मराठी भाषेतील ज्येष्ठ विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ बुवा ऊर्फ वि. आ. बुवा यांचा जन्म ४ जुलै १९२६ रोजी झाला.
वि. आ. बुवा यांनी आपल्या लेखनाचा प्रारंभ १९५० मध्ये केला. मुंबई येथील व्ही. जे. टी. आय. तंत्र महाविद्यालयात बुवा यांनी रसायनशास्त्र विभागात १९८६ मध्ये निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. बुवा यांवे वक्तृत्व उत्तम असल्याने व्याख्याने व कथा-कथनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही त्यांनी दौरे केले होते. संस्कृत भाषेचा त्यांचा अभ्यास होता. सुंदर हस्ताक्षराच्या जोरावर त्यांनी १९५० मध्ये इंदुकला नावाचा एक हस्तलिखित साहित्याचा अंक प्रकाशित केला होता. हे हस्तलिखित दर्जेदार स्वरूपात असल्याने साहित्यिकांचा चांगला पाठिंबा यास मिळाला. अनंत काणेकर, महादेवशास्त्री जोशी, चिं. वि. जोशी, दुर्गा भागवत, माधव मनोहर, गो. नी. दांडेकर, शांता शेळके, वसंत बापट, विजय तेंडुलकर आणि द. मा. मिरासदार असे गाजलेले साहित्यिक या अंकासाठी लिखाण करत असत.
पुढे नवशक्ती या वृत्तपत्राचे संपादक प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना वृत्तपत्रातून लिखाणासाठी उद्युक्त केले आणि त्यांनी वृत्तपत्रातून विनोदी लेखनास प्रारंभ केला. त्यांची विनोदी शैलीतील एकूण १५० पुस्तके प्रसिद्ध झाली होती. त्यांनी विनोदी लेखनाबरोबरच आकाशवाणीवरील श्रुतिका, विनोदी निबंध, पटकथा, तमाशाच्या संहिता, विडंबने, एकांकिका असे विविध स्वरूपाचे लेखन केले आहे. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, कल्पकता आणि उत्स्फूर्त विनोद ही वि. आ.बुवा यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये मानली जात. हंस दिवाळी अंक, मोहिनी दिवाळी अंक, नवयुग दिवाळी अंक, आवाज दिवाळी अंक अशा कितीतरी मासिके व दिवाळी अंकांतून मा.बुवा यांनी लेखन केले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ आणि नाट्य पुरस्कार समित्यांवर अनेक वर्षे त्यांनी परीक्षक म्हणून काम पहिले होते. आकाशवाणीवर त्यांचे ६०० हून अधिक कार्यक्रम प्रसारित झाले.
त्या काळच्या “पुन्हा प्रपंच” या लोकप्रिय मालिकेसाठी ४०० हून अधिक भागांचे लेखन त्यांनी केले.
वि. आ. बुवा यांचे १७ एप्रिल २०११ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मला वि आ बुवांची “राम जलमाची बेस्ट स्टोरी ” ही कथा पाहिजे होती। कोठे मिळेल?
वि.आ.बुवा ह्यांचे बरेच विनोदी साहित्य माझ्या वाचनात आले. पण विकीपेडीया सारख्या जागतिक स्तरावर उपलब्घ असलेल्या ग्रंथसंचामध्ये त्यांची कोणी हि विस्तृत माहिती दिली नाही हे आश्चर्यच . जसे जन्मगाव बालपण त्याचे साहित्य हीच गोष्ट अनेक प्रसिद्ध साहित्यिक व लेखकांच्या बाबतीत . जुजबी माहिती देण्यात आपण मराठी माणसांनी तरी वसा घ्यायला हवा .