जगातील निरनिराळ्या देशात आणि धर्मात, कालगणना करण्याच्या आपापल्या पध्दती आहेत. हजारो, शेकडो वर्षापासून, त्या पध्दतींनी, प्रत्येक दिवसाची तिथी ठरविली जाते. बव्हंशी, या कालगणनेची सुरूवात, अेखाद्या धर्मसंस्थापकाच्या, अेखाद्या महापुरूषाच्या, सत्तासम्राटाच्या किंवा युगपुरूषाच्या जन्मतिथीशी निगडीत असते. अेखादी पवित्र घटना किंवा युध्दातला मोठा विजय संस्मरणात रहावा म्हणूनही अेखादी कालगणनपध्दती सुरू केली जाते आणि काही अनुयायी ही पध्दत शेकडो, हजारो वर्षे पाळतात.
पारंपारिक गुढीपाडवा साधारणपणे मार्च-अेप्रिल महिन्यात येतो. मंगळवार 28 मार्च 2017 रोजी पारंपारिक गुढीपाडवा, म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा आहे. त्या दिवसापासून हेमलंबीनाम संवत्सर सुरू होअून शालिवाहन शके 1939 चा प्रारंभ होणार आहे. त्या दिवशी आपण नववर्षाचं स्वागत करून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देणार आहोत. त्यानिमित्ताने हा सत्संग.
शिख दिनदर्शिका :: 13 मार्च 1998 पर्यंत शिखधर्मीय, हिंदू चांद्रमास दिनदर्शिकाच पाळीत होते. पण 14 मार्च 1999 पासून त्यांनी ग्रेगोरियन सौर दिनदर्शिकेचा स्वीकार केला आणि शिख दिनदर्शिकेला नानकशाही दिनदर्शिका असं नाव दिलं. त्या दिवशी शिख दिनदर्शिकेनुसार नववर्षदिन 1 चेत नानकशाही 531 होता. कारण तो, शिखांचे 1 ले गुरू नानकदेव यांचा जन्मदिवस अि. स. 1469 होता. 1469 मध्ये 531 मिळविले म्हणजे अि. स. 2000 होतात.
शिख दिनदर्शिकेचे महिने आणि त्यांचे आरंभदिवस असे आहेत.
चेत (चैत्र) : मार्च 14, वैशाख : अेप्रिल 14, जेठ (जेष्ठ) : मे 15, हर (आषाढ) : जून 15, सावन (श्रावण) : जुलै 16, भादो (भाद्रपद) : ऑगस्ट 16, आसू (आश्विन) : सप्टेंबर 15, कातिक (कार्तिक) : ऑक्टोबर 15, माघर (मार्गशीर्ष) : नोव्हेंबर 14, पोह (पौष) : डिसेंबर 14, माघ : जानेवारी 13 आणि फागन (फाल्गुन) : फेब्रुवारी 12. (संदर्भ :: गुगल)
ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार, येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस 24 डिसेंबर ठरविला आहे. पण काही तांत्रिक कारणामुळे ख्रिस्ती दिनदर्शिकेचा आरंभ दिवस 1 आठवड्याने पुढे ढकलण्यात आला आहे. त्यानुसार 1 जानेवारी हा 2017 व्या वर्षाचा पहिलाच महिना. रविवार 1 जानेवारीला आपण 2017 या नववर्षाचं स्वागत केलं.
भारतीय राष्ट्रीय कालदर्शिकेनुसार, सौर चैत्र प्रतिपदा, म्हणजे गुढीपाडवा, दरवर्षी 22 मार्चलाच येतो. लीप वर्षात तो 21 मार्चला येतो. ही कालदर्शिका डॉ. मेघनाद साहा यांनी तयार केली असून ती अिसवी सन 1957 सालापासून भारत सरकारने स्वीकारली आहे. 1 जानेवारीला अवकाशात, पृथ्वीसंबंधीत अशी कोणतीही घटना घडत नसते. पण सौर चैत्र प्रतिपदा या नववर्ष दिवशी सूर्य विषुववृत्तावर येत असल्यामुळे दिवस आणि रात्र बरोबर 12 तासांचे असतात. यालाच वसंत संपात असे म्हणतात. या दिवशी सूर्य जेथे अुगवतो ती खरी पूर्व दिशा आणि जेथे तो मावळतो ती खरी पश्चिम दिशा असते. म्हणून या गुढीपाडव्यास शास्त्रीया (खगोलीय) बैठक आहे.
भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर 22 मार्च 1957 पासून स्वीकारण्यात आले आहे. त्याला शालिवाहन शके असं नाव देण्यात आलं आहे. या दिनदर्शिकेचं प्रत्येक वर्ष शालिवाहन शकाचं वर्ष समजण्यात येतं. म्हणजे आपण शालिवाहन शकाची सुधारित पध्दती स्वीकारली आहे.
अिसवीसनाच्या वर्षातून 78 वजा केले की शालिवाहन शकाचं वर्ष मिळतं. 1957 मधून 78 वजा केले की 1879 हे शालिवाहन शक मिळतं. म्हणजे ज्या दिवसापासून हे राष्ट्रीय कॅलेंडर भारतसरकारनं स्वीकारलं त्यादिवशी चैत्र प्रतिपदा शके 1879 होते. ग्रेगोरियन कॅलेंडरानुसार तो दिवस 22 मार्च 1957 होता.
