कालच ‘दै. महाराष्ट्र टाईम्सचे’ संपादक, ज्येष्ठ पत्रकार व लेखक गोविंदराव तळवलकर यांचे अमेरिकेत निधन झाले. ‘मटा’चे ते माजी संपादक असले तरी माझ्या मनात मटा म्हणजे गोविंदराव हे समिकरण पक्क बसलंय व म्हणून मी सुरूवातीला त्यांचा उल्लेख ‘मटाचे संपादक’ असाच केलाय.
मला समजायला लागल्यापासून पेपर वाचणं हा माझा छंद. आज वयाच्या ५१ व्या वर्षीही पेपर वाचल्याशिवाय दिवसाची सुरूवात बोत नाही. या पेपरवाचनातून आजवर केवळ दोनच व्यक्ती मनात पक्क्या ठसल्या, एक ‘लोकसत्ता’चे माधवराव गडकरी आणि दुसरे ‘मटा’चे गोविंदराव तळवलकर. पेपर म्हणजे हे दोघं व हे दोघं म्हणजे पेपर हे समिकरण जे डोक्यात बसलंय ते आजही तसंच आहे. आज हे दोघही आपल्यात नसले तरी ते तसंच राहील येवढं मला समृद्ध ह्या दोघांनी त्यांच्या नकळत केलंय. माझ्यासाठी हे दोघं कधीही कैलासवासी नाहीत.
गोविंदरावांच्या लिखाणातून मला नेमकं काय मिळालं हे मला नेमक्या शब्दात सांगता येणार नाही, ते कोणत्या विचारांचे होते किंवा कुठल्या बाजुला झुकलेले होते, हे ही सांगता येणार नाही, परंतू त्यांनी माझ्या ‘कळण्या’त माझ्याही नकळत भर घालून मला समृद्ध केलं हे मात्र नक्की सांगता येईल. गोविंदरांवांनी दिलेली ही समृद्धी दाखवता येणार नाही कारण ती अनुभवायचा विषय आहे, अनुभुतीचा भाग आहे..!
राजकारण, अग्रलेख वैगेरे जड व गुतागुतीचे विषय वाचत असलो तरी समजण्याचं वय नसताना, गोविंदराव लेखक असलेला प्रत्येक लेख वाचायची सवय लागली. त्यांचं लिखाण वाचण्याची सवय लागावी असा काही तरी फॅक्टर त्यांच्या लिखाणात होता पण नक्की कोणता हे सांगता येणार नाही. फार काही कळायचं नाही, पण काही तरी वेगळं, पौष्टीक वाचतोय याची जाणीव मात्र व्हायची. माधवराव व गोविंदरावांनी जे माझ्या मनात सहज म्हणून पेरलं, त्याचं महत्व मला आता कळायला लागलं. स्वतंत्र विचार कसा करावा ही सवय या दोघांमुळे मला लागली आणि हीच ती समृद्धी असावी बहुतेक..!
मॅजेस्टीक, पिपल्सला कधी गेलो आणि ‘गोविंद तळवलकर’ असं नांव लिहीलेलं काही सहज दिसलं तर ते आवर्जून खरेदी करायचं आणि घरी येऊन प्रथम आधाशासारखं व नंतर परत सावकाश वाचून संपवायचं हा माझा शिरस्ता होता व आहे. त्यांच्या ‘भारत आणि जग’ या भारताच्या परपाष्ट्रीय नितीचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाने मला वेगळीच दृष्टी दिली. ‘बदलता युरोप’, ‘इराक दहन’, ‘वैचारीक न्यासपिठं’ ही त्यांची आणखी काही पुस्तक, जी मला मनापासून आवडली. ‘वैचारीक व्यासपिठं’ या पुस्तकात जगभरातील प्रमुख दैनिकं, साप्ताहीकं, मासीकांचा अत्यंत सुंदर आढावा त्यांच्या त्यांच्या गुण-दोषासहीत घेतलेला आहे. जगाच्या प्रतलावर आपण कुठे आहोत याची बरी-वाईट जाणिव हे पुस्तक वाचताना होतो. गोविंदराव असे चहुअंगाने समृद्ध करत गेले..त्याच्या वीस पुस्तकांपैकी माझ्या संग्रही असलेली ही चारच पुस्तकं.
या व्यतिरिक्त ‘साधना’ साप्ताहिकात त्यांचे लेख आता आतापर्यंत प्रकाशीत होत असत. अजुनही येतील. हे लेख वाचणं ही पर्वणीच असाची. नुकतेच त्यांचे नविन पुस्तक छपाईसाठी गेल्याचं आजच्या लोकसत्तेत वाचलं व गोविंदराव वयाच्या ९२व्या वर्षीही किती सजग व कार्यरत होते याचं आश्चर्य वाटलं. वय वाढत असलं तरी बुद्धीजीवी व्यक्ती थांबत, थकत नाही हे खरंच..
मी तसा कितीही जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने हलणारा नाही. प्रत्येकाला मृत्यू येणारच. तरीही प्रथम माधवरावांच्या आणि आता गोविंगरावांच्या मृत्युने मात्र मी हललो. काहीतरी स्वत:चं हरपल्याची जाणीव झाली व त्या अस्वस्थतेतून हा लेख लिहावासा वाटला. गोविंदरावांनी माझ्यावर व माझ्या पिढीवर केलेल्या वैचारीक उपकारांतून किंचितसं उतराई होण्याचा हा माझा एक विफल प्रयत्न..!
श्रद्धाजलीतून त्यांच्या आत्म्याला शांती वैगेरे उपचार होत राहातील परंतू मी तसं काही म्हणणार नाही. गोविंदराव शरीराने गेले असले तरी त्यांची पुस्तकं व विचाराने अवती-भवतीच आहेत. अशा व्यक्तींना मुळात मरण नसतंच, असतं ते ट्रान्सफाॅर्मेशन..अनेकांच्या विचारांचं ट्रान्सफाॅर्मेशन गोविंदरावांनी केलंय, त्या विचांरांच्या रुपाने गोविंदराव आपल्यात आहेत अशी माझी भावना आहे..त्याचा आत्मा शांतच होता व त्यांनी माझ्यासारख्या अनेकांना अशांत केलं हे खरं..या त्यांच्या उपकारातून उतराई होणं अवघड, अशक्य असं सारं काही आहे..!!
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply