सुप्रभात रसिक वाचकहो , सुप्रभात ! अाज फाल्गुन वद्य अामावास्या ! स्वराज्याच्या द्वितीय अभिषिक्त छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन ! त्याना त्रिवार वंदन करुन एक लेख पाठवतो अाहे……
या अद्वितीय योध्द्यास कोटी कोटी प्रणाम !
उदय गंगाधर सप्रेम-ठाणे.
नमस्कार माझ्या देशबांधवांनो आणि भगिनींनो !
आमचा जन्म सुमारे ३६० वर्षांपूर्वी झाला , आणि आमच्या ध्येयाविषयी किंवा आमच्या कुवतीविषयी काही व्यक्तींना असणार्या शंकांमुळे आम्हाविषयी या व्यक्तींनी फक्त गरळच ओकली आहे किंबहुना आमचा एकमेव दोष फार मोठा करून इतिहासाला दाखवला आहे ! त्यामुळे आपल्यापैकी बर्याच जणांच्या मते आम्ही कुविख्यात असण्याची शक्यता आहे.पण आम्ही केलेल्या एकमेव चुकीचे आम्ही प्रायश्चित्त पण तितकेच कठोर आई भवानीकडून “याची देही याची डोळा” मागून घेतले आणि त्या परम दयाळू मातेने ते दान आंम्हांस दिलेही !
सांगण्याचा मुद्दा असा की, या सगळ्या गोष्टींमुळे माझा जन्म आपणास लक्षात असण्याची सुतराम शक्यता नाही , पण आमचे मरण मात्र आपल्याला जरूर लक्षात असेल – आधी आमची उंटावरून बसून तख्ता कुलाह लावून विदुषकाच्या पेहेरावातील काढलेली धिंड, मग आमचे हाल हाल करताना आधी डोळे, मग जीभ , मग सार्या अंगाची सालडी , मग हात, मग पाय आणि सर्वांत शेवटी आमचे मस्तक धडावेगळे करून आमचे एक एक अवयव वढू बद्रूक येथे गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर टाकणार्या औरंगझेबास आणि शरीराच्या तुकड्या तुकड्यांनी तुमच्या राज्यांतील नदीकिनारी पडलेल्या स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतींना तुम्ही कदाचित् ओळखत असाल ,नाही?
काय आहे , की गेली ३२८ वर्षे आमचा आत्मा तळमळतो आहे आणि आजचे आमचे वंशज मराठा जे भोगत आहेत , आमचा मराठी माणूस जे भोगत आहे ते बघून आत्मा तडफडतो आहे , पण शरीर नसल्याने आम्ही हतबल आहोत ! पुन्हा एकदा आम्ही आपल्यासाठी मरण पत्करायला तयार आहोत , पण माझ्या मराठ्यांनो , तुम्ही जे निधड्या छातीचे वीर आहात , ज्यांनी दुबळ्यांना संरक्षण द्यायचे तेच असे नेभळट , शेंदाड होऊन आरक्षण मागाताय्?माझी खात्री आहे , की हे कुणीतरी तुमच्यावर लादलेले ओझे आहे , पण मग तुम्ही ते झुगारून का नाही देत? आबासाहेबांनी ज्या महाराष्ट्रात एक अफझल्खान संपवला , तिथेच दुसरा अफझल हजारो निष्पाप जीवांचा बळी घेवून जीवंत राहू शकतो?आणि हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी पहाताय? कोण कुठला कसाब हजारो जीवांना ठार मारून अजून जीवंत रहातो आणि हे तुम्ही सारे इतक्या थंडपणे पहाता?मला आज आनंद वाटतोय की हे सारे बघायला आमचे डोळे आमच्याजवळ नाहीत , बोलायला आमची वाचाच नाही , फक्त हे सारे आम्ही आमचा आत्मा आमच्या काही निस्सीम भक्तांपैकी एक – तुमच्य दृष्टीने नगण्य असलेल्या उदय नामक एका माणसाच्या शरीरात शिरून त्याच्या मुखाने बोलतोय इतकेच !
