अमजद खान, अमरीश पुरी यांच्यानंतर चे सर्वात खतरनाक वाटणारे हिंदी – मराठी चित्रपटातील खलनायक सदाशिव अमरापूरकर यांना आपल्या वडिलांचा व्यवसाय असतानाही, मात्र शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांचा जन्म ११ मे १९५० रोजी अहमदनगर येथे झाला. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात नाट्य स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला होता.
“हॅंडस् अप’, हे त्यांचे अविनाश मसुरेकर आणि भक्ती बर्वे यांच्या समवेतचे पहिले व्यावसायिक नाटक रंगमंचावर आले आणि प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. या नाटकातल्या यशानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. याच नाटकातली त्यांची भूमिका पाहून दिग्दर्शक आणि निर्माते गोविंद निहलानी यांनी त्यांना “अर्धसत्य’ या चित्रपटात ओम पुरी यांच्या समवेत भूमिका दिली होती. या चित्रपटातली त्यांनी केलेली बेरक्या आणि धूर्त, कटकारस्थानी “रामा शेट्टी’ची ही भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या समर्थ अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडले.
१९९१ मध्ये “सडक’ या चित्रपटात त्यांनी तृतीय पंथियाची केलेली भूमिका गाजली होती. याच भूमिकेबद्दल त्यांना “फिल्मफेअर’ पुरस्कारही मिळाला होता. रंगभूमीवरच्या नाटकात त्यांना भूमिका करणे विशेष आवडत असले, तरीही चित्रपटाच्या व्यवसायात गर्क झाल्यामुळे, पुढे त्यांना मोजक्याच नाटकात भूमिका करता आल्या. सदाशिव अमरापूरकर म्हणजे दुष्ट खलनायक असा शिक्का त्यांच्यावर बसला. पुराना मंदिर, नासूर, मुद्दत, विरू दादा, जवानी, फरिश्ते, या चित्रपटातल्या त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. अभिनेता धर्मेंद्र यांच्याबरोबर त्यांनी हुकूमत या चित्रपटात पहिला खलनायक रंगवला होता. त्यानंतर त्यांनी याच अभिनेत्याबरोबर अनेक चित्रपटात खलनायकाच्या हुकमी भूमिका केल्या.
विविध प्रकारच्या खलनायकाच्या भूमिका रंगवणाऱ्या अमरापूरकर यांनी स्वत:ला त्याच चौकटीत अडकवून मात्र घेतले नाही. उत्तम चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता, असा लौकिकही त्यांनी मिळवला. हिंदी, मराठी, हरियाणवी, बंगाली, ओरिया यासह अन्य भाषातल्या ३०० च्या वर चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. ‘अर्धसत्य’, ‘सडक’ या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कारही त्यांनी प्राप्त केले होते. अहमदनगरच्या स्नेहालय, लोकशाही प्रबोधन व्यासपीठ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सामाजिक कृतज्ञता निधी, अहमदनगर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय यासह अनेक संस्थात ते सक्रिय होते. या संस्थांना त्यांनी आर्थिक मदतही केली होती. सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबर २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply