मुकुल शिवपुत्र हे पद्मभूषण पंडित कुमार गंधर्व यांचे पुत्र आणि प्रमुख शिष्य आहेत आणि त्यांना भारतीय संगीतातील एक उत्तम गायक मानले जाते. त्यांचा जन्म २५ मार्च १९५६ रोजी झाला. मुकुल शिवपुत्र यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे यांच्याकडून धृपद-धमाराचे, तर एम. डी.रामनाथन यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले.मुकुल हे ख्याल, भक्तिसंगीत व लोकगीतांसाठी विशेष ओळखले जातात. १९७५ पासून ते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करीत आहेत. २३ व्या सवाई गंधर्व महोत्सवापासून त्यांनी गायनाचा श्रीगणेशा केला. ते कुमार गंधर्वांचे चिरंजीव अन् शिष्य असले तरी त्यांच्या गायकीतून कोठेही कुमारजी फारसे डोकावत नाहीत. “तब्बल वीस वर्षे केवळ मंदिरांमध्ये गाणारा मुकुल जर बैठक न मोडता कार्यक्रम करत गेला असता तर आज तो त्याच्या बापाच्याही पुढे गेला असता” असे पंडित वसंतराव देशपांडे म्हणाले होते. ग्वाल्हेर घराण्याची गायकी घेऊन हे अवधूत भारतभर फिरले.
संस्कृतमध्ये केलेल्या संगीत रचना ही मुकुल शिवपुत्र यांची भारतीय शास्त्रीय संगीताला दिलेली देणगी आहे. मुकुल शिवपुत्र हे रागांच्या सादरीकरणातील संपूर्ण नव्या दृष्टीकोनाच्या कलेसाठी ओळखले जातात. ते या सादरीकरणाला एक नवीन आयाम देतात आणि त्यातून त्यांचे वेगळे अंग रसिकांसमोर येते. हिंदुस्तानी शास्त्रिय संगीत आणि ठुमरी, चौती, कजरी आणि होरी यांसारख्या काही अर्ध शास्रीय संगीत प्रकारांवरही त्यांचे एकसारखे प्रभुत्व आहे. सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही भजनांचे अगदी उत्तम असे सादरीकरण ते करतात. आपल्या समूहातर्फे मुकुल शिवपुत्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोटय़ा मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले. त्यांनी वही पेन घेतलं आणि ते लिहून गेले..
‘‘कुणी जाल का.. सांगाल का..
सुचवाल का त्या कोकिळा..
रात्री तरी गाऊ नको
खुलवू नको अपुला गळा..
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
कळवाल का त्या कोकिळा की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली!’’
सकाळी त्यांनी ही कविता मुकुलच्या हातात ठेवली. म्हणाले, ‘मुकी, हे घे. फक्त तुझ्यासाठी..’ महाराष्ट्राच्या या लाडक्या कवीने हे सर्वाग सुंदर गीत, मुकुलजींसाठी लिहिलं आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मकुल शिवपुत्र यांचे गायन
https://youtu.be/p1XddjLg818
Leave a Reply