अलीकडे नोकरदार स्त्रियांमध्ये त्यातही विशेष करून संगणकाशी संबंधित काम करणाऱ्या तरुणींमध्ये आणि महिलांमध्ये डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यामुळे चेहरा थकल्यासारखा दिसतो. पार्टी अथवा समारंभाला जाताना मेकअपच्या साहाय्याने ही वर्तुळे झाकता येत असली तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्याला बाधा येऊ शकते. तसेच ही वर्तुळे अनारोग्याची सूचना देणारी असतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही त्यांबाबत विचार करणे गरजेचे असते.
डोळ्यांखाली काळी वर्तुळे सततची जागरणे, डोळ्यांवर ताण येणारे काम, लोह कमी असणे, अपुरी झोप, रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणे यांसारख्या प्रमुख कारणांमुळे दिसून येतात.
ही वर्तुळे घालवण्यासाठी कच्च्या पपईचा गर चेहऱ्याला लावावा. याशिवाय, बटाटे किसून त्या जागी लावल्यासही परिणाम दिसून येतो.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्याला 10 ते 15 मिनिटे दुधावरची साय लावून ठेवल्यास ही वर्तुळे कमी होण्यास मदत होते.
काकडीचे काप डोळ्यांवर ठेवून झोपल्यानेही ही वर्तुळे कमी होण्यास मदत होते.
रक्त दूषित झाल्यामुळेही बरेचदा अशा प्रकारची वर्तुळे निर्माण होतात. रक्तशुद्धीसाठी आयुर्वेदात सुचवलेल्या महामंजिष्ठादी काढ्यासारख्या औषधांचा वापर करता येईल.
डोळ्यांखालील वर्तुळांवर बाह्योपचार करण्याबरोबरच आहारातही काही बदल करावे लागतात. यासाठी काळ्या मनुका, अंजिर, केशर, दूध, द्राक्षे, डाळिंबे यांचे सेवन केल्यास लाभदायी ठरू शकते.
हे सर्व करत असतानाच प्रखर सूर्यकिरणांपासून डोळ्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे. प्रखर उन्हात बाहेर जाताना गॉगलचा वापर अवश्य करावा. अपुऱ्या प्रकाशात वाचनासारख्या गोष्टी करण्याचे टाळणे, रात्री उशिरापर्यंत संगणकासमोर अथवा टीव्हीसमोर बसणे टाळणे, शांत आणि पुरेशी झोप घेणे आदी गोष्टीही लक्षात घेणं गरजेचं आहे.
डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ञ, मुंबई
9820584716
Leave a Reply