शरद जोशी, हे नाव महाराष्ट्राला तरी अपरिचित नाही. ही गोष्ट त्यांच्याच संदर्भातली आहे. घटना आहे १९८० ची. त्या वेळी शरद जोशींनी निपाणी इथं तंबाखू उत्पादनांच्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं होतं. त्यापूर्वी चाकणला कांदा आंदोलन झालं होतं. नंतर उसासाठी लासलगाव…कसबे- सुकणे हा भागही आंदोलनात होता. त्यानंतरचं हे आंदोलन. शरद जोशींविषयी त्या काळात कमालीची उत्सुकता होती. ‘तुम्ही मला दहा हजार तरुण द्या, मी या देशाचं भविष्य बदलून टाकतो,’ असं ते म्हणायचे. त्यांच्याशी परिचय होताच, पण या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा भेट झाली. त्या वेळी मी कोल्हापूरला होतो. वार्तांकनासाठी रोज स्कूटरवरनं निपाणीला जायचं. तिथं आंदोलकांशी गप्पा, चर्चा करायच्या. शरद जोशींबरोबर आंबिल प्यायची, असली तर पिठलं-भाकरी खायची, त्यांच्याशी बोलायचं अन् सायंकाळी परत येऊन आंदोलनाची बातमी लिहायची, असं रोजच चाललं होतं. आंदोलनातला आवेश कमी झाला होता तरी पुणे-बंगलोर महामार्गावर निपाणी इथं ३५ हजार शेतकर्यांची वसती सतत असायची. एका अर्थानं एक वेगळं गावच वसलं होतं. पालिकेनं पाणीपुरवठा केला होता, रोज वाड्या-वस्त्यातून आंबिल आणि जेवण यायचं. भर उन्हामध्ये आंबिल म्हणजे शारीरिक आणि मानसिक थंडावा. पोट भरून जायचं एखाद्या प्याल्यामध्ये. पत्रकार म्हणून रोज येणारा मी या गावाचा एक घटकच बनून गेलो होतो. शरद जोशी, प्रा. जोशी, गोपीनाथ धारिया ही मंडळी घरची बनली होती. रोज दुपारी होणार्या चर्चांना अनेक वेळा व्यूहरचनात्मक बैठकांचं स्वरूप यायचं. त्यात यशही लाभायचं. आपला या आंदोलनातला सहभाग मनाला उभारी देऊन जायचा. पत्रकार हा घटनांचं चित्रण रेखाटणारा; पण इथं तो स्वतःलाही त्या चित्रात पाहायला लागला होता. दिवसामागून दिवस चालले होते. सरकार काहीच कृती करत नव्हते. वाटाघाटी नाहीत की प्रतिकार नाही.
क वर्णन करता येणार नाही अशी पोकळी निर्माण झाली
होती. आंदोलनाचा आवेशच नव्हे तर तीव्रता,
संख्या कमी होऊ लागली होती. शेतकरी रोज आपापली कामे करून मुक्कामाला रस्त्यावर येऊ लागले होते. दिवसामागून दिवस सरत होते.
त्या दिवशी कोल्हापूरहून थोडं विलंबानंच निघालो मी. सकाळचे नऊ वाजले असावेत. साडेनवाच्या दरम्यान निपाणीच्या अलीकडेच एक पत्रकार मित्र श्रीपाद देशपांडे भेटले. खूप घाबरलेले होते. मला त्यांनी थांबविलं. ‘पुढे जाऊ नका. गोळीबार झालाय. शरद जोशींना अटक झालीये…’ वगैरे गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या वेळी माझ्याबरोबर पाटील नावाचा छायाचित्रकार होता. त्याला म्हटलं, ‘काय करायचं? तुला भीती वाटत्येय का?’ तो म्हणाला, ‘तुम्ही येणार असाल तर मला काय भीती? चला…’ आम्ही पुढे गेलो. जे चित्र दिसलं ते हादरवून टाकणारं होतं. कर्नाटकी पोलीस पत्रकारांना पाहताच शिव्या घालीत होते. दंडुके चालवीत होते. आमचा पाटील हातात कॅमेरा असल्याने आयताच पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याला इतकी मारहाण झाली, की त्यानंतर १५ दिवस तो रुग्णालयात होता. तीन किलोमीटरच्या परिसरात प्रेतं पडलेली होती. भाकर्यांच्या उघड्या टोपल्यावर कावळे ताव मारीत होते. एक रस्ता जिवंत करणारं गावच गतप्राण झालेलं होतं. त्या दिवशी गोपीनाथ धारियांना पोलिसांनी इतकं मारलं की मुडद्यालासुद्धा चीड यावी. मोहन धारिया यांचा हा सख्खा भाऊ निमूटपणे मार खात होता. त्यानंतर शरद जोशींना हसनला हलविण्यात आलं. माझ्याच घरात कोणी तरी निवर्तलं असावं अशीच ती परिस्थिती होती; पण बातमी लिहिणं भाग होतं. बातमी लिहिली; अस्वस्थता कायम होती. शेतकरी संघटनेच्या सर्वच पदाधिकार्यांना अटक झालेली होती. अशात दोन दिवस गेले अन् बातमी आली आज शरद जोशी कोल्हापूरमार्गे पुण्याला जाणार. आम्ही पत्रकार जमलो. ज्या शेतकर्यांचे या आंदोलनात बळी गेले त्यांच्या घरी जाऊन जोशींनी सांत्वन करावं, अशी सूचना पुढे आली. त्यांनीही या सूचनेला विरोध नाही केला; पण घडलं असं की शरद जोशी निपाणीला न थांबताच परत पुण्याला आले. माझ्यासारख्या पत्रकाराला इतर पत्रकारांपुढं
रद जोशींची बाजू मांडणंही कठीण होऊन गेलं. ज्या दिवशी गोळीबार झाला, माणसं मेली त्या वेळी जेवढा धक्का बसला होता त्यापेक्षा अधिक धक्का जाणवला तो शरद जोशींच्या वागण्याचा. एखाद्या माणसात आपण माणूसपण पाहावं आणि त्याला देवत्व देत असतांनाच तो केवळ पत्थर आहे याची जाणीव व्हावी, अशी काहीशी ती अवस्था होती.
शरद जोशी नावाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मनात असलेला आदर पूर्णपणे लोपला होता. काही दिवस गेले. मी पुण्याला आलो होतो. जंगलीमहाराज रस्त्यावरच्या कार्यालयात शरद जोशी होते. त्यांना भेटायचं अन् जाब विचारायचा असं ठरविलं अन् गेलो. आमची भेट झाली. प्राथमिक विचारपूस झाली अन् शरद जोशी म्हणाले, ‘‘आंदोलनात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मी भेटावं, त्यांचं सांत्वन करावं, असं तुला वाटत होतं ना. मी मुद्दामच नाही आलो. मी काही राजकारणी नाही. मी त्या वेळी त्यांना भेटतो, तर त्यांचं दुःख पाहून कोसळलो असतो. त्यानंतर कोणतंही आंदोलन उभं करणं मला शक्यच राहिलं नसतं. अखेरीस मीही माणूस आहे. त्यांच्याबरोबर राहिलेला त्यांचा सहकारी आहे. त्यामुळं त्यांना त्या वेळी भेटणं मी टाळलं. आता भेटणार आहे. त्यांना आर्थिक मदत देणार आहे. आज त्यांना त्याची अधिक गरज आहे.’’ आमची भेट संपली. मला आंदोलकामधल्या एका माणसाचं दर्शन झालं होतं.
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.
Leave a Reply