एकनाथषष्ठीचे औचित्य साधून घोडपदेवचे ग्राम दैवत श्री कापरेश्वर महाराज यात्रोत्सावास सनईच्या सुमधुर सुराने प्रारंभ होतो. हा यात्रौत्सव एकूण १० दिवस भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला जातो. यात्रौत्स्व अगदी गावपातळीवर होतो त्याप्रमाणे येथे साजरा केला जातो .देवाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पसंद आहे यावरून देव हा गरीबांचा आहे, हे कळून येते. एकनाथषष्ठी परंपरेनुसार यथासांग पूजा करून विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ होतो. या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील आदरणीय, वंदनिय हरिभक्त कीर्तनकार आपली सेवा या ठिकाणी घडवून आणतात. ही कीर्तनकार मंडळी म्हणजे ज्ञानाची महासागरे. ही मान्यवर मंडळी आपल्या समाजप्रबोधन ज्ञानदानाने श्रीकापरेश्वर भक्तांची झोळी भरत असतात. आता या मोफत सद्विचारांच्या बाजारात हवं तेवढे घ्यायचे हे भक्तांना ठाऊक आहे. अखंड हरिनाम सप्ताहात टाळकरी, माळकरी, वारकरी, फडकरी, मृदंगाचार्य याशिवाय अफाट श्रोते गर्दी करतात. दुरदूरचीची मंडळी कीर्तन श्रवणासाठी येतात. मंदिरात सतत वीणा, हरिपाठ, प्रवचनसेवा सुरु असते त्यामुळे हा परिसरात धार्मिक स्वरूपाचे वातावरण पहायला मिळते. यात्रौत्सावाचा कालावधी म्हणजे गर्दीने भरलेले रस्ते, खेळणीची दुकाने, लहान मोठे पाळणे, रेवड्या शिंगुळ्याच्या गाड्या, महिलांसाठी आवश्यक वस्तूंची दुकाने तहान मांडून असतात. खाण्याच्या पदार्थांच्या गाड्या अन त्यावर ताव मारणारी आबालवृध्द मंडळी. गर्दीच गर्दी…
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला देवाची आरती झाल्यानंतर टाळ गजरात पालखी सोहळ्यास प्रारंभ होतो . अगदी वाजत गाजत लेझिम. हलगी,ढोल ताशे, सुंदर रंगीबेरंगी पोशाखातील बँड वादक, टाळ,पखवाज, उत्साही तरुणांचे नववाद्य डीजेच्या तालावर पालखीस प्रारंभ होतो. धाकु प्रभूजी वाडीतून घोडपदेव मार्गे नारळवाडी मार्गे पुन्हा रामभाऊ भोगले मार्ग हा पालखीचा मार्ग केवळ जाती जमातींच्या विचारातून पूर्वपारंपार सुरु आहे. पालखीतले आकर्षण म्हणजे देवकाठी, हलगी वाद्यावर नाचली जाणारी देवकाठी. सर्वांच्या पुढे या देव काठीला मानाने दिशा देतात. त्यानंतर लेझीम, ढोल, ताशे बँडच्या तालावर आपआपल्या आवडीप्रमाणे नाचत असतात. जबरदस्त बेभान होऊन महिलांच्या पिंगा, फुगड्यानी धमाल उडते. ज्येष्ठ नागरिक या उत्सवात, पालखी सोहळ्यात अगदी तरुण होऊन नाचतात.
इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे असा यात्रौत्सव मुंबईत थोड्याच ठिकाणी केला जातो, दिवसेंदिवस हे सोहळे खर्चिक होत चालल्याने काही मर्यादा येऊ घातल्या आहेत. भविष्यात या परंपरा जतन केल्या जातील का…? हा प्रश्न भेडसावत असला तरी बाबांची कृपा भक्तांवर अफाट आहे.
अशोक भेके
Leave a Reply