आजवर कुणी या विषयावर कधी पुस्तक लिहिण्याचा विचारच केला नसेल असा हा विषय म्हणजे ( पंढरपूरपासून ) उलट परतीची वारी ! आषाढी एकादशीला महाराष्ट्रमाऊली विठाईच्या दर्शनाला लाखो भाविक पिढ्यानपिढ्या करीत असलेली वारी, हा एक जागतिक कुतूहलाचा विषय झाला आहे. त्यामुळे यावर आजपर्यंत आणि दरवर्षी विविध लेख, विशेषांक , चित्र सफरीच्या शॉर्टफिल्म्स, कथा, पुस्तके , वृत्तवाहिन्यांचे दैनंदिन वृत्तांत आपण पाहतोच.
पण .. एकादशीनंतर ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका पुन्हा आळंदीला घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांची ” परतवारी “, म्हणजे काय प्रकार असेल ? याची कुणीही फारशी दखलच घेतलेली नाही. सुधीर महाबळ नामक एका इंजिनियर तरुणाने अनेकवर्षे नित्यनेमाने वारी केल्यानंतर त्याला नेमकी याचीच उत्सुकता होती. गेली काही वर्षे ही अतिशय खडतर परतवारी करून त्याने लिहिलेल्या ” परतवारी” या अत्यंत वेगळ्या आणि अस्पर्श विषयावरील मराठीतील एकमेव पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन, अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते झाले. यावेळी केलेल्या भाषणांतून डॉ. रवीन थत्ते, शरद काळे, अच्युत गोडबोले, अरुण साधू, दीपा देशमुख, अशा सर्व नामवंत लेखकांनी या पुस्तकाचे खूप कौतुक केले.
महत्वाचे म्हणजे सुधीर महाबळ याच्या पायाला गंभीर अपघात होऊन २ मोठ्या शास्त्रक्रियांनंतर तो सुमारे १ वर्ष अंथरुणावर पडून होता. त्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने उभा राहून तो इतकी कठीण आणि शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी परतवारी करतो आहे. नोकरीनिमित्त विदेशात असताना केवळ या परतवारीसाठी तो भारतात येत होता.
हे संपूर्ण पुस्तक म्हणजे एका वेगळ्याच विषयाची , वेगळ्याच वाटेने, वारी आणि परतवारी घडविणारे सुंदर पुस्तक आहे. प्रवास जरी पंढरपूर ते आळंदी असला तरी तो वाचकांना अनेक पातळीवर घडतो. या परतवारीत चालायला लागल्यावर कधी माणसे दिसतात तर कधी व्यक्तिचित्रे दिसतात. माणसांच्या मनोव्यापारांबरोबरच अनेकदा या परतवारीत सुंदर निसर्गचित्रे दिसतात. समोरच्या घटनेचे जे कारण दिसते ते आपले बुद्धिवादी मन थेट स्वीकारत नाही आणि केवळ आपल्याला कारण कळत नाही म्हणून त्या घटना घडणे थांबत नाही. त्याचमुळे आपण ज्यांना अद्न्य समजतो ती माणसे एखाद्या गोष्टीचा निखळ आनंद घेत असतांना, आपला बुद्धिवादाचा, आपणच घातलेला अडसर, या आनंदात आपल्याला पूर्ण भिजू देत नाही. त्यांच्या मळक्या कपड्यापासून आणि बाचक्या – गबाळ्यापासून आम्हा वाचकांचे जीन्स-टीशर्ट- सॅक वेगळेच राहतात. पुस्तक वाचतांना सतत येणारा हा अनुभव विलक्षण आहे. चमत्कार घडला तरी आम्ही तो मान्य करीत नाही, योगायोग समजतो. वारकऱ्यांच्या ऐहिक दारिद्र्य आणि अध्यात्मिक श्रीमंतीचा अदृश्य गोफ सतत गुंफताना जाणवतो.
या वारीत रोजच्या ऐहिक गोष्टी करता करता ती अध्यात्मिक पातळीवर कधी पोचते हेच कळत नाही. माउली, रथ, पादुका, वाजंत्री, माणसे, वाहने, भक्तिभाव, प्राणी, औदार्य, माणसांच्या स्वभावांचे विविध रंग , गरजा अशा अनेक गोष्टींची ही परतवारी पावसाच्या विविध छटांतून , चंद्र – सूर्यप्रकाशातून अनेक गावांमधून टप्पे घेत – पडाव टाकत – वळणे घेत मुक्कामाला पोचते तेव्हा …. ! त्या वेळेपुरती पूर्ण झालेली परतवारी ही पूर्णत्वाच्या आनंदाबरोबरच ” पुन्हा पुढच्या वर्षी करायलाच हवी ” अशी अपूर्णतेचे बीजही पेरते.
एक विलक्षण अनुभव सर्वांनी जरूर वाचावा असा आहे.
संपर्क – श्री. सुधीर महाबळ … मोबाईल क्र. ९१६७७२०४१३
मकरंद करंदीकर
Leave a Reply