आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सात
निसर्गाचे नियम – सर्वांसाठी सारखेच – भाग सहा !
काही फळांचे “सीझन” असतात. काही फुलांचा “हंगाम” असतो. काही वनस्पतींची “बेगमी” विशिष्ट मोसमातच करावी लागते. भाताची शेती पावसाळ्यातच केली जाते. असे का ? यालाच तर “निसर्ग” म्हणतात.
आंबे आंब्याच्याच दिवसात, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, या महिन्यातच का लागतात ?
जांभळे, करवंदे, जाम, फणस ही फळेदेखील याच महिन्यात मिळतात. गुलमोहराचा बहर आत्ताच सुरू असतो. असे का होत असावे ?
निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे.
केवळ मानवालाच नव्हे तर निसर्गातील प्रत्येकाला इथे विशिष्ट जागा, आजच्या भाषेत “स्पेस” आहे.
निसर्गातील प्रत्येकाला जगण्यासाठी आवश्यक ते सर्व निसर्गानेच तयार करून दिलेले आहे. सहा महिन्यांचा आदान काल आणि सहा महिन्यांचा विसर्ग काल त्यानेच बनवलेला आहे. पण आपण ते युक्तीने वापरत असतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधे शक्तीचे हे मैत्रीपूर्ण आदान प्रदान, कोणाच्याही, कोणत्याही तक्रारीशिवाय सुरू आहे. आणि असेच पुढे देखील सुरू राहणार आहे.
ज्या कालावधीमधे निसर्गाने द्यायला सुरवात केली आहे, त्यावेळी त्याच्याकडून आनंदाने घेत जावे. फळे दिली फळे, फुले दिली फुले, ऊन दिले तर ऊन. पाऊस दिला तर पाऊस आणि देईल तेवढी थंडी. त्यापासून स्वतःचा फायदा करून घेत स्वतःचा बचाव कसा करायचा ही युक्ती आहे.
उन्हाळ्यात मिळणाऱ्या फळांचा आस्वाद तेव्हाच घ्यावा. गरज असेल तर औषधी स्वरूपात टिकवून ठेवावा, औषधी स्वरूपात टिकवून ठेवण्यासाठी आसव अरीष्ट, अवलेह, गुटी, वटी, गुलकंद इ. स्वरूपात कोणत्याही रासायनिक टिकाऊ द्रव्याशिवाय टिकवून ठेवायच्या पद्धती देखील अभ्यासक्रमात शिकवल्या जातात.
व्यापारी वृत्ती आली आणि त्यातील औषधी गुण कमी होत गेले. हवं तसं ओरबाडण्याची वृत्ती निर्माण झाल्यामुळे देखील काही दिव्य औषधी कायमच्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संवर्धन, संगोपन होणे तेवढेच गरजेचे आहे.
जे द्रव्य नाशीवंत आहे, त्यावर प्रोसेस करून ते द्रव्य टिकवले जाईलदेखील, पण त्यातील औषधी गुणधर्म कमीच होतो, नैसर्गिक अधिवासामधे उगवलेली शतावरी, गुळवेल या सारख्या वनस्पती आणि कल्टीव्हेटेड वनस्पती यांच्या गुणांमधे नक्कीच फरक पडतो.
औषध म्हणून वापरायचे असल्यामुळे चालेल. पण जीभेचे चोचले म्हणून, फक्त तीन महिन्यात मिळणारा आंबा, “रस” या स्वरूपात टिकवून ठेवून, पावसाळ्यात खाल्ला तर त्रास नक्कीच होणार.
निसर्ग म्हणतो, तुम्हाला मी आंबे तयार करून पाठवलेले होते. तेव्हा तुम्हाला खायला वेळ नव्हता, तोच आंबा पुढे “अ-काली” खाल्ला तर, अकारण अग्निमांद्य निर्माण करून घेणार. जी गोष्ट आंब्याची तीच अन्य सर्व अन्नपदार्थांची ! इन्स्टंट फास्ट फूड आणि टू मिनटस मे रेडी पदार्थांची !
पाश्चात्य देशात, त्या देशांची ती गरज आहे, त्यांना निसर्ग अनुकूल नाही.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधे ही मंडळी राहत असतात. चौवीस तास बर्फ, अवेळी पाऊस, चुकुन सूर्य दिसला तर आनंद होऊन, “गुड माॅर्निंग” म्हणणारे ते देश ! अन्य शेती व्यवसाय करायचा म्हटला तरी त्यांना ते शक्य होणारे नसते. म्हणून निसर्गाला पूरक परिस्थिती निर्माण करीत अन्नधान्यांचा साठा करावा लागणे, ही त्यांची गरज आहे.
आमच्याकडे ” एव्हरी डे इज गुड माॅर्निंग ” असताना, सिझनल फळे, फुले, भाज्या इ.इ. सर्व उपलब्ध होत असताना, ज्युस काढून पुनः त्यात विषारी किटकनाशके घालून, टिकवून, निसर्गाच्या विरोधात जाऊन, अवेळी खाऊन, रोग वाढवून, पुनः त्यासाठी अनैसर्गिक औषधे खायची !
ही हौस भारीच म्हणायची !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.05.2017
Leave a Reply