MENU
नवीन लेखन...

हरबर्‍याची भाजी आणि भाकरी

साऊथमधला इडली-डोसा महाराष्ट्रतल्या घराघरात कधी पोहोचला हे जसे कोणाला कळले नाही तसेच काहीसे हरबर्‍याच्या भाजीचे आहे. वाळलेले हरबरे तळून किंवा ओले हरबरे लिंबू पिळून, त्यावर थोडे मिठ, चाटमसाला टाकून आपण शहरी लोक खातोच ना. पण हे हरबरे शेतात डौलाने उभे असतात त्यावेळी ते पाहण्याची गंमत देखील औरच. हिरव्या रंगाचे टपोरे मोती कोणी एखाद्या छोट्याशा झाडाला लटकवून ठेवावेत आणि ते वार्‍याच्या झोताने डोलताना पहावयास मिळावेत.. अहाहा… अगदी म्हैसूर किंवा पैठणच्या उद्यानात आपल्या प्रेयसीचा दुपट्टा वार्‍यावर उडल्यासारखे वाटले ना.. असो..

तर खवय्यांनो, या हरबर्‍याच्या भाजीचा शोध लावला कोणी हे सांगणारी खापरपणजोबांची पिढी आजतरी अस्तित्वात नाही. पण तुम्ही हरबर्‍याचे झाड कसे असते हा प्रश्न विचारू नका नाहीतर ‘हरबर्‍याच्या झाडावर चढवू नकोस’ हा वाक्यप्रचार अंमलात आणावा लागेल. दोन अडीच फुटाचे हरबर्‍याचे झाड, हरबरे कोवळे असतात त्यावेळी त्याला कोणी ढाळे म्हणतात तर कोणी हरेहरबूट. हिरवे, कोवळे लुसलुशीत हरबरे सोलून खाण्याची मजा देखील गावाकडे गेल्याशिवाय कळत नाही.

पौष महिना आला किंवा जानेवारीत येणार्‍या संक्रातीत बायकांनी हरबर्‍याच्या दाण्यांनी बोळके भरून वाण लुटले की घराघराच्या गच्चीवर हरबर्‍याच्या भाजीला ऊन देणं सुरु झाले म्हणून समजावे. हरबर्‍याच्या झाडाचे दाणे मोठे व्हायच्या आत त्याची कोवळी खुंट खुडायची आणि ती उन्हात ठेवायची. वाळू घालताना पांढरे धोतर किंवा कपडा जमिनीवर टाकायचा, त्यावर हरबर्‍याच्या झाडाचे खुडलेले छोटे छोटे तुकडे अंथरायचे. त्यावर पुन्हा एक पातळ पांढरा कपडा किंवा पांढरे धोतर अंथरायचे.चारी बाजूने कपडा उडू नये म्हणून दगड ठेवायचे. एकदा का अशा उन्हाने भाजी वाळली की ती हलक्या हाताने चोळायची. हरबर्‍याच्या त्या खुडलेल्या टोकापासून छोटी छोटी पानं वेगळी होतात. त्यानंतर सुपात ती वाळलेली भाजी घेऊन पाखडून घ्यायची. म्हणजे काड्या बाजूला पडतात. (अगदी काड्या करणारे जसे बाजूला पडतात तसे..) आणि हरबर्‍याच्या झाडाची छोटी पानं एका बाजूला होतात. ती पानं म्हणजे हरबर्‍याची भाजी. महिनाभर साधारण गावातल्या प्रत्येक घरात हा उद्योग छोट्या मोठ्या प्रमाणात चालू असतो. अशी वाळलेली भाजी मग डबे भरून ठेवली जाते. जी नंतर वर्षभर वापरली जाते.

गावात कायम हिरव्या भाज्या मिळतीलच असे नाही. म्हणून खेड्यापाड्यात हरबर्‍याच्या भाजीप्रमाणे मेथीची भाजी देखील वाळवून वापरली जाते. पण ती खाण्यास थोडी कडसर लागते म्हणून ती वापरण्याचे प्रमाण कमी आणि ही भाजी खायला मटणापेक्षाही फक्कड लागते. म्हणून वाळलेल्या हरबर्‍याच्या भाजीचे डबेच्या डबे भरून ठेवले जातात. खाणार्‍याची तोंड जेवढी तेवढ्या प्रकारच्या चवीने ही भाजी देखील बनवली जाते.

खेड्यात भाजी येईनाशी झाली की, महिलामंडळी हळूच हरबर्‍याच्या भाजीचे डबे उघडतात. फक्कड भाजी बनवतात आणि बाजरीची भाकरी थापून भाजी-भाकरी खायला देतात. संध्याकाळनंतर गावात कधी फेरफटका मारला आणि चुलीवर भाजल्या जाणार्‍या भाकरीचा आणि रटरट हटून तयार केलेल्या हरबर्‍याच्या भाजीचा वास गावातून पसरला की पुरणपोळी खाऊन आलेल्या माणसाचीही जेवणाची इच्छा झालीच म्हणून समजा. अगदी कोणी वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘मी मोजकेच खातो’ असे सांगणारा असला तरी तो गावाकडचा हा मेन्यू खाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल, भाजी वाळली आता खायला द्या, नाहीतर आम्ही वाळून जाऊ.. चिंता करु नका. आधी ही भाजी कशी बनवायची ते तरी समजून घ्या.

मंडळी, आधी एक मोठी कढई घ्या. चुलीवर/गॅसवर ठेवा. त्यात तीन मोठे चमचे तेल टाका. तेल गरम झाले की त्यात मोहरी, जिरे टाका, फोडणीचा कडकडाट झाला की त्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून टाका. (लसूण अगदी बारीक कुटायचा नाही.) असेल तर वाळलेली मिरची टाका, चवीला चिमूटभर हिंग आणि हळद टाका. लसूण थोडा परतला की कढईत दोन ते तीन ग्लास पाणी टाका.

आता त्या पाण्याला उकळी येईपर्यंत एका ताटात हरबर्‍याची भाजी घ्या. त्यात थोडे दाळीचे पीठ टाका. (प्रमाणाच्या भाषेत सांगायचे जर दोन वाटी हरबर्‍याची भाजी घेतली तर त्यात पाऊण वाटी हरबर्‍याच्या दाळीचे पीठ मिसळा.) नंतर थोडे तिखट, मीठ, जास्त तिखट हवे असल्यास थोडा काळा मसाला टाका. हे सगळे एकत्र मिसळून घ्या. तोपर्यंत कढईतल्या पाण्याला छान उकळी आलेली असेल.

आता त्या पाण्यात थोडे थोडे करीत मिसळलेली भाजी टाका. एका हाताने भाजी टाकायची आणि दुसर्‍या हाताने कढईत ती हलवत रहायची. एकदा का सगळी भाजी त्या गरम पाण्यात मिसळली की थोड्या वेळात अगदी मटन शिजताना कसा रट रट आवाज येतो असा आवाज यायला सुरुवात होते. भाजी चांगली गरम झाली की काढून ठेवा. (ती घट्ट होऊ देऊ नये. पातळ भाजी खायला येणारी मजा पातळ रश्यापेक्षा जास्त चांगली असते.) या गरम भाजीवर मस्त लसणाची फोडणी टाकायची आणि तीळ लावलेल्या गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत खा. बाजरीची भाकरी शिळी असली तर मजा आणखी दुप्पट! सोबत एखादा कांदा फटकन फोडून घ्या. हवे तर हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून चांगला मस्त ठेचा करून घ्या. कसलं पिझ्झा आणि बर्गर घेऊन बसलात रावसाहेब.. अशी गरमागरम हरबर्‍याची पातळ भाजी, मस्त गरम किंवा शिळी बाजरीची भाकरी, कांदा, ठेचा आणि फारच श्रीमंती असली तर तोंडी लावायला कच्चे शेंगदाणे.. सुटले ना तोंडाला पाणी.. आणखी काय हवं असतं महाराज, गावातल्या लोकांना. हे प्रेमाने करुन जेव्हा तुम्हाला खायला देतात ना, तेव्हा तर त्याची चव काही औरच लागते.

चला बास झाले. आता तुम्हीच करुन बघा, आणि खा. नाही आवडले तर मी स्वत: करुन खाऊ घालेन..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..