मूळचे अकोल्याचे असणाऱ्या आनंद मोडक यांनी आपल्या गावातील शाळेत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १३ मे १९५१ रोजी झाला. तेथेच त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट धरली. बा. सी. मर्ढेकरांच्या बदकांचे गुपित या काव्याला मा.मोडक यांनी संगीत दिले आणि तेथून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. हे काव्य रसिकांच्या पसंतीस उतरल्यानंतर मोडक यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. पीडीएच्या `घाशिराम कोतवाल’मधूनही त्यांनी आपली चुणूक दाखवली होती. सतिश आळेकरांच्या `महानिर्वाण’ या नाटकाने त्यांना संगीतकार बनवले. नाटक, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि नंतर पुढे चित्रपट असा त्यांचा संगीतप्रवास बहरत गेला. हे सर्व करत असताना त्यांनी महाराष्ट्र बँकेत नोकरीही केली.
सतत विविध प्रयोग करत राहणे हे आनंद मोडक यांच्या संगीताचे वैशिष्टय़ होते. तालवाद्याची साथ न घेता केलेली खानोलकरांची गाणी हा त्यातीलच एक प्रयोग. आनंद मोडक यांच्यावर कुमार गंधर्वांच्या गायकीचा प्रभाव होता, व ते मान्यही करत अस. मोडक हे अखेरच्या श्वासापर्यंत संगीत क्षेत्राशी संलग्न होते. आनंद मोडक यांनी रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत आपल्या संगीताने ठसा उमटविला होता. मोडक यांचे साजणवेळा, अमृतगाथा, शेवंतीच बन, प्रीतरंग, अख्यान तुकोबाचे हे संगीत कार्यक्रमही लोकप्रिय झाले होते. ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘बेगम बर्वे’, ‘महापूर’, ‘पडघम’, ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांच्या आशयाला त्यांच्या संगीताने वेगळ्याच उंचीवर नेले होते. ‘२२ जून १८९७’, ‘कळत नकळत’, ‘सूर्योदय’, ‘चाकोरी’, ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘सरकारनामा’, ‘पाश’, ‘फकिरा’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘आरंभ’, ‘धूसर’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटातील संगीतही रसिकांकडून तसेच समीक्षकांकडून अतिशय वाखाणले गेले. ‘एक झोका, चुके काळजाचा ठोका’, ‘जाई जुईचा गंध मातीला’, ‘युगा युगांचे नाते आपुले’, ‘श्रावणाच ऊन मला झेपेना’, ‘हे जीवन सुंदर आहे’, ‘तू तलम अग्नीची पात’, ‘वळणवाटातल्या मातीत हिरवे गंध’, ‘मना तुझे मनोगत मला कधी कळेल का’, ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ ही त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात दरवळत आहेत. आपल्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी १० नाटके, ३६ चित्रपट, तसेच ७ हिंदी, व ८ मराठी मालिकांना संगीत दिले होते. त्यांच्या नावावर चित्रपट संगीतासाठीचे सर्वाधिक राज्य पुरस्कारांची नोंद आहे. `यशवंतराव चव्हाण’ हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. आनंद मोडक यांचे २३ मे २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply