प्रा. गुरुराज गणेश गर्दे यांची संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली आणि प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास वाढविणारी, स्वाभिमान उंचावणारी कविता…. त्यांच्याच “चांदणझुला” मधून एक नवी कोरी कविता……
“जगणं विसरू नकोस….”
“सखे,”
जगाकडे रोज नव्याने..
बघणं विसरू नकोस….
सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस….
तुला निराश करणारे
अनेक क्षण येतील…
पाय घालून पाडणारे
अनेक जण येतील…
त्यांना घाबरून तुझं तू
चालणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस…. १
तुझं कौतुक प्रत्येकाला इथं
रुचेलच असं नाही…
कौतुकासाठी तुझं नाव
सुचेलच असं नाही…
कौतुक मिळवण्यासाठी, काम
करणं विसरू नकोस…
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस…. २
तुला सुद्धा मन आहे
याचा विचार कर…
बदलवणा-या मानसिकतेचा
जोरात प्रचार कर…
काळजापासून माया तुझी
झरणं विसरू नकोस…
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस…. ३
रडावंसं वाटेल तेव्हा
रडून मोकळी हो…
लढावंसं वाटेल तेव्हा,
लढून मोकळी हो….
रडण्यामध्ये तुझं तू
लढणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस…. ४
तुला कुणाला पुरावे
द्यायची गरज नाही…
कुणासाठी तुला परतून
यायची गरज नाही….
ध्येयासाठी पुढेपुढे
चालणं विसरू नकोस..
नि सखे तू मुक्तपणे तुझं..
जगणं विसरू नकोस…. ५
Leave a Reply