आपट्याचे झाड सर्वांना ऐकून, वाचून माहिती असते, पण फार थोड्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले असते.
दसऱ्याला सोनं म्हणून आपट्यांची पानं वाटायची असतात, याचे ज्ञान सगळ्यांना असते; पण क्वचितच कोणी खऱ्या आपट्याची पाने वाटत असतील! याचे कारण कांचनाच्या विविध जातींशी असलेले त्यांचे साम्य. बिचाऱ्या कांचनाच्या झाडांचे बेसुमार खच्चीकरण, पर्यावरणाची हानी, कचरा समस्या आणि चुकीच्या आणि कालबाह्य समजुतीवर आधारलेली ही घातक प्रथा कमी होत चालली आहे, ती पूर्णपणे बंद होण्याची आवश्यकता आहे. संस्कृतमध्ये “वनराज’ म्हणून गौरविला गेलेला हा वृक्ष शततारका नक्षत्राचा आणि कुंभ राशीचा आराध्यवृक्ष मानला गेलाय. दसऱ्याला त्याची रोपे वाटावीत, लागवड करावी, फार तर पूजाही करावी.
आपट्याचे अश्मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात! त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्मंतक याचा दुसरा अर्थ “मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.’ धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.
अश्मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः।
मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित् ।।
पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा! साल, पाने, शेंगा आणि बिया औषधात वापरतात.
उपयुक्त आणि टिकाऊ
आपट्याचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते. पण झाडे लहान आणि वेडीवाकडी वाढणारी असल्यामुळे त्याचा उपयोग फक्त शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे इ. तयार करण्यासाठी होतो. उष्मांक मूल्य (कॅलॅरिक व्हॅल्यू) भरपूर असल्यामुळे सरपण, इंधन म्हणून ते फारच चांगले असते. त्याच्या राखेमध्ये लोह, चुना, पोटॅश, मॅग्नेशियम, गंधक, सोडियम व स्फुरद इत्यादींची संयुगे असतात. (कृषी ज्ञानकोश खंड 2 रा) त्यामुळे ती खत म्हणून वापरण्यास चांगली असते. जनावरांना, विशेषतः शेळ्यांना याचा पाला पौष्टिक चारा म्हणून उपयोगी पडतो. तंतुमय सालीपासून मजबूत व टिकाऊ दारे बनवतात. पानांचा उपयोग तेंदुपत्तीप्रमाणे बिड्या तयार करण्यासाठीही करतात. गावाच्या सीमेवर आणि शेताच्या बांधावर ही झाडे लावावीत, असे जुन्या ग्रंथात सांगितले आहे. झाडे खूप वर्षे जगणारी, तोडली तरी पुन्हा फुटणारी, मुळे खोल जाणारी असल्यामुळे हद्दी निश्चित राहतात. छोटेखानी झाडांमुळे पिकांना सावलीचा त्रास तर होत नाहीच, उलट जमिनीचा कस वाढविण्यास त्यांचा उपयोग होतो. आपट्याच्या मुळांवर नत्रस्थिरीकरण करण्याच्या करम्याच्या गाठी असतात.
संस्कृतमध्ये आपट्याला कितीतरी नावं आहेत – वनराज, चन्द्रक, आम्लपत्रक, युग्मपत्र, मालुकापर्ण, कुद्दाली इत्यादी. इतर काही भाषांतली नाव अशी ः हिंदी – अष्टा, कचनाल, घिला, झिंझोरी; गुजराती – असुंद्रो ः बंगाली – बनराज, बनराजी; कन्नड – औप्टा, बन्ने, आरेपत्री; तमीळ – अराईवत्ता, आरेका; तेलगू – आरी, आरे. वनस्पतीशास्त्रीय नाव आहे बाउहिनिया रेसिमोसा. बाऊहिनिया हे प्रजातीनाम बाउहिन नावाच्या दोन वनस्पतीशास्त्रज्ञ बंधूच्या स्मरणार्थ दिलं असून कांचनाच्या सर्व जातींचा समावेश त्यात केला जातो. रेसिमोसा म्हणजे विशिष्ट प्रकारचा फुलांचा तुरा येणारे झाड. त्यात फुले देठाकडून टोकाकडे उमलत जाणारी असतात. बहावा, चिंच, गुलमोहर यांच्या कुळातला हा वृक्ष आहे (फॅमिली सिसालपिनेसी).
उन्हाळ्यात फुलणारा आपट्याचा वृक्ष 2 ते 5 मीटर उंच वाढतो, कित्येक वेळा झुडूपवजा आणि वेडावाकडा वाढलेला दिसतो. तो पानझडी असली तरी जास्त पावसाच्या प्रदेशात पानगळ अल्पकाळासाठी होते. बुंधा 5 ते 25 सें.मी.व्यासाच असून साल काळसर तपकिरी रंगाची, खडबडीत, भेगाळलेली दिसते. कात्रज घाटातल्या एका वृक्षाच्या खोडावर मोठे अणकुचीदार काटे पाहायला मिळाले. फांद्यांचे शेंडे बहुधा खाली वाकलेले (ड्रूपिंग) असतात. खोडा- फांद्यांची आंतरसाल गडद गुलाबी दिसते. पाने एकांतरित, साधी, दुभागलेली, लांबीपेक्षा रुंदीला जास्त (2 – 5 ु 3 – 6 सें.मी.), चामट (कोरियारियस) वरच्या बाजूला गुळगुळीत हिरवीगार तर खालच्या बाजूने फिक्कट आणि लवयुक्त असतात. तळापासून निघालेल्या 7 ते 9 शिरा स्पष्ट, उठावदार दिसतात.
फुलण्याचा हंगाम उन्हाळ्यात (मार्च – जून) असून फुलोरे (मांजिऱ्या, रेसीम्स) डहाळ्यांच्या अग्रभागी आणि पानांच्या देठाजवळही येतात. फुले लहान (1 ते 1.5 सें. मी.) हिरवट – पिवळसर – पांढरी, पाच निमुळत्या पाकळ्यांची असतात. कळ्या लांबट, टोकदार दिसतात. पुकेसर 10 असून ते सुटे, सूक्ष्म आणि केसाळ असतात. पावसाळ्यात वीतभर लांबीच्या चपट्या, वाकड्या, हिरव्या शेंगा झाडावर दिसू लागतात, त्या कित्येक महिने झाडावर राहून पुढच्या उन्हाळ्यात पिकून काळ्या होतात. प्रत्येक शेंगेत 12 ते 20 काळ्या, चपट्या लंबगोल बिया असतात. बिया सहजपणे रुजून रोपे तयार होतात.
आपट्याची झाडे भारतात सर्वत्र, अगदी आसेतूहिमाचल पाहायला मिळतात. जंगलात वाढतात आणि लावलीही जातात. पुणे जिल्ह्याच्या मावळ भागात (पर्जन्यमान 1000 ते 2000 मि. मी.) विपुल प्रमाणात झाडं आहेत. बाजी पासलकर जलाशयाच्या काठावरील “इको- व्हिलेज’मध्ये कितीतरी छान वाढलेली झाडे पाहायला मिळतात, तर मध्य प्रदेशातील राजस्थान सीमेवरील राजगढ जिल्ह्यातील निमवाळवंटी प्रदेशातही (पर्जन्यमान 250 ते 500 मिमी) ती मोठ्या संख्येने आढळतात. रोपवाटिकामधून रोपे मिळू शकतात. कोणत्याही हवामानात, कसल्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकतात. जमिनीची धूप थांबवण्यासाठी ही झाडे मुद्दाम लावली जातात. त्याच्या मुळांना फुटवे (रूट सकर्स) येतात, त्यांच्या रूपाने शाकीय पुनरुत्पादन घडून येते. अत्यंत उपयोगी, बहुगुणी अशा या वृक्षकाची लागवड वनशेती आणि ऊर्जालागवडीसाठी (एकसुरी लागवड टाळून) सर्वत्र आवर्जून करावी. उद्यानात, छोट्या परसबागेत, रस्ता दुभाजकांमध्ये, शेताच्या कुंपणावर आणि बांधावर, कॅनालच्या बाजूने लावण्यासाठी अश्मंतक हा एक उत्तम “वनराज’ आहे.
— प्रा. श्री. द. महाजन
Leave a Reply