आता 1 जानेवारी 2017 या दिवशी, भारतीय राष्ट्रीय कालगणनेनुसार शके 1938 च्या पौष महिन्याची 11 तारीख होती. तर पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष शुध्द तृतीया शके 1938 होती. शालीवाहन शक ही कालगणना अिसवीसन 78 साली सुरू झाली.
भारतीय राष्ट्रीय कॅलेंडराचं लीप वर्ष जाणण्यासाठी शक वर्षात 78 मिळवून येणारं अिसवीसनाचं वर्ष जर लीप वर्ष असेल तर राष्ट्रीय कॅलेंडराचं शकवर्ष, लीप वर्ष समजतात. लीप शक वर्षात, चैत्र प्रतिपदा 21 मार्चलाच येते. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका, पर्शियन दिनदर्शिकेशी बरीच मिळतीजुळती आहे.
गुरूवार 17 ऑगस्ट 2017 रोजी पारशी बांधवांचा नववर्षदिन म्हणजे पतेती आहे. त्या दिवसापासून पारशी सन 1387 ची आणि फरवर्दिन महिन्याची सुरूवात होणार आहे. त्या दिवशी पारशी बांधव अेकमेकांना आणि आपण आपल्या पारशीमित्रांना नववर्षाच्या शुभेच्छा देणार आहोत. या दिवशी श्रावण कृष्ण दशमी शालिवाहन शके 1939 आहे.
शुक्रवार 22 सप्टेंबर 2017 रोजी मुस्लिम नववर्ष हिजरी सन 1439 चा प्रारंभ होणार आहे. त्या दिवसापासून मोहरम महिना सुरु होअील. या दिवशी आश्विन शुध्द द्वितीया ही हिंदू तिथी असेल.
शुक्रवार 20 ऑक्टोबर 2017 रोजी दिवाळीचा पाडवा आहे. त्या दिवसापासून विक्रम संवत 2074 चं सौम्यनाम संवत्सर सुरू होणार आहे. तसंच महावीर जैन संवत 2544 चाही प्रारंभ होणार आहे. म्हणजे विक्रम संवत, अिसवीसनाच्या 57 वर्षे आधीपासून आणि जैन संवत, अिसवीसनाच्या 527 वर्षे आधीपासून सुरू झाले आहेत.
अर्थात, या सर्व नववर्षांच्या पहिल्या दिवशी, काही भारतीय नागरिक, भारतातच नव्हे तर परदेशीही, पारंपारिक प्रथांनुसार, आपापलं नववर्ष दिवस साजरं करून अेकमेकांना शुभेच्छा देणार आहेत.
चैत्र हा आपल्या वर्षारंभाचा महिना आहे, तसंच फरवर्दिन हा पारशी नव्यावर्षारंभाचा आणि मोहरम हा मुस्लिम नववर्षारंभाचा महिना आहे. चेत (चैत्र) हा शिखांचा नानकशाही नववर्षारंभाचा महिना आहे.
अख्ख्या जगात हजारो कालगणन पध्दती आहेत, त्यांच्या दिनदर्शिका आहेत, त्यांचे अनुयायी वर्षानुवर्षे नववर्ष दिवस नियमितपणे साजरे करीत आहेत आणि अेकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देअून, नवीन किंवा ठेवणीतले पोशाख घालून मेजवान्या झोडीत आहेत.
आपापलं नववर्ष दिवस साजरं करण्यामागे सामाजिक रूढी आणि परंपरा आहेत. अुत्सवप्रियता आणि समाजबंधन या तत्वावर हे सण साजरे केले जातात. त्यात दैविक किंवा अध्यात्मिक भाग नाहीत, केवळ संकल्पना आहेत.
निरनिराळ्या कालगणन पध्दतींना जरी शास्त्रीय बैठक असली तरी त्यांच्या आरंभ दिवसाला, म्हणजे, त्या त्या कालगणन पध्दतीच्या नववर्ष दिवसाला, विज्ञानीय आधार नाही. आदले दिवशी त्या कालगणनेनुसार 1 वर्ष पूर्ण झालं असलं तरी 365 दिवस पूर्ण झाले असतातच असं नाही.
सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्रं वगैरे खगोलांच्या आकाशातील स्थितीवरून आणि त्यांच्या परिभ्रमण काळावरून महिने, वर्षे आणि शतकं, सहस्त्रकं ठरविली जातात आणि कालगणना केली जाते. कालमापन हे पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या परिभ्रमणावर आधारलेलं आहे तर कालगणन हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणांच्या काळावर आधारलेलं आहे. सूर्याभोवती 1 प्रदक्षिणा करण्यास लागणार्या् काळात, पृथ्वीची स्वत:भोवती 365 परिभ्रमणं होतात. म्हणून 365 पूर्ण दिवसांचं 1 पृथ्वीवर्ष होतं हे वास्तव आहे, संकेत नाही.
नववर्षाचे दिवस, पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेत, कुठेना कुठे तरी असतातच. वास्तविक, प्रत्येक सेकंदाला आणि सूर्याभोवतीच्या परिभ्रमण कक्षेतील प्रत्येक बिंदूला, पृथ्वी, आपली अेक प्रदक्षिणा पूर्ण करीत असते आणि पुढच्या सेकंदाला नवीन वर्ष सुरू करीत असते.
— गजानन वामनाचार्य, मुंबअी
शनिवार 25 मार्च 2017
शनिवारचा सत्संग : 17
Leave a Reply