गौतम बुद्धाने बौद्ध धर्म स्थापन केल्यानंतर असंख्य लोक या नव्या धर्माकडे आकर्षित झाले. हळूहळू गौतम बुद्धाचा शिष्यपरिवार वाढत गेला. प्रत्येक शिष्याला वाटे स्वतः गौतम बुद्धांनी आपल्याला काही तरी काम सांगावे.
एका शिष्याला स्वतःच्या नावाचा फार अभिमान होता. ते लक्षात घेऊन गौतम बुद्धांनी एकदा त्याला ‘तू तुझे नाव अजरामर कर’ अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे तो शिष्य स्वतःचे नाव अजरामर करण्यासाठी निघाला. फिरत फिरत तो समुद्र किनाऱ्यावर आला. तो विशाल समुद्र आणि त्याचा भव्य किनारा पाहून त्याला आनंद झाला. त्याने त्या समुद्राच्या किनार्यावरील वाळूत आपले नाव कोरले. त्या किनार्यावर माणसांची फारशी ये-जा नव्हती म्हणून काही दिवस त्याचे नाव वाळूत राहिले. परंतु एकदा समुद्राला मोठी भरती आली व मोठ्या वेगाने आलेल्या लाटांमुळे त्याचे नाव नष्ट झाले.
त्यानंतर तो शिष्य पुढे निघाला. एके ठिकाणी मातीचा प्रचंड मोठा ढीग होता. त्यावर त्याने आपले नाव कोरले. मात्र थोड्याच दिवसांनी मुसळधार पाऊस आला व तो मातीचा ढीग वाहून गेला.
त्या शिष्याने मग एका मोठ्या झाडावरील बुंध्यावर आपले नाव कोरले. त्याला वाटले हे नाव आता कायम टिकणार. मात्र एके दिवशी एक लाकूडतोड्या आला व त्याने ते मोठे झाड तोडून टाकले. त्यामुळे नाव नष्ट झाले.
शेवटी त्या शिष्याने डोंगरावर एका खडकावर आपले नाव मोठ्या कष्टाने कोरले. परंतु थोड्याच दिवसांत त्या भागात मोठा भूकंप झाला व त्यात पूर्ण डोंगरच नाहीसा झाला.
शेवटी तो शिष्य कंटाळून गौतम बुद्धाकडे आला व त्याने आपले एकेक प्रयत्न सांगून ते कसे वाया गेले ते सांगितले. त्यावर गौतम बुद्ध त्याला म्हणाले, ‘तुझी विचार करण्याची पद्धतच चुकीची आहे. नाव असे अजरामर होत नसते. त्यासाठी लोककल्याणाचे कार्य प्रामाणिकपणे केले पाहिजे.’
शिष्याला उपरती झाली व त्याने दुसर्या दिवसापासून लोककल्याणाचे काम सुरू केले.
Leave a Reply