नवीन लेखन...

सोशल मिडीया आणि त्यावर व्यक्त होणं-एक तारतम्य..

मी सोशल मिडीयावर लिहितो. खूप लिहितो. बऱ्याचदा वैचारीक, जड असं काहीतरी लिहीतो. सहज मनात आलेले विचार असतात ते. हे असं का आणि ते तसंच का, असे खुप विचार माझ्या मनात सतत पिंगा घालून मला छळत असतात. हे कुणाकडे व्यक्त करावेत, तर ते ऐकून घ्यायला कुणाकडे वेळच नाही आणि पुन्हा या विचारांचा तसा काही उपयोगही नाही (असं त्याचं मत). सध्या ‘प्रोफेशनलिझम’ची चलती असल्यामुळे, उपलब्ध वेळेचं रूपांतर जास्तीत जास्त पैसे मिळवण्यात कसं करता येईल याच्याच विचारात सर्व असतात, त्यामुळे फुकट विचार करायला वेळ का घालवायचा, हा त्यांचा विचार असेल तर तो चुकीचाही म्हणता येणार नाही.

पैसे कमावण्यापुढे इतरही काही विचार असतात वैगेरे गोष्टी बहुतेकांच्या गांवी नसतात. मी तर असंही एकलंय, खरं खोटं माहित नाही, की बडे ‘प्रोफेशनल’, ज्यांना लिफ्टमधे भेटल्यावर आपण ‘गुड मॉर्निंग, कसे आहात’ असं विचारलं तरी तेवढ्या वेळेचं कॉन्फरन्सचं बील पाठवतात. अशी सर्व परिस्थिती असताना, मनातले विचार मग मनातच जिरून गेले तर त्यात नवल ते काय..! आणि काहीही ‘जिरवण’ तब्येतीला चांगलं नसतं असं वैद्यकशास्त्र सांगतं असूनही आपण कितीतरी गोष्टी जिरवत असतोच की, मग विचार जिरवले तर काय एवढा मोठा फरक पडणार आहे?

निसर्गाचं एक तत्व आहे, युज इट ऑर लूज इट’. आपल्याला निसर्गाने दिलेला प्रत्येक अवयव किंवा अक्कल, जिला सॉफिस्टीकेटेड भाषेत बुद्धी असंही म्हणतात, त्याचा वेळोवेळी वापर करणं गरजेचं असतं नपेक्षा तो अवयव किंवा ती क्षमता नाहीशी होते. आपली शेपटी किंवा अंगावरील केस असेच नाहीसे झालेत. (थोडं विषयांतर. स्त्रीया विविध तऱ्हेने केसांची स्टाईल करून केसांचा सतत उपयोग करतात म्हणून त्यांचे केस लंबे और घने असतात आणि बहुतेक पुरूष दिवसातून एकदा किंवा दोनदाच, आरशात न बघता, डोक्यावरून –केसांतून नाही- कंगवा फिरवतात म्हणून तर त्यांचे केस जातात, असंही ‘युज इट ऑर लूज इट’ असेल का?) तर, जसा आपण आपल्या सर्वच अवयवांचा कारणपरत्वे उपयोग करतो, तसा जीवनातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यासाठी बुद्धीचाही उपयोग करणं गरजेचं असतं. माझं कोण ऐकणार म्हणून विचार जिरवण्यापेक्षा मी सोशल निडीयावर व्यक्त होतो. अनेकांना माझ लिखाण आवडत तर काही जणांना नाही. आता आपण लिहील म्हणजे ते सर्वांना आवडायलाच पाहिजे असा काही नियम नाही आणि माझा तसा आग्रहही नाही. पान व्यक्त होण माझ्यासाठी गरजेचं, म्हणून मी वेळोवेळी मला पटलेल्या व माझ्यावर येऊन आपटलेल्या विचारांवर, विषयांवर व्यक्त होत असतो.

सोशल मिडिया माझ्यासारख्या अनेकांसाठी वरदान आहे हे खरय. सोशल मिडीयाने अनेकांच्या सुप्त गुणांना वाव दिला हे ही खरं आहे. आपले विचार कुठेतरी छापून यावेत हे लिहीणाऱ्या प्रत्येकाला मनापासून वाटत असतं. सोशल मिडीया अवतरण्यापूर्वी आपलं काहीचरी छापून येण्याचा केवळ वर्तमानपत्र किंवा एखादं साप्ताहिक/मासिक एवढेच एक-दोन मार्ग उपलब्ध असायचे. आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणंही तेवढंच अवघड असायचं. पुन्हा पोचलोच तिथपर्यंत, तर मग त्या पेपर किंवा मासिकाचा ‘विचार’ आपल्या लेखनाच्या ‘विषया’शी जुळणारा असेल तर ठीक अन्यथा सर्व ‘साभार परत’. अशावेळी मग शाळा-कॉलेजची हस्तलिखीतं किंवा पेपरमधला वाचकांचा पत्रव्यवहार हाच मार्ग शिल्लक राहायचा. तो ही प्राप्त नाही झाला तर मात्र पास अथवा नापास असा कोणताही शेरा असलेली मार्कशिट हा मात्र आपलं नांव आणि ‘विषय’ही छापून येण्याचा हमखास मार्ग होता.

अशा साचलेपणाच्या वेळी नेमका व्हाट्सअॅप, फेसबुकसारखा सोशल मिडीया अवतरला आणि माझ्यासारख्याला व्यक्त होण्यासाठी एक हक्कच व्यासपिठ मिळालं. सोशल मिडीयाने अनेकजणांना लिहित केलं. खरंच काय आवाका असतो एकेकाच्या/ एकेकीच्या प्रतिभेचा..! एकच गोष्ट किती आयामातून बघता येते हे सोशल मिडीयामुळे कळलं. यामुळे आपल्याही विचारांची कक्षा रुदावल्यासारखी होते व आपल्या सर्नानाच असलेल्या बुद्धीचं रुपांतर हळुहळू अकलेमधे होत जातं. बुद्धी उपजतंच असते, अक्कल मात्र दाढेसोबत नंतर फुटते..!

मी ही सोशल मिडीयामुळे लिहीयला लागलो. पहिल्या परिच्छेदाच्या सुरुवातीला लिहील्याप्रमाणे माझे म्हणून जे काही विचार आहेत, ते कोणाला पटोत वा न पटोत, ते सोशल मिडीयावर मोकळेपणांने मांडता यायला लागले. माझ्या मनात विचाराचा बराच गुंता असल्याने सोशल मिडीयावर माझ्या लेखनात त्याचं प्रतिबिंब पडणं सहाजिकच होतं. म्हणून कदाचित माझ लेखन काहीस जड व समजण्यास अवघड अस होत असाव. आश्चर्य म्हणजे माझ्या जड जड विचारांशी सहमत असणारेही बरेच मित्र/मैत्रीणी भेटल्या. बद्दकोष्ठाची औषधं आवडीने घेणारे माझ्यासारखे इतरही काहीजण असतात याचा साक्षात्कार सोशल मिडीयामुळे झाला.

मी अभ्यास करून लिहितो हे अनेकांचं म्हणण आहे आणि ते खरंही आहे. मला अभ्यास केल्याशिवाय लिहिता येत नाही कारण मला बुद्धी असली तरी तेवढीशी अक्कल मात्र नाहीय. आणि अभ्यास करून लिहायला कुठं अक्कल लागते? वर्षभर घोकंपट्टी करून परिक्षेचा पेपरात ओकंपट्टी करण्यासारखंच असतं ते. सोशल मिडिया आणि परीक्षेचा पेपर यात फरक एकच, इथं परिक्षा नसते व इतक्या ओळीत उत्तर लिहा अशी धमकीवजा सुचनाही नसते..! आपल्याला वाटेल ते व पटेल ते आणि कितीही लहान-मोठं लिहीता येते.

पण अभ्यासपूर्ण लिखाणापेक्षा मला मनापासून कौतुक वाटत ते कविता –कथा-व्यक्तिचित्र लिहिणाऱ्यांचं..! यासाठी खरी प्रतिभा लागते. कल्पनाशक्ती लागते. जे अमूर्त आहे त्याला मूर्तरुप देणं ही खरी प्रतिभा. सर्वाना समान उपलब्ध असलेल्या मुळाक्षरातल्या ५२ अक्षरांची मांडणी हे प्रतिभावान अशा पद्धतीने करतात की ज्याचं नांव ते..! थोडक्या शब्दांत काय मोठा आशय सांगून जातात..! म्हणून कुठलेतरी जुने ग्रंथ वाचून वैचारीक लिहीणाऱ्यांपेक्षा, कल्पनेच्या स्वच्छंद आणि अचाट भराऱ्या मारणाऱ्या कवी-कथाकारांच मलाही मनापासून कौतुक वाटतं. खर तर हेवा वाटतो. आपल्यालाही तास लिहिता यायला हवं असंही वाटत, मी तसा प्रयत्नही करतो, पण नाही जमत हेच खरं..! सोशल मेडिया नसता तर हे प्रतिभावंत कसे भेटले असते कुणास ठावूक..! मी तर मला स्वत:ला पार एवढासा समजतो या गिफ्टेड लोकांपुढे..!!

फक्त एकच अडचण असते ती फाॅरवर्डेड मेसेजेसची. कुठले मेसेज फाॅरवर्ड करायचे हे समजण्यासाठीही थोडीशी बुद्धी लागते. एक मान्य, की सर्वानाच लिहायला जमतं असं नाही, पण फाॅरवर्ड काय करावं आणि काय नाही हे समजायला, मला वाटतं फार बुद्धी लागत नसावी. बरं, मेसेज फाॅरवर्ड करताना त्या मेसेजबद्दल आपलं मत काय हे दोन ओळीत लिहायला काय हरकत आहे? असं केलं तर एकच मेसेज आणखी दहा जणांकडून आल्यास, तो मेसेज एकच असला तरी त्याबद्दल दहा वेगळी मतं वाचायला मिळू शकतात. दोन ओळीत आपलं मत लिहा आणि मेसेज फाॅरवर्ड करा, बघा एकाच मेसेजचं स्वरुप किती वेगळं होतं ते..! दोन ओळी लिहीण्यायेवढी बुद्धी तर देवदयेने सर्वांकडेच आहे.

सोशल मिडीयाचा वापर तारतम्याने करणं गरजेचं आहे. त्यातील नाविन्य टिकवलं नाही की त्याचं महत्व हरवून लोक कंटाळयास वेळ लागणार नाही आणि म्हणून त्यातील नाविन्य टिकवणं सर्वस्वी आपल्याच हातात आहे. इथं तारतम्य वापरणं गरजेचं आणि सर्वांच्या हिताचंही आहे.

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..