मन. मानवी मन, या विषयावर अनेक विचारवंत, वैज्ञानिक, मनोविश्लेषक, आध्यात्मिक गुरू यांनी विपुल लेखन केले आहे. मनाच्या हिदोळ्यावर कवी, कथाकार, साहित्यकार यांनी अनेक रचना केल्या. मन वढाय, वढाय हे मराठी माणसाला चांगलंच ठाऊक आहे. मनामध्ये निर्माण होणार्या ‘का?’ या एकाक्षरी शब्दानं विज्ञान व्यापून राहिलंय. केवळ का अन् कसे यातून अनेक गूढ उकलण्याचा प्रयत्न झालाय आणि त्यानंतरही का अन् कसे हा प्रवास संपलेला नाही. थांबलेला नाही. मनोनिग्रह, मनावर ताबा, मनाचा वापर यात मनाच्या शक्तीचा उपयोग कसा करून घेता येतो, हे सांगण्याचा प्रयत्नही अनेकांनी केलाय. भारतीय आध्यात्मिक परंपरेने तर माया सिद्धान्तानं सारंच मिथ्या असल्याचं सांगितलंय आणि याबरोबरच ‘दिल जो भी कहेगा, मानेंगे, दुनियामें हमारा दिल ही तो है!’ असा बंडात्मक पवित्राही काहींनी घेतला आहे. माझं मन, तुझं मन यातलं अंतर सांगण्याचा प्रयत्नही नवा नव्हे. मला वाटतं, असं म्हणताना होणारा मनाचा उल्लेख महत्त्वाचा की त्यातल्या अहंचा, यावरही मोठी चिकित्सा झालेली आहे. असं असलं तरी सारं विश्व व्यापूनही मनाचा थांग लागतो असं नव्हे. चार आंधळे आणि हत्ती या गोष्टीप्रमाणे मनाच्या रचनेचा, अस्तित्वाचा, कारणांचा शोध चालूच आहे. भगवान म्हणतात, ‘मन हे मानवी संस्कृतीइतकंच पुरातन आहे. हजारो-लाखो वर्षांचा हा प्रवास आहे. सारं विश्व, ब्रह्मांड एक आहे, अद्वैत आहे तसंच मनाचंही आहे. मनही एकच आहे. अनुभव, चिकित्सा आणि त्याचे निष्कर्ष यावरून मनाचे लाखो विभाग आपण करीत असतो, एवढंच. अन्यथा मानवी मन ही एकमेव बाब आहे. त्यात माहिती, ज्ञान, संशोधन यांची भर पडत जाते. अनुभवांनी, क्रिया-प्रतिक्रिया यांनी मनाची वाढ किवा जोपासना होते इतकंच. भय, चिंता आणि स्वत्वाची भावना ही मनाची प्राथमिक, सर्वकालीन अशी वैशिष्ट्ये होत. भीतीची रूपं व्यक्तीनुसार बदलतात, चिंता अनुभव आणि घटनेच्या चिकित्सेतून नवा आकार घेतात आणि स्वत्वाच्या भ्रमातून उत्साह, द्वेष, मत्सर, स्पर्धा, लालसा यांचा जन्म होतो इतकेच. अन्यथा कोट्यवधी मानवाच्या मनाची रचना ही एकच. माहितीच्या विश्लेषणाच्या बौद्धिक कुवतीतून ज्ञान आणि संस्कार अवतरतात आणि मग माझं-तुझं मन वेगळं होतं. कधी काळी मला हिस्र प्राण्यांची भीती होती. आज माणसाला माणसाची भीती आहे. माझा, आपला, आपल्या सर्वांचा, जगाचा, मानवाचा विचार असा प्रवास होण्याऐवजी तो माझा असाच कुंठीत झाला अन् मग त्याला माझा-माझ्यावरही विश्वास राहीना. माझ्यातला मीही मग धास्तावू लागलो. एकाच घटनेचे एका क्षणात जेव्हा हजारो अर्थ लावले जातात, त्या वेळी घटना बदलत नसते, मनाच्या माध्यमातून त्याचे अन्वयार्थ बदलत जातात. त्या निसर्गानं मानवाला मनाच्या अस्तित्वाची देणगी दिली. आज तीच समस्या आहे. त्यामुळं मनावर तुम्ही स्वार व्हायचं की मनाला तुमच्यावर स्वार होऊ द्यायचं हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply