सुरेश खरे हे महाराष्ट्राला नाटककार म्हणून परिचित असले तरी ते एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहे. अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट लेखक, समीक्षक, संवादक, सूत्रसंचालक, संस्थाचालक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत. परफॉर्मिग आर्ट्सशी संबंधित जवळजवळ सगळे प्रकार त्यांनी हाताळले आहेत.
सुरेश खरे यांचा जन्म २५ जानेवारी १९३८ रोजी झाला. १९६० साली सुरेश खरे यांनी मित्रांच्या साहाय्याने ’ललित कला साधना’नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या द्वारे त्यांनी रंगमंचावर अनेक नाटके सादर केली. जेव्हा नाटके मिळेनाशी झाली तेव्हा स्वत:च ’सागर माझा प्राण’ हे नाटक लिहिले आणि त्यांच्यातल्या नाटककाराचा जन्म झाला.
सुरेश खरे हे मुंबईच्या सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. सुरेश खरे लिखित ’काचेचा चंद्र’मुळे डॉ. श्रीराम लागू आणि ’मला उत्तर हवंय’ या नाटकामुळे विजया मेहता, या अभिनेत्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास यशस्वीरीत्या सुरू झाला.
दूरदर्शनवर गाजलेला ’नाट्यावलोकन’ नावाचा नाट्यास्वादाचा कार्यक्रम सुरेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतींमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला होता. दूरदर्शनवरच ’गजरा’” नावाच्या कार्यक्रमात सुरेश खरे यांनी लिहिलेल्या नाटुकल्या सादर होत असत.
सुरेश खरे यांना १९९९ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई शाखेकडून नाट्यलेखनासाठीचा राम गणेश गडकरी यांच्या नावाचा गडकरी पुरस्कार मिळाला आहे. सुरेश खरे हे २००५ साली भरलेल्या ८५व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
मा.सुरेश खरे यांची वेबसाईट.
http://www.sureshkhare.com/biography_m.php
Leave a Reply