बीटल्स या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बँडच्या चार आधारस्तंभांपैकी एक म्हणून जॉर्ज हॅरिसन यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४३ रोजी झाला.जॉन लेनन, पॉल मॅकर्टनी, जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टार या चौघांनी ‘बीटल्स’ या नावानं जे काही सर्वसाधारणपणे केलं, ते मात्र यापेक्षा पुष्कळच सौम्य, मध्यममार्गी बहुसंख्य श्रोत्यांना रुचेल असं होतं. त्यामुळेच ते गाजले. आजही ‘बीटल्स’चे चाहते जगभर पसरलेले आहेत. बीटल्सनं इंग्लंडमधून अमेरिकेवर जणू सांगीतिक हल्लाबोलच केलं. मागोमाग अनेक ब्रिटिश रॉक बँड्स अमेरिकेत डेरेदाखल झाले. त्या घटनेला ‘ब्रिटिश इन्व्हेजन’ असंच म्हणतात. अमेरिकेत असणारे अनेक बँड्स त्या ब्रिटिश तडाख्यात नामोहरम झाले, त्यांचं अस्तित्व लयास गेलं. ‘दि रोलिंग स्टोन्स’सारखा कंपू हा ‘बॅड बॉईज’ची प्रतिमा सांभाळत ‘ब्ल्यूज रॉक’ वाजवत राहिला. ‘बीटल्स’ मात्र पॉपजवळचं रॉक गात होते. ते तरुण होते. देखणे होते. उत्साही होते. नवनवं शिकून आत्मसात करणारे होते. अजिबात प्रसिद्धीविन्मुख नव्हते. आणि त्यांचं गाणंदेखील अगदी तसंच होतं. सगळय़ात मोलाची गोष्ट ही, की ते प्रयोगशील होतं. तत्कालीन रेकॉर्डिग यंत्रणांच्या मर्यादा ध्यानात घेऊन बीटल्सच्या गाण्यांकडे बघितलं की त्यांचे सांगीतिक प्रयोग किती काळाच्या पुढचे होते, हे कळतं. कधी बाटल्यांचा आवाज काढ, कधी वाद्याच्या पुढय़ात माइक न ठेवता पोटात ठेव, कधी पौर्वात्य वाद्य वापर.. असं सारं त्या चौकडीनं यशस्वीरीत्या केलं. त्यांनी रॉकला कधी पॉपमध्ये बुचकळलं. कधी लॅटिन अमेरिकन सुरांमध्ये. आणि सरतेशेवटी भारतीय वाद्यांमध्ये त्यांना रॉकचा नवा अन्वयार्थ सापडला. पं. रविशंकरांची सतार जॉर्ज हॅरिसनला इतकी भावली, की ‘रागा रॉक’चा (Raga Rock) उदय झाला. ‘बीटल्स’नं संगीतामधले अनेक पायंडे प्रथमच पाडले. ‘म्युझिक व्हिडीओ’ची संकल्पना नक्की कुणाची, यावर अभ्यासकांचं एकमत नसलं तरी श्रोत्यांपर्यंत पहिल्यांदा पोचलेलं व्हिडीओ संगीत हे बीटल्सचं होतं, याबद्दल कुणालाच संशय नाही. ‘अल्बम’ हा प्रकार केवळ सात-आठ गाण्यांना कोंबून धरणारा प्रकार नव्हे, तर त्यामागे एखादं वैचारिक सूत्र पाहिजे, हेदेखील बीटल्सनं बिनचूक ओळखलं. अल्बमच्या कव्हरपासून ते विक्रीपर्यंत बीटल्सनं निर्मितीक्षम नजरेनं पाहिलं. ‘Lucy in the Sky with Diamonds’सारख्या गाण्यामधून त्यांनी ‘सायकेडेलिक रॉक’ म्हणजे काय, ते दाखवलं. अमली पदार्थ घेतल्यावर माणसाला कसं भिरभिरल्यासारखं, तरंगल्यासारखं वाटतं, हेही त्या रॉकनं दाखवलं. पुढे हॅरिसन भारतीय आध्यात्मवादाकडे झुकले आणि अन्य बीटल्सना त्याचप्रमाणे पाश्चिमात्य श्रोत्यांना त्याचा परिचय करून दिला. जॉर्ज हॅरिसन यांचा बीटल्स हा बँड फुटल्यानंतर हॅरिसन यांनी सोलो आर्टिस्ट या नात्याने काम केले. पुढे ट्रॅव्हलिंग विल्बरीज बँडचे संस्थापक सदस्यही झाले. रोलिंग स्टोनमासिकाने प्रसिद्ध केलेल्या १०० महान गिटारिस्टच्या यादीत हॅरिसन यांना ११ वे स्थान दिले. बीटल्सची बहुतांश गीते लेनन आणि मॅकार्टनी यांनी लिहीली असली तरी प्रत्येक अल्बममध्ये एखाद दुसरे गाणे हॅरिसन यांनीही लिहीलेले असायचे. १९६०च्या दशकाच्या मध्यावर हॅरिसन यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व स्वीकारले. हरेकृष्ण चळवळ आणि सतारीचे संगीत पाश्चिमात्य जगात पसरवण्यात त्यांनी मदत केली. पंडित रविशंकर यांच्यासोबत त्यांनी चॅरिटी कॉन्सर्ट फॉर बांगलादेश हा पहिला मोठा मदतीसाठीचा कार्यक्रम (चॅरिटी शो) त्यांनी १९७१ मध्ये सादर केला. हॅरिसन यांनी दोन वेळा विवाह केला. ऑलिव्हिया त्रिनीदाद अरायस या दुस-या पत्नीपासून त्यांना एक मुलगाही झाला. आय, मी, माईन हे हॅरिसन यांचे आत्मचरित्र १९८० मध्ये प्रसिद्ध झाले. आत्मचरित्र प्रसिद्ध करणारे बीटल्सपैकी ते एकमेव होते. जॉर्ज हॅरिसन यांचे निधन २९ नोव्हेंबर २००१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply