडलिक’ चित्रपट निघाला त्या काळात सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात आले नव्हते. त्यामुळे सेन्सॉरचे सर्टिफिकेट घेण्याचा प्रश्नच नव्हता. कदाचित त्यामुळे भारत सरकारच्या दप्तरी या पहिल्या भारतीय चित्रपटाची नोंद झाली नसावी. रंगूनवाला यांच्यापूर्वी सिनेपत्रकार हनीफ शकूर यांनी १९५३ साली सिनेसाप्ताहिक ‘स्क्रीन’साठी खुद्द दादासाहेबांकडूनच एक लेख लिहून घेतला होता. सिनेपत्रकार शशिकांत किणीवर यांनीही ‘भारतीय चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे’ हे पुस्तक जानेवारी २००७ मध्ये प्रसिध्द केले आहे. ‘श्री पुंडलिक’च्या निर्मितीनंतर दादासाहेबांनी चित्रपट दिग्दर्शनाशिवाय, प्रक्षेपण, चित्रपट निर्मिती कंपनीचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान, ध्वनिमुद्रण, वितरण व्यवस्था, नव्या स्टुडिओची पध्दतशीर उभारणी असे बहुविध नवे क्षेत्र पूर्णपणे आत्मसात केले. दरम्यान, १९२७ साली हॉलिवूडमध्ये ‘जॅझ सिंगर’ या पहिल्या बोलपटाची निर्मिती झाली. त्यापासून स्फूर्ती घेत दादासाहेबांनी ध्वनिमुद्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री पुरविणारी ‘मुव्ही कॅमेरा कंपनी’ ही स्वतःची कंपनी स्थापन केली आणि हॉलिवूडमधून ऑडिओकेमिक्स हे ध्वनिमुद्रणाचे यंत्र मागवले. त्याचा उपयोग १९३१ साली आर्देशिर इराणी यांच्या ‘आलमआरा’ या पहिल्या हिंदी तसेच पहिल्या भारतीय बोलपटाच्या निर्मितीसाठी दादासाहेबांच्या तांत्रिक सहाय्याने केला गेला. त्याच वर्षी दादासाहेबांनी ‘सरस्वती सिनेटोन’ ही स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली आणि पुढच्याच वर्षी त्यांनी भालजी पेंढारकर यांचे दिग्दर्शन आणि नानासाहेब सरपोतदार यांचे संपादन लाभलेला ‘शामसुंदर’ हा मराठी तसेच हिंदीतील बोलपट काढला. मराठी ‘शामसुंदर’ मुंबईच्या ‘वेस्ट ऍन्ड’ (आताचा ‘नाझ’) मध्ये सत्तावीस आठवडे चालला. रौप्य महोत्सव साजरा करणारासुध्दा हाच पहिला भारतीय बोलपट! त्यात कृष्णाच्या भूमिकेत बालनट शाहू मोडक आणि राधाच्या भूमिकेत शांता आपटे अशी पात्रयोजना होती. त्याच वर्षी कोल्हापूर येथील ‘प्रभात स्टुडिओ’चे ‘अयोध्येचा राजा’ आणि ‘अग्निकंकण’ हे दोन्ही बोलपट मराठी व हिंदीतून प्रसारित झाले. दादासाहेबांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, लोककथेवर आधारित अशा पंचवीस चित्रपटांच्या (मूकपट आणि बोलपट) निर्मितीनंतर १९४२ साली स्वतःची चित्रपट निर्मिती थांबविली. ते पुढेही चित्रपटक्षेत्रात आणखी मोलाचे कार्य करू शकले असते. परंतु त्यांनी ज्याला विश्वासाने आपला स्टुडिओ भाड्याने दिला त्या भाडेकरूने खोट्या कागदपत्रावर स्टुडिओ गहाण ठेऊन पाकिस्तानात पलायन केले. या विश्वासघाताचा धक्का जबरदस्त आणि असह्य होता. दादासाहेब तोरणे यांचे निधन १९ जानेवारी १९६० रोजी झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply