नवीन लेखन...

मोदकांनी भारतीताईना उद्योजिका बनवलं……

बाप्पानेच मला ही संधी दिली. आजही तोच ताकद, हिम्मत देतो आणि समाधानही!

गणेश चतुर्थीला विशेष मान असतो तो उकडीच्या मोदकांचा. अकरा किंवा एकवीस मोदकांचा हा नैवेद्य देवाला दाखवायचा तर तो ताजाताजाच असायला हवा शिवाय एकाच आकाराचा, एकाच चवीचा हवा. ते काम अति कौशल्याचं. मग हे मोदक आयते हातात मिळाले तर? पुण्याच्या भारती मेढी दरवर्षी गणेश चतुर्थीला तब्बल २० हजार मोदक तयार करतात आणि मुंबई, पुण्यातल्या अनेक घरांत रवाना करतात. गणपतीबाप्पांच्या नैवेद्यात सामील होणाऱ्या या मोदकांनी भारतींना उद्योजिका बनवलं. त्याविषयी..

बाप्पाचा सण त्याच्या लाडक्या मोदकांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. गणेश चतुर्थीला विशेष मान असतो तो उकडीच्या मोदकांचा. तांदूळ धुऊन वाळवून दळायचे, उकड काढायची, एकीकडे सारण करायचं मग पाकळ्यापाकळ्यांनी कळीदार मोदक करायचे. मग ते उकडून घ्यायचे. जेव्हा हे वाफाळते मोदक प्रसादाच्या रूपाने केळीच्या पानावर मांडले जातात तेव्हा कुठे सुगरणीच्या मनाला शांतता मिळते आणि समाधानही. असे मोदक बनवणं म्हणजे अगदी सोनारकाम. एक ग्रॅम इकडचं तिकडे झालं तरी चालायचं नाही. एकीकडे बाप्पासाठी फक्त २१ मोदक करताना आपली धावपळ होते, पण पुण्याच्या भारती मेढी मात्र तब्बल २०,००० मोदक करतात. तेही गणपतीच्या पहिल्या दिवसासाठी. पुण्यात कर्वेनगरला त्यांचा मोदकांचा एक लहानसा कारखानाच आहे. त्यांच्या ‘ओम चैतन्य कॅटिरग’तर्फे त्या मोदकांची ही उलाढाल करतात. यंदा मोदकांचा हा आकडा ३० हजार करण्याचा त्यांचा मानस आहे.

मोदकांचा हा विक्रमी आकडा काही एका दिवसात आलेला नाहीच. त्यामागे आहे प्रचंड मेहनत आणि बचतगटाची कमाल. अगदी ६-७ वर्षांपूर्वी भारती मेढी या गृहिणीला वाटलंही नव्हतं की आपण चतुर्थीला जे मोदक बनवतो तेच आपल्याला एक नवी ओळख देणार आहेत. त्याचं कारण झालं बचत गट! त्यांनी बचत गटात जायला सुरुवात केली. एक दिवस बचत गटातून एक नवं आव्हान मिळालं. प्रत्येकीनं आपल्याला जमेल असा पदार्थ करून आणायचा. भारती कोकणातल्या, साहजिकच त्यांनी उकडीचे मोदक केले. नेहमीप्रमाणे ते फर्मास झाले होतेच. मग त्यांच्या मॅडमनी सांगितलं, ‘‘आपण भीमथडी जत्रेत स्टॉल लावायचा.’’ ही जत्रा म्हणजे बचत गटातल्या महिला वर्गाचं एक स्नेहसंमेलनच असतं म्हणा ना. इथे अनेक स्टॉल्स लागतात, विक्री होते. विक्री, ग्राहकांशी संवाद, स्टॉलची मांडणी या सगळ्या गोष्टींवर बक्षीसंही मिळतात. या मानाच्या जत्रेत भारतींनी आणि त्यांच्या मोदकांनी चक्क पहिला क्रमांक पटकावला. त्यांच्या मोदकांना ग्राहक पहिली पसंती देतात खरं, पण हा स्टॉल लावणं काही सोपं नव्हतं. अशा प्रकारे घराबाहेर जाऊन काम करायला त्यांच्या पतीचा सक्त विरोध होता. पण सासूबाईंचा, सुशीलाबाईंचा पाठिंबा होता. दोघींनी विरोधाला न जुमानता, जिद्दीने स्टॉल उभारला आणि यश मिळवलंच. त्या यशाने त्यांच्यातला आत्मविश्वास इतका वाढला की, भारतींनी मोदकांच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. हळूहळू मोदक, पुरणपोळ्या आणि इतरही पदार्थाच्या ऑर्डर्स त्या घेऊ लागल्या. अर्थात म्हणून त्यांनी भीमथडी जत्रेत स्टॉल लावणं थांबवलेलं नाही. दरवर्षी त्या स्टॉल लावतात आणि पुरस्कारही मिळवतात.

या पुरस्कारानेच त्यांना २०११ मध्ये व्यवसाय व्यवस्थापनाचा तीन महिन्यांचा अभ्यासक्रम करण्याची संधीही दिली. या अभ्यासक्रमाने काय दिलं, याबद्दल भारती म्हणतात, व्यवसाय म्हणजे काय? तो कसा करायचा? विक्री कशी करायची? किंमत कशी ठरवायची? मुख्य म्हणजे माणसांकडून काम कसं करून घ्यायचं? हे सगळं मी इथे शिकले. आम्ही गृहिणी. त्यामुळे कामाची सवय होती पण काम करून घ्यायचं माहिती नव्हतं. या अभ्यासक्रमात माणसांकडून काम कसं करून घ्यावं हे समजलं. यामुळे कामात अधिक सुसूत्रता आली, वेळ वाचला. कामाचा व्याप हळूहळू वाढत गेला. त्यानंतर भारतींनी व्यवसायासाठी विविध यंत्रसामग्रीही घेतली. आता त्यांच्याकडे नारळ खवायला, सारण शिजवायला, पीठ मळायला आणि मोदक उकडण्यासाठीही यंत्रं आहेत. पण मोदकांच्या बाबतीतली अत्यंत महत्त्वाची आणि कौशल्याची गोष्ट म्हणजे मोदक करणं. हे काम मात्र हातीच होतं, कारण त्याची एक एक पाकळी करून एकसारखे कळीदार मोदक होणं गरजेचं असतं.

मोदकांचं हे काम नेमकं चालतं तरी कसं, हा प्रश्न आपल्याला पडतोच. गणेश चतुर्थीसाठीच्या मोदकांची तयारी भारतींकडे साधारण १५-२० दिवस आधी सुरू होते. सर्वात आधी दळणं होतात. दळलेल्या तांदळांच्या विशिष्ट मापांच्या पिशव्या करून ठेवल्या जातात. मशीनवर नारळ फोडून, खवून, त्यात गूळ घालून सारण तयार होतं. ते थंड करून नीट साठवून ठेवलं जातं. भारतींकडे प्रत्येक वस्तूचं माप ठरलेलं आहे, त्यानुसार अगदी तंतोतंत मोजून प्रमाण घेतलं जातं, ज्यामुळे मोदक जास्तीत जास्त चांगला होतो. आता हे करायचंसुद्धा एक कारण आहे. कुठलीही गोष्ट घाऊक आणि विक्रीयोग्य करायची म्हटली की त्याला प्रमाण आणि दर्जा तर पद्धतशीर हवाच. पण कधी कधी अंदाज चुकल्याने जबरदस्त नुकसानही सोसावं लागतं. भारती म्हणाल्या, एकदा मोदकांची सगळी ऑर्डर पूर्ण करून बसलो होतो. शेवटच्या घाण्यातले १००० मोदक उकडले जात होते. आता काम संपलं म्हणून सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण उकडण्याच्या प्रक्रियेमध्ये काय घोळ झाला माहीत नाही, सगळ्या मोदकांना तडे गेले. तुकडेच पडायला लागले. परत सगळे मोदक करायला बसलो. कधी कधी खूप काळजी घेऊनही प्रमाणात थोडा फरक पडतो आणि सगळी ‘बॅच’ खराब होते. अगदी आयत्या वेळी असं काही घडलं तर नुकसान सोसावं लागतं किंवा मग ग्राहकांचा संताप सहन करावा लागतो.

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजल्यापासून मोदक करायला सुरुवात होते. मोदक करण्याचं मुख्य काम असतं. त्यासाठी भारतींकडे तब्बल २०-२२ माणसं काम करतात. रोजच्या १०जणी असतातच, पण गणेश चतुर्थीच्या काळात ऑर्डरप्रमाणे या मदतनीसांमध्ये वाढ होते. मोदक करणं तसं कौशल्याचं काम. हातानेच त्याची एकेक पाकळी वा कळी करत नंतर हातानेच गोलाकार आकार देत मोदक करावा लागतो. साहजिकच नवीन आलेल्या कोणत्याही मदतनीसाला थेट मोदक करण्याचं काम दिलं जात नाही. त्यांना आधी २-३ दिवस व्यवस्थित प्रशिक्षण दिलं जातं. मगच त्यांना मोदक करायला दिले जातात. ज्यांना ते कौशल्य जमत नाही त्यांना सरळ बाकीची कामं दिली जातात. कारण ग्राहकांपर्यंत पोहोचणारा पर्यायाने बाप्पापर्यंत पोहोचणारा प्रत्येक मोदक सारख्याच आकाराचा, चवीचा आणि पाकळ्यांचा असायला हवा, असा भारतींचा आग्रह असतो. पहिल्या दिवशी दुपारी चार-साडेचापर्यंत जेवढे मोदक तयार होतील ते सारे मुंबईला विक्रीसाठी जातात. तरीही हा आकडा ५-६ हजारांवर नक्की जातोच. ज्याप्रमाणे पेढय़ाला कागद लावलेला असतो तसंच या मोदकांना प्रत्येकी प्लास्टिकचा कागद लावून ते साच्यांच्या ट्रेमध्ये पॅक केले जातात. त्यामुळे न हलता सुरक्षितपणे वेष्टनबंद मोदकांचा प्रवास सुरू होतो.

मुंबईतल्या ग्राहकांसाठीचे सगळे मोदक पाठवल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता पुण्यातल्या ग्राहकांसाठीच्या मोदकांचं काम सुरू होतं. रात्री १२ वाजल्यापासून विक्रीसुद्धा सुरू होते. ग्राहक एकामागोमाग मोदक घेऊन जायला हजर होतात. सगळ्यात मोठी ऑर्डर सकाळी ६ पर्यंत पूर्ण व्हायलाच हवी, असा भारतींचा दंडक असतो. बाकीच्या लहानमोठय़ा ऑर्डरची कामं गणपतीच्या पहिल्या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरूच असतात. भारती म्हणतात, मोदकांचा आकडा ऐकला की सगळ्या कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. दरवर्षी आम्ही सगळ्या जणी आपल्याला मागच्यापेक्षा जास्त मोदक करायचेत, याच उत्साहाने काम करत असतो. गेल्या वर्षीपर्यंत आम्ही २०,०००चा टप्पा गाठला. यंदा तो ३०,००० वर नेण्याचा मानस आहे. गणपतीच्या दहा दिवसांत आमची ही अशीच लगबग सुरू असते. ही सगळी उलाढाल करायची म्हणजे घरच्यांचा सहभाग हवाच. भारतींनाही तो मिळतो. त्यांच्या स्वत:च्या घरीसुद्धा गणपती आणला जातो. त्याचं सगळं नियोजन त्यांच्या जाऊबाई करतात. भारतींच्या सासूबाई मात्र पहिल्यापासून त्यांच्या पाठीशी होत्या आणि अगदी आज वयाच्या ८५व्या वर्षीही देखरेख आणि आर्थिक व्यवहारांचं नियोजन त्या सांभाळतात. सुरुवातीच्या काळात यंत्रसामग्री नसताना अगदी पारी थापून देण्यापासूनची कामं त्यांनी केलेली आहेत. सुरुवातीला विरोध करणारे भारती यांचे पती किशोर मेढी आता मात्र या उद्योगात मनापासून मदत करतात. मार्केटिंगचं काम तेच सांभाळतात. भारती म्हणतात, त्यांचा विरोध होता तरीही मला काही तरी वेगळं करायची इच्छा होतीच. बचत गटासारखं चांगलं व्यासपीठही मिळत होतं, त्यामुळे घराबाहेर पडून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मला सोडायची नव्हती. आणि मी ती सोडली नाही. शेवटी इच्छा असेल तिथे मार्ग मिळतोच. बाप्पानेच मला ही संधी दिली. आजही तोच ताकद, हिम्मत देतो आणि समाधानही!

संजीव वेलणकर पुणे.
9422301733
साभार- लोकसत्ता

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..