‘अति सर्वत्र वर्ज्ययेत्।’ अशी एक म्हण आहे. एखादी गोष्ट कितीही चांगली असली तरी तिचा अतिरेक वाईटच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हेगन डायट. १९४४ साली इंग्लंडमध्ये व्हेगन ही संकल्पना जन्माला आली. याचे प्रणेते डोनाल्ड वॉटसन यांच्यावर गांधींच्या अहिंसावादी तत्वज्ञानाचा प्रभाव होता. १९२० साली गांधींनी नैतिकतेच्या बळावर शाकाहाराचा पुरस्कार करायला हवा असे भाषण इंग्लंड येथील ‘व्हेजिटेरियन सोसायटी’समोर दिल्यावर वॉटसन फारच प्रभावित झाले आणि शाकाहाराचा हा अतिरेक जन्माला आला. व्हेगन डायट म्हणजे प्राणिज अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग. ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, मध हे पदार्थदेखील खाण्यास वर्ज्य मानतात. हे पदार्थ मिळवताना हिंसा होते असा त्यांचा सिद्धांत.
यामुळे स्वाभाविकपणे वरील पदार्थांचे पर्याय शोधणे क्रमप्राप्त होते. मग दुधाला पर्याय म्हणून सोया, हेम्प, कोकोनट आणि अल्मन्ड मिल्क सुरु झाले तर लोण्याचा पर्याय (तूप ही संकल्पनाच माहिती नसल्याने) म्हणून व्हेगन मेयोनीज आले. चीझ वा पनीरच्या जागी टोफू आणि पोषक आहार म्हणून फळांचे रस पिणे सुरु झाले. आज या आहाराचा इतका बोलबाला आहे की जगातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर त्याची भलामण करताना दिसतात. जागोजागी व्हेगन सोसायटी जन्माला आल्या आहेत. हे लोक केवळ आपल्या आहारापुरते एकत्र आलेले नसून दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या शाकाहारी लोकांवर यथेच्छ घणाघात करत असतात. मांसाहाराबद्दल तर बघायलाच नको!!
नाण्याची दुसरी बाजू.
दूध आणि तूप हे शरीराला पोषण देणारे सर्वोत्तम पदार्थ आहेत असं आयुर्वेद सांगतो. ‘घृतं वै आयु:।’ अशी श्रुती आहे. आमच्याकडे पूजेचा प्रसाद पंचामृत तीर्थाशिवाय पूर्ण होत नाही याचे हेच कारण आहे. इथे भगवंतांची पूजादेखील ‘गोपाल’ या नावाने केली जाते. गोशाळांच्या माध्यमातून दूग्ध संकलन केले जात असताना वासरांवर कोणताही अन्याय अत्याचार होत नसून उलट त्यांचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केला जातो हे तथ्य आहे. मधवरील आक्षेप अंशतः मान्य. म्हणूनच तो केवळ आपद्धर्म म्हणून ‘औषधापुरता’ वापरावा हा पर्याय असू शकतो.
आहारातून दूध तुपासारख्या शुक्रधातू आणि ओज वाढवणाऱ्या पदार्थाना दूर सारून जे व्हेगन पर्याय वापरले जातात ते प्रामुख्याने कडधान्यांपासून बनलेले असतात. कडधान्ये ही फोडणीशिवाय सतत वापरल्यास शुक्रधातू आणि ओज या दोहोंना घटवतात. यांच्यावरच आपले आरोग्य आणि आयुर्मान अवलंबून आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. याशिवाय व्हेगन आहारातून ज्या पोषणमूल्यांची पूर्तता होत नाही त्यांची पूर्तता करण्यासाठी ‘सप्लिमेंट्स’चा सोप्पा मार्ग निवडून आत्मघात केला जातो. (या आधीचा लेख जरूर वाचा.) पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात व्हेगन डायटला आपल्या देशात सध्या प्रसिद्धी मिळू लागली आहे. याबाबत वेळेच सावध होणे गरजेचे आहे. जिथे परमेश्वरालादेखील लाडाने ‘माखनचोर’ असे म्हटले जाते; त्याच्या हातावर आवर्जून लोण्याचा मऊसर गोळा देण्याची प्रथा आहे. जिथे घराघरांना गोकुळाची उपमा दिली जाते आणि आपल्या तान्ह्या बालकांनाही कौतुकाने दुधातुपाने आणि लोण्याने पोसले जाते. अशा या हिंदुस्थानात व्हेगन डायटसारख्या प्रकारामागे धावणे म्हणजे कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे आहे. प्राणीप्रेम जरूर असावे; भूतदया महत्वाचीच. पण त्याचा हा मार्ग नव्हे हे निश्चित!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
नमस्कार.
व्हेगन डायट हें खरोखरच एक मोठें फॅड बनले आहे. न्यूट्रिशनच्या पुस्तकांमध्ये त्याचा बोलबाला असतो.
नाण्याची दुसरी बाजू दाखवून लोकांना सावधान केलेत, हे अभिनंदनीय.
– सुभाष स. नाईक