आम्ही वयाच्या आठव्या वर्षी मोंघलांची मनसबदारी पत्करली, राजकारणाच्या सोयीसाठी आम्ही आबासाहेबांचे प्यादे झालो – अरे ज्या देवमाणसाने अख्खा महाराष्ट्र घडवला त्याच्या पोटी आम्ही जन्मलो आणि आमरण फक्त स्वराज्याची सेवाच केली , त्या आम्ही दिलेरखानांस मिळून जी घोडचूक केली ती काही स्वराज्याच्या नरडीस नख लावण्यासाठी नव्हे तर आम्ही पण काहीतरी स्वतंत्रपणे निर्माण करू शकतो आणि ते पण स्वराज्याच्या एकाही छदामास हात न लावता – हे आम्हांस दाखवून द्यायचे होते , पण आमचा होरा चुकला आणि भूपाळ्गड येथील किल्ल्यावरील ७०० निरपराध लोकांचे हातपाय तोडून ते पाप दिलेरखानाने आमच्या माथी एक कधीही न पुसला जाणारा कलंक म्हणून फासून टाकले ! आख्ख्या जिंदगीत केलेले बाकी सर्व स्वराज्यप्रेम आणि सेवा या एका चुकीने झाकली गेली ! पण आमचे आबासाहेब फार थोर मनाचे आणि तितक्याच दूरदृष्टीचे , त्यांनी आमची यातूनही सोडवणूक केली.आमचा हा सवाल आहे तमाम तत्ववेत्त्यांना , की छत्रपती शिवाजी महाराज – जे अन्याय कधीही खपवून घेणारे नव्हते त्यांनी जर का त्यांचा मुलगा बदफैली असता तर त्यांस जिता सोडले असते काय? “आपलेच दात आणि आपलेच ओठ” म्हणून घरच्याच महाराणी साहेबांची जनानी बुद्धी यामागे आहे हे हलाहल पचवत आणि शरीरावर झालेले विषप्रयोग पचवत त्यांनी देह त्यागला ! सख्खा मोठा मुलगा जिवंत असताना वडीलांच्या अंत्यसमयी त्यास न बोलावण्याचे “पुण्य” पदरी पाडून घेणार्या सोयराऊ साहेबांनी उभा जन्म आमच्याशी दावा मांडला ! ज्या दिल्लीश्वर औरंगझेबास थोपवण्यास स्वराज्यात “शंभूराजे” सोडून दुसरे कुणीही समर्थ नाही अश्या विश्वासाने आबासाहेबांनी आम्हांस दिलेरखानापासून सोडवून आणले , त्यांच्या घरातूनच मोठमोठ्या शत्रूंची फळी आमच्याविरुध्द उभी करण्यात आली आणि हे बघण्यासाठी आबासाहेब , थोरल्या आऊसाहेब – जिजाऊसाहेब जिवंत नव्हत्या हे एका दृष्टीने स्वराज्याचे भाग्यच म्हणायचे !
यानंतर आम्हास संगमेश्वरात बेसावध पकडून देण्यात घरचेच जावई गणोजी शिर्के सामील होते हे बघण्यास आबासाहेब तुम्ही नव्हतात हे पण स्वराज्याचे भाग्यच !
यानंतर छत्रपतींचे तीनही जावई – हरजीराजे महाडिक, गणोजी शिर्के आणि महादजी निंबाळकर आमच्या धिंडीत सामील होते , चोर्-चिलटे, रांडा-पोरे-सोरे कुणीही आमच्या आणि कवी कलशांच्या तोंडावर थुकत होते , अंगावर धोंडे मारत होते ….हे पहायला पण आबासाहेब तुम्ही नव्हतात हे पण स्वराज्याचे भाग्यच !
स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींनी “जगावे कसे” हे शिकवले असेल तर स्वराज्याचा दुसर्या छत्रपतींनी म्हणजे आम्ही , स्वाभिमानी माणसाने “कसे मरावे” एह्वढे तरी नकीच दाखवले नाही काय?
आज आम्ही – म्हणजे आमचा आत्मा ३६० वर्षांचा झाला , पण अजून आम्हांस कळत नाही की मराठी माणूस आपल्यावर होणार्या अन्यायाविरुद्ध पेटून कधी उठणार आणि त्यासाठी परत कुणीतरी शिवाजी , संभाजी किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां , धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगेयुगे”असं सांगणार्या श्रीकृष्णाची वाट पहाण्यात आम्ही मराठी माणसे किती वर्षे अजून थांबणार आहोत? देव निष्क्रिय दुर्बळ्यांची नाही तर प्रयत्न करणारांचीच साथ करतो हे ओळखून जर महाराष्ट्रीय माणूस वागेल तर कदाचित आमचा आत्मा मुक्त होईल सुद्धा , कुणी सांगावं?
आमची मुक्तता आपल्याच पदरात घालून आपला निरोप घेतो , जय भवानी , जय शिवाजी , जय महाराष्ट्र, जय भारत !
उदय गंगाधर सप्रेम—ठाणे
Leave a Reply